घरमुंबईमहापालिकेची भुयारी वाहनतळ योजना बासनात

महापालिकेची भुयारी वाहनतळ योजना बासनात

Subscribe

विकासकांना टिडीआरचा लाभ देत भुयारी वाहनतळाचे सुधारीत धोरण

वांद्रे येथील पटवर्धन उद्यान आणि भायखळा येथील झुला मैदान येथे महापालिकेच्यावतीने प्रायोगिक तत्वावर बनवण्यात येणारी भूमिगत वाहनतळाची योजना बारगळली आहे. स्थानिक लोकांच्या तीव्र विरोधामुळे महापालिकेने हाती घेतली ही योजना तुर्तास बाजुला ठेवली आहे. त्यामुळे उद्यानांच्या जागेवर राबवण्यात येणारी भूमिगत वाहनतळाचे स्वप्न भंग पावले आहे. महापालिकेला स्वत:च्या निधीतून आपल्याच उद्यान व मैदानाच्या खालील बाजुस ही भूमिगत वाहनतळे बांधता येत नसल्याने त्यांनी आता मनोरंजन मैदान, उद्यान आदींच्या जमिनीखालील भूमिगत वाहनतळाचे सुधारीत धोरण बनवले आहे. ज्यामध्ये विकासकाला टिडीआर देवून वाहनतळाची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महात्मा ज्योतिबा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केटच्या समोरील वाहनतळाच्या जागेवर भूमिगत वाहनतळ बनवण्याची योजना महापालिकेने सर्वप्रथम बनवली होती. त्यासाठी कंत्राटदाराचीही नेमणूक करण्यात आली होती. परंतु माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या जावयांना हे कंत्राट दिले जाणार असल्याने याला तीव्र विरोध झाला आणि अति खर्चिक असल्याने मग महापालिकेनेही ही योजना गुंडाळली. त्यानंतर महापालिकेने वांद्रे पश्चिम पटवर्धन उद्यान आणि भायखळा येथील झुला मैदान येथे भूमिगत वाहनतळ बनवण्याची योजना तयार केली. त्यानुसार याचे आराखडे बनवण्यासाठी हाफिझ कॉन्ट्रक्टर या सल्लागाराची निवडही करण्यात आली होती. परंतु झुला मैदान येथे स्थानिक आमदार वारीस पठाण यांच्यासह काहींनी तीव्र विरोध केल्यानंतर महापालिकेने भूमिगत वाहनतळाचा विचार रद्द केला. त्यानंतर पटवर्धन उद्यान येथील भूमिगत वाहनतळालाही स्थानिक रहिवाशांसह एनजीओंनी विरोध केल्यानंतर प्रशासनाने याठिकाणची योजना गुंडाळली आहे.

- Advertisement -

त्यामुळे महापालिकेने आता मनोरंजन मैदान, क्रीडांगणे, उद्याने व बगीच्यासह खुल्या जागांकरता आरक्षित असलेल्या जमिनीखाली एक किंवा दोन तळघरांमध्ये सार्वजनिक भूमिगत वाहनतळ बनवण्याच्या सध्याच्या धोरणात सुधारणा केली आहे. सध्याच्या धोरणानुसार, मोकळ्या जमिनीखाली विकासकाने ७० टक्के जागेवर वाहनतळ बांधून महापालिकेला हस्तांतरीत केल्यास उर्वरीत ३० टक्के जागेवर विकासकाला दुकाने किंवा अन्य कार्यालय बांधता येणार होती. ज्याची विक्री करून विकासकाला वाहनतळावरील खर्च मिळवता येणार होता. परंतु याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने आता अशाप्रकारे भूमिगत वाहनतळ बांधून देणार्‍या विकासकास तेवढ्या बांधकामाचा विकास हक्क अर्थात टिडीआर देण्याचे नवीन धोरण बनवले आहे. याबाबतचे धोरण मागील आचारसंहितेमुळे मागे घेण्यात आले होते. ते पुन्हा एकदा सुधार समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

कुठे बांधू शकतो वाहनतळ
पुनर्विकास प्रकल्पामध्ये जर विकासक आपल्या प्रकल्पामध्ये भूमिगत वाहनतळ बांधणार असेल आणि तेथील आरक्षित भूखंड महापालिकेला हस्तांतरीत करायचा असल्यास, त्याला सलग वाहनतळाचे बांधकाम करता येणार आहे. मात्र,बांधकाम करताना महापालिकेच्या हद्दीत संरक्षक भिंत उभारुन त्यांचे प्रवेशद्वार वेगळे ठेवणे बंधनकारक राहणार आहे. महापालिके हस्तांतरीत करण्यात येणार्‍या वाहनतळाचे जेवढे बांधकाम असेल तेवढ्या बांधकामाचा टिडीआर विकासकाला दिला जाईल. परंतु हे बांधकाम करताना उद्यान किंवा मैदानातील झाडांची मुळे खोलपर्यंत वाढली जाईल, एवढी जागा ठेवून तळघरातील वाहनतळाचे बांधकाम करता येणार आहे. ज्यामुळे उद्यान व मैदानांच्या जागेला भविष्यात कोणताही धोका पोहोचणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -