याला काय म्हणावं? दार वाजवले म्हणून डोंबिवलीत एकाची हत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

रात्रीचे दार वाजवले या क्षुल्लक कारणावरून एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी मध्यरात्री डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून डोंबिवली पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून एकाला अटक केली असल्याची माहिती डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

संजय महादेव गवळी (३२) असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून तो पत्नीसह डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव, ज्योती नगर या ठिकाणी राहण्यास होता. त्याच परिसरात राहणारा आरोपी दीपक प्रभाकर मोरे (३०) हा राहण्यास आहे. आपल्या पत्नीसोबत संजयचे प्रेमसंबंध असल्याचा संशय दीपकला होता, त्यातून अनेकवेळा दोघांमध्ये वाद झाला होता. शनिवारी मध्यरात्री घराचे दार वाजले म्हणून दीपक बाहेर आला असता जवळच संजय उभा होता. संजयनेच आपल्या घराचे दार वाजवले असे वाटून दीपकने संजयला जाब विचारला. यावरून दोघांत भांडण झाले. या भांडणातून दीपकने जवळच पडलेला दगड उचलून संजयच्या डोक्यात प्रहार केला. संजय हा रक्ताच्या थारोळ्यात पडताच दीपकने त्याच दगडाने संजयची ठेचून हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच डोबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले, दरम्यान, हत्या करून फरार झालेल्या दीपकचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले. पोलीस पथकाने काही तासातच लपून बसलेल्या दीपकला डोंबिवली परिसरातून अटक केली. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर यांनी दिली.