घरमुंबईमुंबई मेरी ‘जाम’! कोंडी मुंबईची

मुंबई मेरी ‘जाम’! कोंडी मुंबईची

Subscribe

वाहतूक कोंडीमुळे सध्या मुंबई, ठाणे, कल्याणमधील नागरिक भयानक त्रस्त झालेले आहेत. घरातून कोठेही जाण्यासाठी बाहेर पडल्यानंतर प्रथम सामना करावा लागतो तो वाहतूक कोंडीचा. वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलनेही केली. मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक कोंडी व रेल्वेतील गर्दीवर तोडगा म्हणून मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. परंतु या कामांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी वाढत आहे. वाहतूक कोंडीच्या या दुष्टचक्रातून आपली कधी सुटका होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मुंबई मेरी जान, म्हणणार्‍या मुंबईकरांवर मुंबई मेरी ‘जाम’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कॉफर्ड मार्केट
सीएसएमटी, मेट्रो सिनेमा व पायधुनीकडे जाणारे रस्ते कॉफर्ड मार्केट परिसरातून जातात. तसेच या भागात असलेल्या विविध प्रकारच्या बाजारामुळे येथे प्रंचड गर्दी असते. कॉफर्ड मार्केटमध्ये फळे, भाज्या, यांच्याबरोबरच जवळच असलेल्या मनीष मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, झवेरी बाजारमध्ये दागिने, मंगलदास मार्केटमध्ये कपडे, दवा बाजारमध्ये कपडे व खेळणी, इमिटेशन ज्वेलरी, सुका मेवा यासारख्या अनेक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. येथे मध्यमवर्गीयांपासून उच्चवर्गीयांपर्यंत सर्वजण खरेदीसाठी येतात. त्यामुळे रस्त्यावरून चालण्यासाठी जागा नसते. कॉफर्ड मार्केट येथील वाहतूकतळाची जागा अपुरी पडत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्क करतात. त्यामुळे कॉफर्ड मार्केट येथे प्रंचड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असले तरी ते अपुरे पडतात.

- Advertisement -

महमद अली रोड
महमद अली रोड हा नेहमीच गजबलेला परिसर आहे. या भागात रस्त्यावर लावण्यात येणारे स्टॉल आणि दुतर्फा उभ्या करण्यात येणार्‍या गाड्या यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. महमद अली रोडपासून नळबाजार, भुलेश्वर, पायधुणी हे सतत गजबज असलेले परिसर जवळ आहेत. त्यामुळे येथे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही वर्षांपूर्वी जे.जे. हॉस्पिटल ते कॉफर्ड मार्केट असा भलामोठा पूलही उभारण्यात आला होता. परंतु तरीही या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

शिवसेना भवन, दादर
मेट्रोमुळे भविष्यात मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार असला तरी सध्या मेट्रोमुळे अनेक ठिकाणी असलेल्या खोदकामामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दादर येथे सेनाभवनच्या बाजूलाच मेट्रो ३ चे काम सुरू आहे. त्यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. मेट्रोच्या कामामुळे प्रभादेवीकडे जाणारा रस्ता अर्धा बंद केल्यामुळे वाहनांना रस्ता अपुरा पडतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथे वाहतूक विभागातर्फे योग्य ती काळजी घेण्यात येते. परंतु कोंडी टाळण्यात त्यांना फारसे यश येत नाही.

- Advertisement -

सिद्धिविनायक मंदिर
दादर पश्चिमेकडे असलेल्या सिद्धिविनायक मंदिराकडे जाताना अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. गणरायाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या प्रंचड असल्याने या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यातच आता सिद्धिविनायक मंदिराशेजारीच मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे अधिकच वाहतूक कोंडी होत असते. मेट्रोमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे कमी वेळात पार होणारे अंतर कापण्यासाठी बराच वेळ जातो.

