घरमुंबईमाझेही मत ....

माझेही मत ….

Subscribe

शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण थांबावे
आज देशातील शिक्षणाचा ढासळलेला दर्जा, त्यामुळे वाढलेली बेरोजगारी, शिक्षण हक्क कायद्यांच्या अंमलबजावणीतील विलंब यावर तोडगा काढण्याची अपेक्षा येणार्या नव्या सरकारकडून आहे. निवडणूका तसेच तत्सम सरकारी कामांमध्ये शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त कार्याची जबाबदारी सोपविण्यात येते. परिणामी शिक्षकांवरील कामाचा भार वाढून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या कार्यात अडथळा येतो. तेव्हा शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त कोणतेही काम देण्यात येऊ नये यावर कडक कायदा बनविण्याची गरज आहे. तसेच मागील काही वर्षात शिक्षण क्षेत्राचे झालेले बाजारीकरण थांबावणे तसेच अल्पसंख्याक महाविद्यालयात आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती करणे हे येणार्या नवीन सरकारपुढे आव्हान असेल. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा, खोळंबलेली मागासवर्गीय शिष्यवृत्ती, शिक्षण क्षेत्रात उच्च पदस्थांच्या भरती मध्ये राजकीय पक्षांची सुरु असलेली लुडबुड, अभ्यासक्रमाचे भगवीकरण यामुळे शिक्षण क्षेत्राचे मागील काही वर्षांत बट्ट्याबोळ झाल्याचे आपण सर्वच पाहत आहोत. तेव्हा देशाच्या विकासात महत्वाचा घटक असलेल्या शिक्षण क्षेत्र आणि त्याअंतर्गत येणार्या सर्वच बाबींमध्ये बदलाच्या अनुशंगाने ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. तेव्हा देशातील नागरिकांनी निवडणूकीकडे पाठ न फिरवता मतदान करावे, असे आवाहन मी सर्व मतदारांना करतो.
-प्रो. चंद्रशील तांबे, श्रीमती चांदीबाई हिमतमल मनसुखानी महाविद्यालय, उल्हासनगर

शिक्षण क्षेत्रात बदलाची अपेक्षा
ज्या देशात शिक्षण आणि संशोधन यावर अधिक व सुयोग्य खर्च होतो, तो देश प्रगती करू शकतो. शिक्षणसम्राटांची मक्तेदारी, मरणोन्मुख मराठी शाळा, व्यवसायाभिमुख शिक्षणाचा अभाव, असे अनेक प्रश्न नव्या सरकार पुढे असतील. पाल्य शाळेत जाईल, शिकेल, टिकेल आदी मुद्दे केंद्रस्थानी ठेवून गळतीचे प्रमाण रोखताना शिक्षणाचा दर्जा व सर्वांगीण विकासाचं शिवधनुष्य नवीन सरकारला पेलावं लागेल. सुजाण प्रजा ही शिक्षणाद्वारेच निर्माण होवू शकते. हे स्वप्न वाटावं असच. परंतु, प्रयत्न केले तर अवघड नाही. समाजाच्या परिवर्तनाची पहाट ही शिक्षणाद्वारेच होवू शकते. देशपातळीवर उच्च शिक्षणात काही अभिनव उपक्रम येत आहेत. मात्र हे उपक्रम केवळ कागदावरच राहत आहेत. तेव्हा ह्या क्षेत्रात बदल घडवून आणणारे सरकार जनता निवडेल असे मला वाटते.
-प्रो. दीपक सुर्यवंशी, गुरुनानक कॉलेज.

- Advertisement -

रोजगाराभिमुख शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन केंद्रांची आवश्यकता
आज जवळपास सर्वच क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद नाही. कालसुसंगत अभ्यासक्रमांचा शिक्षणात समावेश करणे गरजेचे असताना त्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. परिणामी विद्यार्थी पदवीधर तर होत आहेत. मात्र प्रत्यक्ष नोकरी-व्यवसायात त्यांना निराशेलाच सामोरे जावे लागतानाचे चित्र आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष बेरोजगारीवर उपाययोजना करण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र निवडणूकांनंतर ही आश्वासने केवळ कागदावर राहत आहेत. आज रोजगाराभिमुख शिक्षण आणि व्यवसाय मार्गदर्शन केंद्रांची आवश्यकता असताना त्यावर ठोस उपाय कसा काढणार यावर मात्र कोणताच राजकीय पक्ष बोलताना दिसत नाही.
-सचिन दुर्गे, व्यावसायिक

शेती, शिक्षणाच्या प्रश्नांना प्राधान्य
माझ्या मते या निवडणूकीत शेती, शेतकरी, व्यावसायिक, दर्जेदार शिक्षण, विकासाचे मुद्दे व दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आदी गोष्टींचा समावेश असावा. आपला देश हा कृषिप्रधान देश असताना कृषी व कृषी व्यवसायच अडचणीत सापडले आहेत. देशाच्या विकासासाठी प्रथम आपल्याला शेती व शेतकरी आत्मनिर्भर करणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे देशाच्या विकासाचा गाडा सुरळीत चालेल. आपल्याला दैनिक जीवनात लागणार्‍या प्रत्येक गोष्टीचा अविभाज्य भाग कंन्टेंट (कच्चा माल) हा शेतीतूनच येतो. त्यामुळे शेती व शेतकरी यांचे प्रश्न सोडवणे खूप महत्वाचे आहे. शेतीबरोबर शिक्षण क्षेत्रातही खूप भर दिला गेला पाहिजे. सामान्यातील सामान्य व्यक्तीला दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. हे सर्व प्रश्न असताना देशातील राजकारण मात्र वेगळ्याच वळणावर जात असल्याचे चित्र आहे. लोकांच्या जातीय अस्मिता भडकावून, स्वतःच्या स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याचे चित्र आजच्या राजकारणात दिसते. हे असे न होता देशातील राजकारण हे समता, बंधुता, सामाजिकआत्मीयता आदी सामाजिक हिताच्या मूल्यांची जोपासना करणारे असावे.
-सौरभ साळुंखे, नोकरदार

- Advertisement -

माह्यावर लक्ष असू द्या जी !

एका आत्महत्याग्रस्त कर्जबाजारी शेतकरी कुटुंबातील महिला वैशाली येडे या बड्या आणि मातब्बर राजकारण्यांच्या विरोधात राजकीय मैदानात उतरल्या आहेत. ‘माह्यावर लक्ष असू द्या जी’ म्हणत वैशाली मतांचा जोगवा मागत आहेत. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या पक्षाकडून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात एकूण 17.5 लाख मतदार असून 11 एप्रिल रोजी या मतदारसंघात मतदान होत आहे. वैशाली या मतदारसंघात विद्यमान खासदार आणि दिग्गज राजकारणी भावना गवळी यांच्या बलाढ्य लढतीचे आव्हान आहे. त्या चक्क बसमधून गावोगावी हिंडून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. राज्यासह देशात वैशाली येडे यांच्या उमेदवारीची चर्चा होत आहे. राजकीय आघाड्यात काँग्रेसकडून मातब्बर नेते आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे उमेदवार आहेत. तर, चारवेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी या शिवसेनेकडून वैशाली येडेंच्या विरोधात उभ्या आहेत.-वैशाली येडेंचे मतदारांना आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -