मुंबईकरांचे आयुष्य गॅसवर

Mumbai
स्टॉल

वडापाव, भजी, मिसळ, उत्तप्पा, डोसा, पॅटिस, सँडविचपासून ते पोळी-भाजीपर्यंत आणि व्हेज रोल, पिझ्झा, बर्गरपासून ते अप्पे यांसारख्या पदार्थांची मुंबईतील खाऊगल्ल्या व पदपथावरील स्टॉलवर मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. मुंबई, ठाणे व नवीमुंबईमध्ये पदपथावर बेकायदा खाद्यपदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात आहे. स्टॉलवर खाद्यपदार्थ बनवण्यासाठी बेकायदा घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रासपणे वापर केला जातो. रस्त्यावर तसेच पदपथावर खाद्यपदार्थ बनवण्यास बंदी असूनही हे स्टॉलधारक बिनधास्तपणे घरगुती गॅस सिलिंडर व स्टोव्हचा वापर करताना जागोजागी दिसतात. बेकायदा सिलिंडर व स्टोव्हचा वापर करून हे खाद्यपदार्थ विक्रेते स्वतःबरोबरच नागरिकांचाही जीव धोक्यात घालतात. पालिका, अन्न व औषध प्रशासन, पोलिस आणि अग्निशमन दलाकडून दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे हातगाड्या व स्टॉल्सवरील पदार्थ विक्रेत्यांबरोबर यांचे काही आर्थिक संबंध तर नाही ना? असा मोठा प्रश्न उपस्थिती होत आहेत.

वितरण कंपनीवर कारवाई नाही
रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्याजवळ गॅस सिलिंडर आढळून आल्यास, ज्या वितरण एजन्सीचा तो सिलिंडर असेल त्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. परंतु प्रत्यक्षात एकाही एजन्सीविरोधात अद्याप तक्रार नोंदवलेली नाही. परवाना विभागातील अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, गॅस सिलिंडर कोणत्या कंपनीचा आहे हे समजू शकते. परंतु तो कोणत्या एजन्सीकडून त्याने घेतला आहे, हे सिद्ध करणे कठीण होते. एजन्सीविरोधात तक्रार करण्याचा पहिला प्रयत्न झाला त्यावेळी एजन्सीने सिलिंडर आपल्याकडून घेतलाच नाही असा दावा केला. त्यामुळे एजन्सीविरोधात एफआयआर करणे जिकरीचे आणि पुरावे सिद्ध करण्यासारखे नसल्याने एफआयआर केले जात नाही.

पेट्रोलियम कंपन्यांना सिलिंडर परत
कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी घरगुती स्वरुपाचे वा व्यावसायिक स्वरुपाचे एलपीजी गॅस सिलिंडर आढळून येतात. उपहारगृहांमध्येही मान्यतेपेक्षा अधिक संख्येने गॅस सिलिंडर्सचा साठा आढळतो. त्यामुळे हे सिलिंडर जप्त करण्यात येतात. याप्रकारे जप्त केलेले सिलिंडर ज्या पेट्रोलियम कंपन्यांचे आहेत त्यांना हस्तांतरित करण्यात यावेत, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी १९ डिसेंबर २०१५ च्या परिपत्रकानुसार दिले होते. त्यानुसार मागील दोन वर्षांपासून खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात राबवलेल्या मोहीमेतून तब्बल साडेतीन हजार सिलिंडर जप्त करण्यात आले. यातील एक हजार ६५० सिलिंडर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीला तर एक हजार ७५० सिलिंडर भारत पेट्रोलियमला परत देण्यात आले.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा रात्रीचा सुळसुळाट
दादर रेल्वे स्थानकासह इतर रेल्वे स्थानक व सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्यावेळी खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या आणि स्टॉल्स लावले जातात. दिवसभर महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाचा ससेमिरा असल्याने रात्री सातनंतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्स लावले जातात. हे स्टॉल्स आणि हातगाड्या सकाळपर्यंत सुरू असतात. सिलिंडर मिळणे सध्या कठीण असल्याने स्टोव्हचा वापर सर्रास केला जातो. परंतु बंदी असताना हा प्रकार पोलिसांच्या डोळ्यांसमोर सुरू असतो. महापालिकेच्यावतीने कारवाईसाठी 24 पथकांची स्थापना केली असून, त्यामध्ये १९२ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. असे असतानाही बिनधास्तपणे खाद्यपदार्थ उघड्यावर तळले जातात आणि अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

पादचारी जखमी
दोन वर्षांतच कुर्ला, दादर याठिकाणी खाद्यपदार्थ बनवताना स्टोव्हचा भडका उडून तसेच स्फोट होण्याच्या दोन दुर्घटना घडल्या. यामध्ये पादचारी जखमी होण्याचे प्रकार घडले होते. मात्र, त्यानंतरही कडक कारवाईचा परिणाम दिसून येत नाही.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरील कारवाई   
एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ : २,२९,८६८ 

 

जप्त केलेले सिलिंडर
एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ : ९, ४५९

नविन धोरणात पदार्थ शिजवण्यास बंदीच
पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करून त्यांच्यासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करण्यात येत आहे. या नव्या धोरणात रस्त्यांवर खाद्यपदार्थ शिजवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विकता येतील; पण तळता येणार नाही. त्यामुळे कुठेतरी जागा बघून खाद्यपदार्थ शिजवून अथवा तळून विक्रेत्याला खाद्यपदार्थ विकावे लागणार आहे. त्यामुळे वडा असो व समोसा तसेच आम्लेट असो वा बुर्जी तसेच इतर खाद्यपदार्थ शिजवून आणून विकावे लागणार असल्याने ते गरमागरम मिळणार नाही. तर ते थंडच मिळणार आहेत.

चिरमिरी देऊन सुटका
मुंबई पोलिसांकडून मुंबई शहरासह उपनगरात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर करून उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करणार्‍यांवर वारंवार कारवाई करण्यात येते. कारवाईनंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करूनही अनेक स्टॉलधारक पोलिसांना तसेच मनपा अधिकारी यांना चिरीमिरी देऊन आपली सुटका करून पुन्हा व्यवसाय सुरू करतात.

प्रभादेवीमध्ये अनेक हातागाड्यांवर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी गॅस सिलिंडर, स्टोव्हचा वापर केला जातो. रस्त्यालगत अशाप्रकारे पदार्थ बनवायला परवानगी नसतानादेखील हे विक्रेते सर्रास स्टॉल लावतात. गॅस सिलिंडर किंवा स्टोव्हचा स्फोट होऊन दुर्घटना झाल्यास रस्त्यावरून प्रवास करणारे तसेच पदपथावरून जाणार्‍यांची जीवितहानी होऊ शकते. महापालिकेच्या गाड्या येताच हे हातगाडी चालवणारे साहित्यासह पळ काढतात. वारंवार कारवाया होऊनही काही दिवसांतच स्टॉल पुन्हा उभे राहतात.

परळ स्टेशनपासून केईएम हॉस्पिटलपर्यंतच्या मार्गात जवळपास ५० पेक्षा अधिक बेकायदा फेरीवाले शेगडी किंवा गॅसवर खाद्यपदार्थ बनवून त्याची विक्री करत असतात. केईएम हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या सर्वच फेरीवाल्यांच्या गाडीवर कोळशाची शेगडी किंवा गॅस सिंलेडर दिसून येतात. फेरीवाल्यांकडे मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ बनवण्यात येत असले तरी त्यांच्याकडे स्वच्छतेचा प्रश्न असतोच. स्टॉलवर कधी आगीचा भडका उडाल्यास ते मुंबईकरांच्याच जीवावर बेतू शकते.

डोंबिवलीकरांचा जीव धोक्यातच
कल्याण डोंबिवली शहरात जागोजागी व वर्दळीच्या ठिकाणी चायनीज व खाद्यपदार्थांच्या हातगाडया थाटल्या आहेत. या हातगाडयांवर सर्रासपणे बेकायदा सिलिंडरचा वापर होतो. रस्त्याच्या कडेला असणार्‍या गाडयांवर ग्राहकांची गर्दी दिसून येते. चहाच्या टपरीच्या शेजारीच अनेक हातगाडया आहेत. वर्दळीच्या ठिकाणी सिलिंडरचा वापर करणे हे बेकायदेशीर आहे, पण पालिका आणि पोलीसांकडूनच यांना अभय मिळत असल्याने त्यावर कारवाई करणार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. १९ एप्रिलला डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरील डेांबिवली दरबार हॉटेलला गॅसच्या गळतीमुळे भीषण आग लागल्याचा प्रकार घडला होता. भरदुपारी ही घटना घडल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले, मात्र हॉटेल आगीत भस्मसात झाले होते.

दुर्घटनेनंतर परिस्थिती जैसे थे
कल्याणमधील बेकायदा चायनिज हॉटेलला लागलेली आग विझवताना झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात अग्निशमन दलाच्या जवानाला आपले प्राण गमवावे लागले होते. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर बेकायदा हातगाडीवरील गॅस सिलिंडरचा प्रश्न चव्हाटयावर आला होता. त्यानंतर पालिकेने शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर नाममात्र कारवाई केली. कल्याणच्या घटनेनंतर पालिका प्रशासनाकडून रस्त्यावर बेकायदेशीपणे सुरू असलेल्या हातगाडयांवरील गॅस सिलिंडरवर कारवाई केली केली. पण काही दिवसानंतर ही कारवाई थंडावल्याने परिस्थिती जैसे थे आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यांवर खाद्यपदार्थ शिजवण्यास तसेच तळण्यास बंदी आहे. त्यामुळे रस्त्यांवर गॅस सिलिंडर किंवा रॉकेल स्टोव्ह यावर खाद्यपदार्थ बनवता येत नाही. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कोणी गॅस सिलिंडर किंवा रॉकेल स्टोव्ह वापरत असेल तर त्या विक्रेत्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येते. त्यांच्याकडील सिलिंडर आणि स्टोव्ह जप्त करण्यात येतो. जप्त केलेले सिलिंडर कालांतराने आयुक्तांच्या परिपत्रकानुसार संबंधित गॅस कंपनीला परत देण्यात येतात.
– शरद बांडे, अधीक्षक, महापालिका परवाना विभाग

साकीनाका येथे ऑफिसला जाण्यासाठी मी दररोज घाटकोपर रेल्वेस्थानकात उतरून बस पकडतो. घाटकोपर रेल्वेस्थानकाबाहेर असलेल्या झुनझुनवाला कॉलेजच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. स्टॉलवर मोठ्या प्रमाणशत सिलिंडरचा वापर केला जातो. कॉलेज आणि रेल्वे स्थानक जवळच असल्याने येथे भीषण घटना होण्याची शक्यता आहे.
– नवनाथ बत्तीसे, रेल्वे प्रवासी

संकलन – सचिन धानजी, विनायक डिगे, नितीन बिनेकर, कृष्णा सोनारवाडकर, भाग्यश्री भुवड, संतोष गायकवाड

छाया : प्रवीण काजरोळकर, संदीप टक्के, अमित मार्केंडे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here