वांद्रे कुर्ला संकुल
वांद्रे कुर्ला संकुलात मेट्रो ३ आणि मेट्रो २ बी प्रकल्पाअंतर्गत दोन्ही मेट्रो प्रकल्पांचे इंटिग्रेशन असणार आहे. बीकेसीमध्ये मेट्रोचे सर्वात मोठे स्टेशन असणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने बीकेसीमध्ये सध्या कुर्ला आणि वांद्रे अशा दोन्ही दिशेने जाणार्‍या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. भारतनगर ते कलानगर या पट्ट्यात दोन्ही दिशेने जाणार्‍या वाहतुकीवर याचा परिणाम होतो. आयकर भवन ते कलानगरदरम्यान दोन्ही बाजूला मेट्रो २ बी प्रकल्पासाठी बॅरिकेड्स लावल्याने या मार्गावरील एक लेन वाहतुकीसाठी कमी झाली आहे. त्यामुळे आयकर भवनजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

वाढत्या वाहनांमुळे रुग्ण त्रस्त
मुंबईतील प्रमुख रुग्णालयांपैकी बहुतांश मोठी रुग्णालये ही परळ भागात आहेत. तिथे पोहोचण्यासाठी मुंबईकरांना हिंदमाता-परळ परिसरातील गच्च ट्रॅफिकच्या अत्यंत खडतर संकटातून मार्ग काढावा लागतो. मुंबईत ट्रॅफिकमुळे कोंडी होणार्‍या अनेक ठिकाणांपैकी हे एक प्रमुख ठिकाण आहे. लोअर परेल उड्डाणपुल बंद केल्याने त्याचा परिणाम येथील वाहतुकीवर होताना दिसत आहे. लोअर परेल परिसरात वाढणारी कॉर्पोरेट कार्यालयांमुळे येथे वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यत गाड्यांची वर्दळ कायम असते. अनेकदा रुग्णवाहिका आल्यास तिला रस्ता मोकळा करून देण्यासाठीही मार्ग शिल्लक नसल्याने रुग्णवाहिकेतील रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना जीव मुठीत धरून वाट पाहण्याशिवाय पर्यायच नसतो. ही कोंडी फोडण्यासाठी एल्फिन्स्टन रेल्वे उड्डाणपुलाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ असल्याची माहिती स्थानिक रहिवाशी सुधा महाजन यांनी दिली.

आयआयटी मुंबई अहवाल २००९
मेट्रो २ बी एलिव्हेटेड प्रकल्प हा भूयारी पद्धतीने उभारला असता, तर २०४५ पर्यंत मुंबईकरांची १७ हजार ६६० कोटींची बचत झाली असती. सध्याच्या एलिव्हेटेड मेट्रो प्रकल्पामुळे रस्त्याची रूंदी ३० टक्क्यांनी कमी होणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळेच नऊ नियोजित फ्लायओव्हर रद्द करण्यात आले आहेत. आयआयटी मुंबईने २००९ मध्ये दाखल केलेला अहवाल हा जोगेश्वरी आणि वांद्रे दरम्यानच्या प्रकल्पाच्या निमित्ताने सादर केला होता. वेस्टर्न एक्स्प्रेसची सध्याची रूंदी २०० फुटावरून २३० फूट करण्याचेही या अहवालात सुचवले होते.

मेट्रो ३ प्रकल्पच वाहतूक कोंडी फोडणार
मुंबई मेट्रो ३ प्रकल्प २०२१ मध्ये सुरू झाल्यानंतर प्रतिदिन १२ लाख प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. पण त्यासोबतच रस्त्यावरील तब्बल ४ लाख ५० हजार वाहनांच्या फेर्‍या कमी होण्यासाठी या प्रकल्पाचा नक्कीच मोठा उपयोग होईल. त्यापुढच्या टप्प्यात २०३१ मध्ये या प्रकल्पातील क्षमतावाढीमुळे प्रतिदिन १७ लाख प्रवाशांना या टप्प्यात प्रतिदिन प्रवास करणे शक्य होईल. प्रतिदिन ६ लाख ५० हजार वाहनांच्या फेर्‍या कमी होतील. मेट्रो रेलसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधेतून रोजगाराची केंद्रे असणार्‍या बीकेसी, फोर्ट, काळबादेवी, वरळी, एमआयडीसी, सिप्झसारखे भाग जोडले जातील. त्यासोबतच हा प्रकल्प डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल अशा दोन्ही विमानतळांना कनेक्टिव्हिटी देणार आहे. मेट्रो ३ प्रकल्प नक्कीच रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
– अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

विवेक पै, वाहतूक तज्ज्ञ, मुंबई 
मुंबई मेट्रो प्रकल्प सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत जात आहे. आज मुंबईत सरासरी २ हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. या रस्त्यांची क्षमता १० ते १२ लाख वाहनांची आहे. मात्र मुंबईत सध्या २० लाखांपेक्षा जास्त वाहने धावतात. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यात मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली आहेत. यांचा फटका थेट सार्वजनिक वाहतुकीला बसत आहे. सरकारने मुंबईच्या रस्त्यांची रुंदी वाढवणे गरजेचे आहे. मुंबईतील वाहनांच्या संख्येवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
– विवेक पै, वाहतूक तज्ज्ञ, मुंबई

मेट्रो प्रकल्पाचा सरकारकडून विचार नाही 

मेट्रो प्रकल्प योग्य की अयोग्य याचा सरकारने अभ्यास केला आहे, असे वाटत नाही. प्रतितास 1 लाख 80 हजार प्रवासी वाहून नेणार्‍या व्यवस्थेची सध्या मुंबईला गरज आहे. रेल्वेची क्षमता तासाला 1 लाख 80 हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. पण सध्या रेल्वे तासाला ३ लाख ६० हजार प्रवाशांची नेआण करते. त्यामुळे मेट्रो किंवा अन्य पर्यायाचा सरकारने विचार करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी यावर विचार केला नाही. मेट्रोची क्षमता ताशी ९६ हजार प्रवासी वाहून नेण्याची आहे. त्यामुळे मेट्रोमुळे वाहतूक कोंडी सुटेल, असे म्हणणे चुकीचे आहे, असे मत वाहतूक तज्ज्ञ सुधीर बदामी यांनी व्यक्त केले आहे.

ठाणेकरांच्या नशिबी वाहतूक कोंडीचे दुष्टचक्र !
वाढती लोकसंख्या, त्याप्रमाणात वाढणारी वाहने, अरूंद रस्ते, पार्किंग धोरणाचा बट्ट्याबोळ, नियोजनाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे ठाणेकर आणि कल्याण डोंबिवलीकरांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ठाण्यातून मुंबई-अहमदाबाद तर कल्याणमधून जात असलेल्या नाशिक आग्रा मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. या वाहनांचा आकडा मोठा असल्याने शहरातील वाहतुकीवर त्याचा प्रचंड ताण पडतो. ठाण्यात सध्या सुमारे १५ लाखांपेक्षा अधिक वाहने आहेत. त्यातच दररोज 200 ते 250 वाहनांची नव्याने भर पडते. अरुंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करण्यात येणार्‍या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या रूंदीकरणास फारसा वाव नाही, त्यातच उड्डाणपुलही अपुरे पडत आहेत. कळव्याला जोडणारा जंक्शन चौक, नितीन चौक, तीन हात नाका चौक अशा महत्त्वाच्या चौकांवर वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. कोपरी पूल आणि आनंद नगर टोल नाका येथील वाहतूक कोंडीमुळे त्रस्त ठाणेकरांनी आंदोलन केले होते. टोल नाका व कोपरी पुलावरील अंतर हे 1-2 किमी आहे, परंतु गर्दीच्या वेळेत हे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊणतास लागतो. तसेच स्टेशन परिसरातून बाहेर पडल्यानंतरही वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते.

