पाऊस परतल्यामुळे मुंबईकर सुखावले

Mumbai
Mumbai rains record
मुंबईतला पाऊस

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातून गायब झालेल्या वरुणराजाने शनिवारी संध्याकाळी मुंबईत पुन्हा एकदा शिडकावा केल्याने उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर सुखावले. मुंबई शहरासह उपनगरात सकाळपासून वरुणराजा बरसल्याने काही ठिकाणी तुरळक पाणी साचले. दरम्यान, येत्या २४ तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. तर मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान, शुक्रवारी मुंबईत जुलै महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबईच्या तापमानाची नोंद ३६.२ अंश सेल्सिअस इतकी होती. १९६० नंतर शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. १९६० साली हे तापमान ३४.८ इतके नोंदविण्यात आले होते. तापमानाबरोबरच मुंबईत आद्रतेचे प्रमाणही अधिक असल्याचे नोंदविण्यात आले आहे. सांताक्रूझ वेधशाळेत ६४ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली असून कुलाबा वेधशाळेत हेच प्रमाण ७१ टक्के इतके होते. शनिवारी मुंबईच्या अनेक भागांत विजेच्या लखलखटांसह पाऊस पडला. अचानक पडलेल्या या पावसाने मुंबईकर काही काळ तारांबळ उडाली.

मुंबईसह राज्यातही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे, परभणी, जालणा, औरंगाबाद याठिकाणीही पावसाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी येत्या २४ तासात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला आहे. त्याबरोबरच दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर मुंबईत झालेल्या पावसाबद्दल आणि अचानक विजेच्या लखलखाटांसह झालेल्या पावसाबद्दल हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले की, वातावरणात निर्माण झालेल्या आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. तसेच पाऊस थांबल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे हा परिणाम जाणवत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here