घरमुंबईडोंबिवलीतील नाट्यगृह तीन महिने बंद

डोंबिवलीतील नाट्यगृह तीन महिने बंद

Subscribe

पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका, 79 लाखांच्या उत्पन्नावर पाणी!

कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या गटार, पायवाटासारख्या कामांना पालिका आयुक्तांनी ब्रेक लावला आहे. एकिकडे पालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढत नसतानाच दुसरीकडे मात्र लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळेच पाणी फेरले जात असल्याचा प्रकार उजेडात आलाय. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह केवळ वातानुकूलित यंत्रणा दुरूस्ती करण्याच्या कामासाठी तब्बल तीन महिने बंद ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत जमा होणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. मागील वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सुमारे ७९ लाख रूपये तिजोरीत जमा झाले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी ७९ लाखांच्या उत्पन्नावर पाणी फेरले आहे. पालिकेच्या भोंगळ व धीम्या कारभाराबद्दल रसिक प्रेक्षक आणि लोकप्रतिनिधींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी म्हणूनच ओळखली जाते. शहरात वर्षभर विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. तर शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी नाटकासाठी प्रेक्षकांची नाट्यगृहात गर्दी होत असते. नाटकाशिवाय विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नाट्यगृहात होत असते. त्यातूनही पालिकेला मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत आहे. फुले रंगमंदिर शहराच्या एका कोपर्‍यात असलं तरीसुध्दा रसिकांची गर्दी होत असते. नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेची दुरूस्ती करण्याच्या नावाखाली नाट्यगृह नोव्हेंबरपासून बंद करून ठेवण्यात आलं आहे. मात्र डिसेंबर महिना संपत आला असतानाही दुरूस्तीचे काम होऊ शकलेले नाही. नाट्यगृहातील इतर सोयीसुविधा व्यवस्थित आहेत. पालिकेतील अधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वीच नाट्यगृहाची पाहणी केली. नाट्यगृहातील दिवे व इतर सुविधा योग्य असल्याचे त्यांच्या निदर्शनासही आले होते.

- Advertisement -

वातानुकूलित यंत्रणा त्वरीत दुरूस्त करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र अजूनही नाट्यगृह सुरू होत नसल्याने पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. नोव्हेंबरपासून शाळा व महाविद्यालयांचे वार्षिक स्नेहसंमेलन होत असते. त्यावेळी नाट्यगृहांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, मात्र नाट्यगृह बंद असल्याने शाळा प्रशासन व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेच्या दुरूस्तीसाठी दोन महिने नाट्यगृह बंद ठेवण्यात आल्याने लोकप्रतिनिधींमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे पालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असताना, दुसरीकडे आर्थिक उत्पन्नाकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .

पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा हा नमुना आहे. दोन महिन्यांपासून नाट्यगृह बंद असल्याने पालिकेला मिळणारे आर्थिक उत्पन्नही बुडाले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात शाळा आणि कॉलेजची वार्षिक स्नेहसंमेलने होत असतात. तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमही नाट्यगृहात होत असतात. मात्र नाट्यगृह बंद असल्याने रसिकांमध्ये नाराजी आहे. त्याला सर्वस्वी प्रशासनातील अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे बेजबाबदारपणे काम करणार्‍या अधिकार्‍यांवर आयुक्तांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.
– मंदार हळबे, विरोधी पक्षनेता,कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

- Advertisement -

नाट्यगृहाचे २०१७ चे उत्पन्न
ऑक्टोबर २०१७       २६ लाख ९८ हजार ३५५ रु.
नोव्हेंबर २०१७         ३७ लाख ५ हजार ७७८ रु.
डिसेंबर २०१७         १४ लाख ७० हजार ८०७ रु.

नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा दुरुस्तीच्या कामासाठी ऑक्टोबरपासून बंद ठेवली आहे. विद्युत विभागाकडून हे काम सुरू असून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरात लवकर नाट्यगृह सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

-अमित पंडित, सहाय्यक आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

नाट्यगृहातील एसी नादुरूस्त झाल्याने एसीचा पूर्ण प्लान्ट बदलण्याचे काम सुरू असून विद्युत विभागाकडून हे काम सुरू आहे.

– दत्तात्रय लदवा, नाट्यगृह व्यवस्थापक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -