घरमुंबईमहापालिकेला पर्यावरणाचे वावडे; सेवेसाठी आणलेल्या ५८ सायकल जप्त

महापालिकेला पर्यावरणाचे वावडे; सेवेसाठी आणलेल्या ५८ सायकल जप्त

Subscribe

अजेयकुमार जाधव/ मुंबई

जगभरात पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न सुरु असताना जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईमध्ये मात्र पर्यावरण रक्षणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून एका सामाजिक संस्थेने सायकल सेवा सुरु करण्याचा प्रयत्न केला असला तरी,  पालिकेने या सायकली जप्त केल्या आहेत. यामुळे पालिकेला पर्यावरण रक्षणाचे वावडे तर नाही, असा सवाल केला जात आहे.
मुंबई महापलिकेने तानसा पाईपलाईनच्या बाजूच्या झोपडपट्ट्यांवर कारवाई करून तेथील घरांचे पुनर्वसन केले आहे. ३९ किलोमीटर लांबीच्या तानसा पाईप लाईनच्या दुतर्फा सायकल ट्रॅक बांधण्याचे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. रविवारी सायकल चालवणाऱ्यांसाठी एनसीपीए ते वरळी सी-लिंकपर्यंत २२ किलोमीटरचा सायकल ट्रॅक तात्पुरता स्वरूपात उभारला आहे. पालिका एकीकडे पर्यावरण रक्षणासाठी सायकल ट्रॅक उभारत असताना दुसरीकडे जनजागृतीसाठी भीमा शंकर परिसर विकास प्रतिष्ठान ही संस्था झटत आहे. प्रतिष्ठानच्या पर्यावरण रक्षणाच्या कामाला मदत म्हणून महिंद्रा कंपनीकडून ३ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या ५८ सायकली मोफत देण्यात आल्या. या सायकली चोरी होऊ नये म्हणून घाटकोपर पश्चिम येथील एका समाज मंदिर केंद्रात ठेवण्यात आल्या होत्या. मात्र समाज मंदिर केंद्रातून पालिकेने या सगळ्या सायकल्स जप्त केल्या अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसान गोपाळे यांनी दिली.

- Advertisement -

अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा
मुंबईत सायकल सेवा सुरु करावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पत्रव्यवहार करून घाटकोपर विभागात सायकल सेवा सुरु करण्याची परवानगी मागण्यात आली. त्यानुसार सायकल स्टँडची जागा निश्चित करण्यासाठी पालिकेने स्थानिक ट्राफिक पोलिसांचे ‘ना हरकत पत्र’ आणावे असे सांगण्यात आले. नगरसेविका राखी जाधव यांनी ट्राफिक विभागाला पत्र लिहून परवानगी देण्याची विनंती केली. तसे ‘ना हरकत पत्र’ ट्राफिक विभागाने नगरसेविका जाधव यांना पाठवले आहे. पर्यावरण रक्षणासाठी सायकल सेवा सुरु करावी म्हणून पालिका आयुक्तांपासून वॉर्डमधील अधिकाऱ्यांपर्यंत सातत्याने पाठपुरावा करूनही अधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप गोपाळे यांनी केला.

सुडबुद्धीने कारवाई केल्याची खंत 
५८ सायकली समाज मंदिर केंद्रातून पालिकेने जप्त केल्याबाबत घाटकोपर ‘एन‘ विभाग कार्यालयाकडे लेखी तक्रार दिली असल्याचे गोपाळे यांनी सांगितले. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्याने पालिकेचे एन विभागातील अधिकारी सूडबुद्धीने कारवाई करत असल्याची खंत गोपाळे यांनी व्यक्त केली. दरम्यान याबाबत एन विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्याशी संपर्क साधला असता ‘उद्या फोन करा, मी काय झाले ते विचारते’ असे सांगून याबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -