घरमुंबईनियुक्त्यांसाठी वाट्टेल ते करेन - नारायण राणे

नियुक्त्यांसाठी वाट्टेल ते करेन – नारायण राणे

Subscribe

सकल मराठा समाजातील उमेदवार नियुक्त्या कराव्यात या मागणीसाठी २५ दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे हे सरकार संवेदनशील नाही, असा आरोप भाजप खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. नियुक्त्या झाल्याच पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाजातील उमेदवार आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. नारायण राणे यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेत लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उमेदवारांनी भेट घेत त्यांच्यासमोर प्रश्न मांडला असता तर, त्याचवेळी प्रश्न सुटला असता. मराठा आरक्षण लागू झाले असताना आता सकल मराठा समाजातील उमेदवारांना का डावलले जात आहे? सरकार काही त्रुटी असतील तर त्या दूर करू शकते. अधिकाऱ्यांना आदेश देऊ शकते. पण या सरकारची इछाशक्ती दिसत नाही. सोमवारी संबंधित मंत्री आणि अधिकारी यांची भेट घेत त्यांना याचा जाब विचारतो, असे आश्वासन यावेळी नारायण राणे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. आझाद मैदानात बसून काय होणार? आंदोलनाचे स्वरुप बदलले पाहिजे, तरच राज्य सरकारला जाग येईल, असेही राणे म्हणाले. मराठा आरक्षणाप्रमाणे नियुक्त्याही झाल्याच पाहिजे, त्यासाठी वाटेल ते करेन, असा विश्वास नारायण राणे यांनी आंदोलनकर्त्यांना यावेळी दिला.

- Advertisement -

राज्य सरकारच्या विविध विभागातील रिक्त पदांसाठी मराठा समाजातील उमेदवारांनी लेखी परीक्षा पास केल्या. गुणवत्ता यादीत आले. तरीही ३,५०० पात्र उमेदवारांना नियुक्तीपासून डावलले जात आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ आझाद मैदानात २८ जानेवारीपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तरीही, राज्य सरकार सकल मराठा समाजातील उमेदवारांच्या मागणीची दखल घेत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.

कलम १८ नुसार नियुक्त्या करणे बंधनकारक असून राज्य सरकार नियुक्त्या करण्यास चालढकल करत आहे. मंत्रालयात बैठका आयोजित केल्या जातात, पण ठोस उत्तर मिळत नाही, अशी तक्रार देखील उमेदवारांनी यावेळी राणे यांच्याकडे केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -