घरCORONA UPDATEपालिकेचा शिक्षकांवर अविश्वास; तांदुळ, वह्या वाटप ऑनलाईन लाईव्ह दाखवण्याचे आदेश

पालिकेचा शिक्षकांवर अविश्वास; तांदुळ, वह्या वाटप ऑनलाईन लाईव्ह दाखवण्याचे आदेश

Subscribe

तांदुळ व वह्या वाटपाचे व्हिडिओ कॉल, व्हॉट्स अ‍ॅप, झूम किंवा गुगल ड्युओद्वारे लाईव्ह दाखवण्यात यावे असे आदेश शिक्षण विभागाकडून पालिकेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शाळेतील विद्यार्थ्यांना तांदुळ वाटप करण्यास शनिवारपासून सुरुवात केली आहे. मात्र हे तांदुळ वाटप तसेच पुढील आठवड्यात वह्या वाटप करण्यात येणार आहे. मात्र हे तांदुळ व वह्या वाटपाचे व्हिडिओ कॉल, व्हॉट्स अ‍ॅप, झूम किंवा गुगल ड्युओद्वारे लाईव्ह दाखवण्यात यावे असे आदेश शिक्षण विभागाकडून पालिकेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे अद्यापपर्यंत प्रामाणिकपणे काम करणारे शिक्षक, मुख्याध्यापक हे कोरोना काळात अचानक कसे अप्रमाणिक ठरले असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती फारच बेताची आहे. त्यामुळे कोरोनादरम्यान विद्यार्थ्यांची दोन वेळचे जेवण मिळावे या उद्देशाने मुंबई महापालिकेकडून विद्यार्थ्यांना तांदुळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काही महिन्यांपासून पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४०० ग्रॅम व सातवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ७०० ग्रॅम तांदुळ वाटप करण्यात येत आहे. जूनमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्च आणि एप्रिलमधील तांदुळ आले होते. तर आता मे आणि जूनचा कोटा आला आहे. शनिवारपासून अनेक शाळांमध्ये या वाटपाला सुरुवात करण्यात आली. मात्र हे तांदुळ वाटप करताना त्याचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण दाखवण्याच्या सूचना मुख्याध्यापक व शिक्षकांना पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यासाठीही पुढील आठवड्यात शाळेत येणार आहेत. या वह्या वाटपांचेही ऑनलाईन प्रक्षेपण दाखवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हे लाईव्ह व्हिडिओ कॉल, व्हॉट्स अप कॉल, झूम मिटिंग गुगल ड्युओमार्फत आम्हाला दाखवण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून शिक्षकांना देण्यात आले आहेत.

- Advertisement -

कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणांच्या प्रवाहात आणणे, मोबाईलमुळे शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यर्ंत शिक्षण पोहोचवणे अशी महत्त्वाची कामे शिक्षक पार पाडत असतात. त्यांच्या कामावर पालिका प्रशासनाकडून तांदुळ आणि वह्या वाटपाच्या कार्यक्रमात अविश्वास दाखवण्यात येत असल्याबद्दल शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी आम्ही तांदुळ वाटप केले तेव्हा त्याचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्याची मागणी का करण्यात आली नाही, असा प्रश्नही शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे.

वस्तूंचे वाटप एकाचवेळी करा

कोरोनामध्ये गर्दी करण्यात येऊ नये असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र पालिकेकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे तांदुळ व वह्या हे एकाच दिवशी शाळेत पाठवल्यास विद्यार्थी व पालकांना एकदाच बोलवून वह्या व तांदुळ वाटप शक्य होईल, असे शिक्षकांकडून सांगण्यात आले. परंतु पालिकेच्या मनमानी कारभारामुळे कोेरोनाच्या संसर्गामध्ये विद्यार्थ्यांना वारंवार शाळेत बोलवून त्यांचा जीव धोक्यात घातला जाण्याची शक्यताही शिक्षकांनी व्यक्त केली.

- Advertisement -

फक्त वह्यांचे काय करणार

२७ वस्तूंपैकी वह्यांचे वाटप पालिकेकडून करण्यात येणार आहे. मात्र नुसत्या वह्यांचे आम्ही काय करणार, त्याबरोबर पेन, पेन्सिल दिल्यास त्याचा फायदा होईल. आतापर्यंतचे ऑनलाईन शिक्षण हे वह्या, पेन, पेन्सिलशिवायच झाले. त्यामुळे आता वह्यांसोबत पेन, पेन्सिल, कंपास ही साहित्य किमान देण्यात यावीत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत होईल, अशी अपेक्षा अनेक पालकांकडून वर्तवण्यात आली.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -