चक्रीवादळामुळे मुंबईकरांना आली लोकल ट्रेनची आठवण

local trains

निसर्ग चक्रीवादळामुळे का होईना मुंबईत पाऊस आला आणि लोकलच्या आठवणीत मुंबईकर चांगलाच रमताना बुधवारी दिसून आला. लोकल सेवा ठप्प पडल्याचे जुने मेसेज आणि काही लोकल संबंधित पोस्ट सोशल मीडिया व्हायरल झाले. गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊनमुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा बंद असल्याने अनेकांनी पावसाळ्यातील आठवणीत सोशल मीडियावर उजाळा दिला आहे.

प्रत्येक वर्षी पहिल्या पावसात लोकल सेवा विस्कळीत होते. पावसामुळे लोकल सेवा रद्द आणि विलंबाने धावत असलेल्या लोकल गाड्यांचा रेल्वे स्थानकात होणाऱ्या उद्घोषणेचा हा अनुभव प्रत्येक वर्षी मुंबईकर घेत आलेला आहे. मात्र इतिहासात पाहिल्यांदा मुंबईकरांची लोकल ट्रेन दोन महिन्यापासून शांतपणे आपल्या कारशेड मध्ये उभी आहे. मुंबईकर गेल्या दोन महिन्यापासून घराबाहेर पडलेला नाही. पाऊस आणि लोकलसोबत मुंबईकरांचे वेगळेच नाते आहे. त्यामुळे बुधावारी कोसळत असलेल्या पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईकर लोकल ट्रेनच्या आठवणी रमला होता.

अनेकांनी बुधवारी सकाळी पासून लोकल सेवे विषयी जुने मेसेज एकमेकांना शेअर करताना दिसून आले. तर काहींनी सोशल मीडियावर गेल्यावर्षी आठवणीची पोस्ट शेअर केली. त्यामुळे निसर्ग वादळमध्ये सुद्धा मुंबईकरांने लोकलच्या आठवणीला उजाळा दिला. मध्य रेल्वेवर आणि पश्चिम रेल्वेवर ३ हजार पेक्षा जास्त लोकल फेऱ्या धावतात. ज्यामध्ये मध्य रेल्वेवर १७७४ तर पश्चिम रेल्वे १३६७ लोकल फेऱ्या धावतात. दररोज ७५ लाख पेक्षा जास्त प्रवासी या लोकल सेवेतून प्रवासात करतात. मात्र प्रत्येक वर्षी पावसाळ्यात लोकल सेवेचा खोळंबा, उशिराने धावत असलेल्या लोकल सेवा, रेल्वे स्थानकावर होणाऱ्या उद्घोषणा यंदा मुंबईकरांना अनुभवता आलेल्या नाही. त्यामुळे सोशल मीडियावर मुंबईकर व्यक्त झाले आहेत. अनेकांनी रेल्वेच्या ट्विटर अकाऊंटला टॅगकरून आपल्या जुन्या आठवणींनी उजाळा दिला आहे. तर अनेकांनी रेल्वेच्या लोकल सेवा सुरू केव्हा होणार असे प्रश्न विचारले आहे.