पावसाने दाखवला करिष्मा; आता मुंबईकरांची वर्षभराची तहान भागणार!

Mumbai water reserves are in good condition
पावसाने दाखवला करिष्मा; आता मुंबईकरांची वर्षभराची तहान भागणार!
मागील एक महिन्यापर्यंत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी मागील दोन वर्षांच्या तुलनेत कमीच होती. परंतु ऑगस्टमधील केवळ पंधरा दिवसांमध्ये पाण्याच्या पातळीने उसळी घेतली. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ३४ टक्क्यांवर असलेला पाणीसाठा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे. कमी पाणी साठा असल्याने पाणी कपात जाहीर करण्याची वेळ आलेली असतानाच पावसाने आपला करिष्मा दाखवत सर्व तलावांमधील पाण्याची पातळीत भर टाकत प्रशासनाला कपात मागे घ्यायला लावलीच, शिवाय मागील दोन वर्षांच्या पुढे असलेल्या पातळीच्याही पुढे आपली धाव घेतली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात थेंबे थेंबे तलाव भरत मुंबईकरांच्या वर्षभराची तहान चांगल्याप्रकारे भागवली जाणार आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी आदी तलाव तसेच धरणांमधून दिवसाला ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची तहान भागवण्यासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याचा साठा अपेक्षित असतो. या एकूण पाणी साठ्याच्या तुलनेत १३ सप्टेंबर २०२० ला यासर्व तलावांमध्ये एकूण पाणीसाठा १४ लाख १६ हजार ४९३ दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा साठा जमा झाला. हा पाणीसाठा ९७.८७ टक्के एवढा आहे.
४ ऑगस्ट रोजी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळसी या सर्व तलावांत ३४ टक्के एवढा पाणी साठा होता. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी महापलिका प्रशासनाने २० टक्के पाणीकपात जाहीर केली होती. त्यानंतर पाणी साठ्यात वाढ झाल्याने २१ ऑगस्ट रोजी ही कपात १० टक्क्यांवर आणली. म्हणजे अवघ्या १५ दिवसांमध्ये पाणी साठा हा ४१ टक्क्यांवरून ९५ टक्क्यांवर पोहोचला होता. आज १३ सप्टेंबर रोजी हा पाणी साठा ९८ टक्क्यांवर आला आहे. तलावात आज जरी ९८ टक्के पाणी साठा असला तरी प्रत्यक्षात १ ऑक्टोबरला जेवढा पाणी साठा असेल त्यावर मुंबईकरांची तहान किती भागवली जाईल हे ठरवले जाते. त्यामुळे सध्या तरी तलाव शंभर टक्के भरून ओसंडून वाहण्याऐवजी मुंबईकरांची तहान भागवत वर्षभराचा साठा कायम राखला जातो, हे मुंबईसाठी खूप फायद्याचे आहे.
धरण/तलाव          पाण्याची पातळी          कमीत कमी पातळी      आजची पातळी        एकूण पाऊस
                         (मीटरमध्ये)                 (मीटरमध्ये)            (मीटरमध्ये)         (मि.मी.मध्ये)
अप्पर वैतरणा            ६०३.५१                     ५९५.४४                ६०३.४२             २३१८.००
मोडक सागर             १६३.१५                      १४३.२६                १६३.४१             २३२९.००
तानसा                    १२८.६३                      ११८.८७                १२८.६०             २०७७.००
मध्य वैतरणा              २८५.००                      २२०.००                २८३.७३             २५२७.००
भातसा                    १४२.००                       १४०.९०                १४१.५४             २५६४.००
विहार                     ८०.१२                        ७३.९२                  ८०.११               ३०५३.००
तुळशी                    १३९.१७                      १३१.०७                 १३९.१३              ३७८३.००