घरमुंबईडोंबिवली, कल्याणमधील शोभायात्रेत नागालँड आणि काश्मिरी विद्यार्थ्यांचा सहभाग

डोंबिवली, कल्याणमधील शोभायात्रेत नागालँड आणि काश्मिरी विद्यार्थ्यांचा सहभाग

Subscribe

पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेली वृध्द, ढोल ताशांचे दिमाखादार वादन, लेझीम पथकाचे उत्कृष्ट प्रदर्शन अशा जल्लोषपूर्ण वातावरणात कल्याण-डोंबिवलीमध्ये नववर्ष स्वागत शोभायात्रा काढण्यात आली होती. तसेच जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असणा-या डोंबिवलीत गुढीपाडव्यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेली वृध्द, ढोल ताशांचे दिमाखादार वादन, लेझीम पथकाचे उत्कृष्ट प्रदर्शन अशा जल्लोष पूर्ण वातावरणात नववर्ष स्वागत शोभायात्रा काढण्यात आली होती. नागालँड आणि काश्मिरी विद्यार्थ्यांचा सहभाग हे डोंबिवलीतील शोभायात्रेमधील प्रमुख आकर्षण ठरले.

शोभायात्रेत २५ च्या आसपास चित्ररथ

सांस्कृतिक शहराचा वारसा जपत श्री गणेश मंदिर संस्थान यांच्या वतीने नववर्षाची स्वागत शोभायात्रा आज पार पडली. यंदा स्वागत शोभायात्राचे २१ वे वर्ष होते. नेहमीप्रमाणेच स्वागतयात्रेसाठी डोंबिवलीकर रस्त्यावर उतरले होते. भागशाळा मैदानापासून सुरू झालेल्या स्वागत शोभायात्रेत २५ च्या आसपास चित्ररथ सहभागी झाले होते. नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. विशेषतः फडके रोड तरुणाईने गजबजून गेला होता. रस्त्यावर भव्य रांगोळी काढण्यात आल्या होत्या. तसेच वेगवेगळे संदेश देणारे विविध संस्थाचे देखावे सहभागी झाले होते. ढोलताशे पथक, लेझीम पथक, भगवे फेटे घातलेले तरुण- तरुणी आणि वृद्ध यांनी डोंबिवली शोभायात्रा सजून निघाली होती. तसेच याठिकाणी ७० फूट लांबीची भव्य रांगोळी काढली होती. त्या रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे मतदाराला आकर्षण करण्यासाठी आणि जन जागृती करण्यासाठी मतदान करा, असा संदेश देणारा सैनिक तसेच लढाऊ मिग विमानाचा देखावा देखील या यात्रेत साकारण्यात आला.

- Advertisement -

संस्कृतीचे आदान प्रदानासाठी शोभायात्रा

नववर्षाच्या स्वागत शोभयात्रेत शहराच्या महापौर विनिता राणे, खासदार श्रीकांत शिंदे, डोंबिवली आमदार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आदींनी सहभाग घेतला होता. रशियन तरूणी रुस्लन ही सुध्दा शोभायात्रेत सहभागी झाली होती. स्वागतयात्रेतील चित्ररथ, ढोल-ताशे पथक, विविध चित्ररथ तिने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले. हिंदू संस्कृतीच्या सण- उत्सवाचे तिने कौतूक केले. कल्याण शहरातही शोभायात्रा निघाली होती. त्या शोभायात्रेत आदिवासी नृत्य आणि तारपा नृत्य हे मुख्य आकर्षण ठरले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्यावतीने ‘मतदान करा’, अशी जनजागृती करणारा चित्ररथ साकारला होता. ढोल ताशांच्या गजरात वृध्द महिला, तरूणी पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाली होती. डोंबिवलीच्या भागशाळा मैदानात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त साहसी खेळ, झांज पथक यांचे सादरीकरण करण्यात आले होते. यंदा या कार्यक्रमाला काश्मिरी आणि नागालॅण्डच्या विद्यार्थिनींनी हजेरी लावली होती. या विद्यार्थिनींनी आपली नृत्यकला सादर करत डोंबिवलीकरांची मने जिंकली. मराठी, काश्मिरी आणि नागालँडच्या संस्कृतीचे आदान प्रदान व्हावे यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शोभायात्रेतही काश्मिरी आणि नागालँडच्या विद्यार्थी सहभागी झाले होते.

उमेदवारांनी सांधली संधी ….

लोकसभा निवडणुकीची रणधुमारी सुरू झाली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातून आघाडीकडून बाबाजी पाटील तर युतीतर्फे डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित झाली आहे. नववर्ष स्वागत शोभायात्रेत हजारो डोंबिवलीकर सहभागी होत असतात. त्यामुळे शोभायात्रेच्या निमित्ताने एक प्रकारे प्रचाराची संधी साधत पाटील आणि शिंदे हे दोघेही यात्रेत सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -