घरमुंबईमातोश्रीत पाणी भरल्याने महापालिका झाली जागी

मातोश्रीत पाणी भरल्याने महापालिका झाली जागी

Subscribe

मिठीला जोडणार्‍या नाल्यांसह खाडीवर दरवाजे बसवणार आहेत. त्यामुळे लवकरच मिठीला जोडणारे नाल्यांवर तसेच मिठीचे मुख असलेल्या वांद्रे खाडी परिसरात दरवाजे बसवून पंपाद्वारे पाण्याचा निचरा करण्याचा विचार प्रशासन करत आहे.

पावसाळ्यात वांद्रे पूर्व परिसरात तसेच मिठीला नदीला वारंवार पूर येऊन ठिकठिकाणी पाणी तुंबले जात असून बुधवारी मातोश्रीच्या परिसरातील पाण्याचा निचरा पंप लावूनही होत नव्हता. त्यामुळे सोमवारी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी आपल्या दालनात बैठक घेऊन या तुंबणार्‍या पाण्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता मिठी नदीला मिळणारे नाले आणि मूख असलेल्या वांद्रे येथे खाडीचे पाणी मिठीत येऊ नये म्हणून यासाठी पूर निवारण दरवाजे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव मंजूर करून मातोश्रीची नाराजी ओढवून घेणारे आयुक्त आता उध्दव ठाकरेंची मर्जी राखत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

खुद्द ठाकरे कुटुंबाला ‘याचा’ झाला त्रास

बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व भागांमध्ये पाणी तुंबून राहिल्यामुळे मातोश्रीलाही याचा फटका बसला. मातोश्रीच्या परिसरात पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे खुद्द ठाकरे कुटुंबाला याचा त्रास झाल्याने सोमवारी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या दालना मिठीच्या पुरासंदर्भात विशेष बैठक बोलावण्यात आली होती. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, आबासाहेब जर्‍हाड यांच्यासह मिठी नदीशी संबंधित विभागांचे सहायक आयुक्त, तसेच पर्जन्य जलविभागाचे सहाय्यक आयुक्त संजय दराडे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

मिठी नदीला १२ ठिकाणी नाले आणि खाडीचे मार्ग जोडणार

या बैठकीत मिठी नदीतील पुराच्या पाण्याचा निचरा न होणे आणि तसेच ते पाणी माघारी फिरुन पुर परिस्थिती होणे आदींबाबत चर्चा करण्यात आली. मिठी नदीला १२ ठिकाणी नाले व खाडीचे मार्ग जोडत असून त्यामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी खाडीद्वारे मिठीच्या प्रवाहात शिरून पुरपरिस्थिती निर्माण होते. वांद्रे भागात तुंबणार्‍या पाण्याला वांद्य्राची खाडी, तसेच दादर-धारावी नाला, राजीव गांधी नाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या नाल्यांच्या आणि खाडीच्या मुखाशी पूरनिवारण दरवाजे बसवण्याचा पर्याय समोर आला आहे.

पंपाद्वारे पाण्याचा निचरा करण्याचा प्रशासनाचा विचार 

त्यानुसार मिठी नदीला जोडणारे नाले तसेच खाडीच्या परिसरात भरतीचे पाणी रोखण्यासाठी पूर निवारण दरवाजे बसवतानाच त्याठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच मिठीला जोडणारे नाल्यांवर तसेच मिठीचे मुख असलेल्या वांद्रे खाडी परिसरात दरवाजे बसवून पंपाद्वारे पाण्याचा निचरा करण्याचा विचार प्रशासन करत असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

क्रांतीनगरच्या लोकांकडे कोण पाहणार?

एकीकडे मिठी नदीमुळे कुर्ला क्रांती नगर परिसरात पाणी तुंबून सुमारे ५०० कुटुंबियांना पर्यायी घरांमध्ये स्थलांतरीत व्हावे लागते. प्रत्येक पावसाळ्यात मिठीने धोक्याची पातळी गाठली की, येथील लोकांना संसार घरेदार सोडून जीव वाचवण्यासाठी शाळांमध्ये राहावे लागत आहे. परंतु त्यांच्या दु:खाकडे कुणाचेही लक्ष नसून मातोश्रीला त्रास होताच त्यांनी तातडीने बैठक घेत यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -