मुंबईकरांची दुचाकींना पसंती; वाहतूक कोंडीतून शॉर्टकट

वाढत्या चारचाकी गाड्या आणि मेट्रोच्या कामामुळे मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. त्यामुळे बराच वेळ रस्त्यातच अडकून पडावे लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे चारचाकी वाहनाला मार्ग काढणे कठीण होऊन बसत असल्याने मुंबईकर दुचाकी वाहन वापरण्याला पसंती देत असल्याचे समोर आले आहे.

Mumbai
Mumbaikars prefer Two-wheelers
Mumbaikars prefer Two-wheelers

वाढत्या चारचाकी गाड्या आणि मेट्रोच्या कामामुळे मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. त्यामुळे बराच वेळ रस्त्यातच अडकून पडावे लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे चारचाकी वाहनाला मार्ग काढणे कठीण होऊन बसत असल्याने मुंबईकर दुचाकी वाहन वापरण्याला पसंती देत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दुचाकींची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०१७-१८ मध्ये मध्य मुंबईत ४६ हजार ११७ दुचाकी वाहनांच्या खरेदीची विक्रमी नोंद झाली आहे.   सध्या शहरात 20 लाखांहून अधिक दुचाकी रस्त्यावर धावत आहेत. तर सर्व प्रकारच्या वाहन नोंदणीचा दररोजचा आकडा 800 हून अधिक झाला आहे. मुंबईतील एकूण वाहनांची संख्या 35 लाखांवर पोहोचली आहे. त्यामध्ये 10 लाख खासगी कारचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये दुचाकींच्या संख्येत तब्बल 77 टक्के वाढ झाली आहे. चारचाकीपेक्षा दुचाकी जलदगतीने मार्ग काढण्यासाठी सर्वात सोपा उपाय असल्याने मुंबईकर आता पुण्याप्रमाणे या पर्यायाला पसंती देत असल्याचे दिसून येते.

मध्य मुंबईत दुचाकी वाहनांची संख्या अत्यंत वेगाने वाढत होत आहे, अशी माहिती ‘आपलं महानगर’च्या हाती आली आहे.
वाहतूक कोंडीमुळे दुचाकी वाहनांच्या खरेदीत वाढ झालेली असल्यामुळे दुचाकी वाहने बनविणार्‍या कंपन्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यलयाच्या आकडेवारीनुसार 2011-12 मध्ये दुचाकी वाहनाची संख्या 3 लाख 38 हजार होती. मागील पाच वर्षात या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. सध्या मध्य मुंबईमध्ये दुचाकी वाहनाची संख्या 5 लाख 81 हजार झाली आहे. वाहतूक तज्ज्ञांच्या मते पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि मेट्रोच्या कामामुळे होणार्‍या वाहतूक कोडींमुळे मोठ्या प्रमाणात दुचाकी खरेदी होत आहे. मुंबई शहरात दररोज किमान 150 ते 250  नव्या दुचाकी रस्त्यावर येत आहेत. दुचाकींची संख्या वाढण्याचा वेग पाहता तो धक्कादायक आणि धोकादायक आहे. बाईक चालवताना फोनवर बोलणे, हेल्मेट न घालणे यासारख्या वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. त्यामुळे दुचाकीस्वार ही मोठी डोकेदुखी ठरत आहे, असे मत वाहतूक विषयातील जाणकार व्यक्त करत आहेत.

मेट्रोच्या कामामुळे मुंबईकरांची दुचाकींना पसंती 

मागील दोन वर्षांपासून मुंबईत मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी दुचाकी खरेदी करणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. पुढील काळात त्यात आणखी वाढ होईल. मुलांना शाळेत सोडण्यासाठी, शिकवण्यासाठी त्याचबरोबर घरापासून रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी दुचाकीचा सर्वाधिक वापर केला जातो. उपनगरांतील अनेक रेल्वे स्थानकांनजीक परवडणार्‍या दरात पार्किंगची सोय असल्यामुळे दुचाकीला प्राधान्य दिले जाते. तसेच महिला आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये दुचाकी वापरण्याचे प्रमाण मोठे आहे.

दुचाकीमुळे पोलिसांची वाढणार डोकेदुखी 

मुंबईत दुचाकींचे प्रमाण वाढल्यामुळे बर्‍याच समस्याही निर्माण झाल्या आहेत. दुचाकींच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे. दुचाकीच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही अपवाद वगळता दुचाकीस्वार वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. सिग्नल तोडणे, चुकीच्या दिशेने चालवणे, झेब्रा क्रॉसिंगवर दुचाकी उभी करणे, कुठेही पार्किंग करणे असे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे त्यांना आवर घालणे वाहतूक विभागासमोर आव्हान ठरत आहे.

दुचाकी घेण्यामागील कारणे?

  • वाहतूक कोंडीतून जलद मार्ग काढणे  मुलांना शाळा किंवा क्लासेसला सोडणे 
  •  घर ते रेल्वे स्टेशनपर्यंतचा प्रवास 
  •  जवळच्या अंतरावर पोहोचणे सोपे
  •  रिक्षा, टॅक्सीच्या तुलनेत वेगवान प्रवास 
  •  बाईकचे कमी दर, कमी ईएमआय  इंधनाची बचत 

पेट्रोल, डिझेल किमतीत वाढ आणि मेट्रोच्या कामामुळे मुंबईत होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे मुंबईकर चारचाकीपेक्षा दुचाकींना पसंती देत आहेत. दुचाकींचे वाढते प्रमाण त्रासदायक ठरणार आहे. वाढते ध्वनीप्रदूषण, बाईक चालवताना फोनवर बोलणे, हेल्मेट न घालणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार वाढणार आहेत. त्यामुळे वाहतूक विभागाने यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. – विवेक पै, वाहतूक तज्ञ, मुंबई 

 मध्य मुंबईतील दुचाकी संख्या

 2013  3 लाख 65 हजार 
2014   3 लाख 88 हजार 
2015   4 लाख 38 हजार
2016   4 लाख 48 हजार
2017   5 लाख 35 हजार
2018 5 लाख 81 हजार  ( ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन  कार्यालयाकडून मिळालेली आकडेवारी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here