कल्याण, डोंबिवलीकर बेजार
कल्याण डोंबिवलीतही वेगळी परिस्थिती नाही. कल्याण शीळ या महत्त्वाचा रस्त्यावर नेहमीच वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सुमारे २५ ते ३० मिनिटे कोंडीतच अडकून पडावे लागते. शिवाजी चौक, दुर्गाडी चौक, लालचौकी गोविंदवाडी भिवंडी रोड आदी परिसरात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. डोंबिवलीकरही वाहतूक कोंडीने बेजार झाले आहेत. स्टेशन परिसरातील रस्ते व पदपथ फेरीवाल्यांनी व्यापल्याने पादचार्‍यांना रस्त्यावरून चालणेही कठीण होते. त्यातच अस्ताव्यस्तपणे उभ्या असणार्‍या रिक्षांमुळे कोंडी होत असते. पूर्वेतील मानपाडा रोड, कोपर उड्डाणपूल, टिळक चौक मंजुनाथ शाळा परिसर पाथर्ली चौक आदी परिसरात दररोजचीच वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीच्या या दुष्टचक्रातून नागिरकांची कधी सुटका होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी कोटीची उड्डाणे
परिस्थिती मात्र ‘जैसे थै’

ठाणे
ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी एमएमआरडीएने 223 कोटी तर ठाणे महापालिकेने चार कोटी 37 लाख रुपये खर्च करून संत नामदेव चौक (महात्मा गांधी पथ), आल्मेडा जंक्शन (एलबीएस रोड), माँसाहेब मीनासाहेब ठाकरे चौक अशा तीन ठिकाणी उड्डाणपुल बांधले. यापैकी सद्यस्थितीत वंदना सिनेमागृहाजवळील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही ‘जैसे थे’च आहे. शहरातील आराधना सिनेमा, अल्मेडा चौक, खोपट या चौकातील वाहतूक कोंडीवरही कोणता पर्याय पालिकेकडून काढण्यात येत नाही. घंटाळी येथून आराधना सिनेमाकडे जाताना तीन पेट्रोलपंप येथे तर हरी निवास सर्कल येथून तीन पेट्रोल पंप परिसरात वाहतूक कोंडी नेहमीचीच आहे. खोपट, आंबेडकर चौकातील सीएनजी गॅस भरणा केंद्रामुळे तेथील गाड्यांची रांग थेट आंबेडकर चौकापर्यंत पोहोचते. प्रचंड गाजावाजा करत शहरातील रस्ते रुंद करण्यात आले. मात्र या रुंद झालेल्या रस्त्यांवर दुकानदारांनी आपली वाहने उभी केली आहेत, तर कोठे गॅरेजवाल्यांनी रस्ते व्यापले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे.

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने वर्षभरात सुमारे सव्वा लाख नव्या वाहनांची नोंदणी केली आहे. यामध्ये 18 हजार 70 कार, 30 हजार 73 मालवाहक वाहने आणि 80 हजार 681 दुचाकींची नोंदणी झाली आहे. मागील चार महिन्यात पाच हजार 660 नव्या रिक्षांचीही नोंदणी झाली आहे. यामुळे ठाण्याच्या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण पडत आहे. शहरातील रिक्षा युनियन, ट्रक असोसिएशन, व्यापारी संघटना, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था, पालिका अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्या प्रतिनिधींसह वाहतूक सल्लागार समिती स्थापन करण्याबाबत विचार निर्माणाधीन होता. ज्यामध्ये शहरातील वाहतूक बदलांचे निर्णय घेताना समितीकडून शिफारशी मागवल्या जातील. मात्र ही बाबदेखील केवळ घोषणाच ठरली आहे.

ठाण्याचा विस्तार वेगाने होत आहे. सार्वजनिक वाहतुकीऐवजी खासगी वाहन वापरण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. नवीन रस्ते किंवा वेगळ्या मार्गाच्या निर्मितीमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र आम्ही आमच्या पद्धतीने नियोजन करीत आहोत.
– बाबाजी आव्हाड, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे.

संकलन : सौरभ शर्मा, विनायक डिगे, किरण कारंडे, नितीन बिनेकर, कृष्णा सोनारवाडकर, संतोष गायकवाड, सुबोध शाक्यरत्न

फोटो : प्रवीण काजरोळक, संदीप टक्के, अमित मार्कंडेय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -