घरमुंबईमुंबईत उभारणार राष्ट्रीय विष संशोधन केंद्र

मुंबईत उभारणार राष्ट्रीय विष संशोधन केंद्र

Subscribe

हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था या जगातील इन्स्टिट्यूटच्या आवारात लवकरच राष्ट्रीय विष संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. याला केंद्र सरकारकडून पाठिंबा देण्यात आला आहे.

हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था या जगातील इन्स्टिट्यूटच्या आवारात लवकरच राष्ट्रीय विष संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. या संशोधन केंद्रात जगातील वेगवेगळ्या भागातील सापांचे विष जमा करुन डब्लूएचओच्या मार्गदर्शनतत्त्वानुसार त्यावर संशोधन केले जाणार आहे. सापांच्या विषातून लसी आणि औषधं तयार केली जातात. सापांचा प्रदेश बदलला, खाणं बदललं की जे विषारी साप आहेत त्यांच्या विषात बदल होतात आणि त्याचे परिणामही बदलतात. अशा जगातील वेगवेगळ्या भागांतून सापांच्या विषावर संशोधन केले जाणार आहे. शिवाय, त्याचा उपयोग लसी आणि औषधं तयार करण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती हाफकिन संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. निशिगंधा नाईक यांनी ‘आपलं महानगर’ शी बोलताना दिली आहे.

केंद्र सरकारला पाठवला प्रस्ताव

या राष्ट्रीय विष संशोधन केंद्राबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला आहे. त्याला केंद्राने ही पाठींबा दिला आहे. त्यानुसार येत्या ६ महिन्यात या प्रस्तावाच्या कामाला सुरूवात होणार आहे. संपूर्ण जगभरात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विषाचा पुरवठा केला जातो. त्यानंतर, संशोधनासाठी किंवा लसी बनवण्यासाठी तामिळनाडू राज्यातूनही विष पुरवले जाते. त्यानुसार, वेगवेगळ्या राज्यात कशा पद्धतीच्या लसींचा उपयोग केला जातो किंवा त्याचा काय फरक पडतो यावरही संशोधन होण्यास मदत होणार आहे.

“या केंद्राच्या कामाच्या सुरुवातीसाठी आणखी ६ महिने जाणार आहेत. शिवाय, या केंद्रासाठी प्रशिक्षणार्थी, वेगळा स्टाफची आवश्यकता लागणार आहेत. आता सध्या ३ सर्पपाल, २ लॅब अटेंडट आणि १ पशूवैद्य आहेत. त्यामुळे आणखी या केंद्रासाठी स्टाफची आवश्यकता असणार आहे. या राष्ट्रीय विष संशोधन केंद्रामुळे नक्कीच फायदा होणार आहे. शिवाय, आताच्या ज्या लसी उपलब्ध आहेत त्या खर्चिक आहेत. त्यामुळे त्यातून आणखी काही वेगळा पर्याय उपलब्ध करण्यासाठी मदत होणार आहे.” – डॉ. निशिगंधा नाईक, हाफकिन संस्थेच्या संचालिका

- Advertisement -

 

सापावरील आणखी औषधांसाठी संशोधन

जेव्हा एखादा साप चावला की नेमका कोणता साप चावला आहे ? हेच आधी कळत नाही. त्यानंतर साप चावलेल्या व्यक्तीला अँटी स्नेक लस दिली जाते आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवता येतो. पण, ती लस देऊनही ज्या भागाला साप चावला तो भाग अनेकदा अपंग होतो अशी प्रकरणं आढळतात. त्यामुळे त्यावर लोकल टॉक्सिन उपलब्ध होतात का ? याचं ही संशोधन केलं जाणार आहे. होमिओपॅथीमधील आयुष डॉक्टर अनेकदा सापाच्या विषांपासून बनवलेल्या औषधांचा वापर करतात. त्यामुळे तशाच पद्धतीची औषधं तयार करता येतात का याचा ही विचार केला जाणार आहे, असं डॉ. नाईक यांनी ‘आपलं महानगर’ शी बोलताना सांगितलं आहे.

- Advertisement -

केंद्राने दिला पाठींबा

गेल्या अनेक वर्षापासून या संशोधन केंद्राच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे विचारणा सुरु होती. याबाबत दिल्लीमध्ये बैठकही पार पडली आहे. बैठकीमध्ये हाफकिनमध्ये सापांच्या विषांवर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसंच या प्रकल्पासाठी जवळपास कोटींचा खर्च येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करुन देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याला पाठींबा दिला आहे.

भारतात दरवर्षी सर्पदंशाच्या इतक्या केसेस –

महाराष्ट्रात गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल ते डिसेंबर २०१७ मध्ये ३३ हजार ६७३ केसेस आढळल्या आहेत. ज्यातून मृत्यू होण्याचं प्रमाणही जास्त आहे. भारतात दरवर्षी २ ते ३ लाख सर्पदंशाच्या केसेस आढळतात. त्यातून ५० हजार रुग्णांचा मृत्यू होतो. मुंबईत एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ मध्ये १३३ केसेस आढळल्या आहेत. ठाण्यात १ हजार ३३२ सर्पदंशाच्या केसेस आढळल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात १० टक्केच सर्पदंशाच्या घटनांची नोंद केली जाते.

महाराष्ट्रातील ३ वर्षांची आकडेवारी –

२०१४ – २०१५  = ३८ हजार ५१४

२०१५ – २०१६ = ३९ हजार १०३

२०१६ – २०१७ = ३० हजार ६०

एप्रिल ते सप्टेंबर २०१७ मध्ये २६ हजार ८६१ केसेस महाराष्ट्रात आढळल्या आहेत.

 

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -