घरठाणेगुन्हेगारी पटलावरचा नवा करीम लाला

गुन्हेगारी पटलावरचा नवा करीम लाला

Subscribe

ड्रग्स माफिया करीम लालाच्या मागावर एनसीबी,तीन साथीदारांना मुंबईतून अटक

गुन्हेगारी जगतातील एकेकाळचा कुख्यात गुन्हेगार, ड्रग्स तस्कर करीम लाला याच्यापासून प्रभावित होऊन भविष्यात स्वतःला दुसरा करीम लाला समजणारा अब्दुल करीम शेख उर्फ करीम लाला याच्या तीन साथीदारांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने एमडी ड्रग्ससह मुंबईतील पश्चिम उपनगरातून अटक केली आहे. या तिघांकडून एनसीबीने 100 ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. मेहूल मिस्त्री, शब्बीर आणि अफजल असे अटक करण्यात आलेल्या अब्दुल उर्फ करीम लाला याच्या साथीदारांचे नाव असून करीम लाला याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती एनसीबीचे मुंबई परिमंडळाचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली. दरम्यान, 31 डिसेंबर रोजी केलेल्या आणखी एका कारवाईत एकाला अटक करून त्याच्याकडून अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला होणार्‍या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा पुरवठा होत असल्याच्या माहितीवरून एनसीबीच्या मुंबई परिमंडळाचे संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथील बड्या वस्त्यांवर लक्ष केंद्रित केले होते. 31 डिसेंबरच्या रात्री एनसीबीच्या पथकाने कुर्ला, अंधेरी, वर्सोवा आणि नवी मुंबई येथे छापेमारी करून चार जणांना एमडी (मेफेड्रोन) आणि नशेच्या अमली पदार्थांसह अटक करण्यात आली. त्यापैकी मेहुल मिस्त्री, शब्बीर आणि अफजल या तिघांकडे 100ग्राम एमडी पावडर मिळून आली असून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता हे तिघे अब्दुल उर्फ करीम लाला याच्यासाठी काम करीत असल्याची माहिती समोर आली.

- Advertisement -

अब्दुल उर्फ करीम लाला याच्याबाबतची अधिक माहिती मिळवण्यात आली असता अब्दुल उर्फ करीम लाला हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स माफिया असून त्याच्या हाताखाली 150 च्या आसपास लहान ड्रग्स पेडलर काम करीत असल्याचे उघड झाले. करीम लाला याने राज्य आणि राज्याच्या बाहेर देखील आपले अमली पदार्थाच्या धंद्याचे जाळे पसरवले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत या शहरावर त्याने याआधीच लक्ष केंद्रित केलेले आहे, एमडी ड्रग्सचा मोठा तस्कर असणारा अब्दुल उर्फ करीम लाला हा मागील चार ते पाच वर्षात अमली पदार्थाच्या धंद्यात मोठा तस्कर बनला असल्याची माहिती एनसीबीच्या संचालकांनी या प्रतिनिधीला दिली.

अब्दुल अन्वर शेख उर्फ करीम लाला हा मूळचा मुंबईतील पश्चिम उपनगरातील वर्सोवा परिसरात राहणारा आहे. वांद्रे येथे रस्त्यावर कपड्याचा व्यवसाय करणार्‍या अब्दुलने 7 ते 8 वर्षांपूर्वी छोटा मोठा ड्रग्सचा धंदा सुरू केला. अब्दुल अन्वर शेख उर्फ करीम लाला याने 19 व्या शतकातील गुन्हेगारी जगतातील कुख्यात गुन्हेगार, ड्रग्स तस्कर करीम लाला याला आपले आदर्श मानत स्वतःला त्याची जागा घेण्याचे स्वप्न बघून स्वतःचे नाव त्याने करीम लाला असे अंगिकारले. त्यानंतर ड्रग्सच्या धंद्यात त्याची ओळख करीम लाला म्हणून झाली.

- Advertisement -

अब्दुल उर्फ करीम लाला याने वांद्य्रातील एका मॉलमध्ये दुकान घेऊन त्या दुकानात तो कपडे विकू लागला. कपड्याच्या आडून त्याने ड्रग्सचा धंदा सुरू केला. आपली काही माणसे ड्रग्सच्या व्यवसायात उतरवली. हळूहळू त्याने ड्रग्सच्या धंद्यात चांगलाच जम बसवून पश्चिम उपनगरातील पब्ज, डिस्कोथेफ, पार्ट्यांमध्ये ड्रग्सचा पुरवठा करू लागला. मागील चार ते पाच वर्षात त्याने ड्रग्सच्या धंद्याचे जाळे राज्यभर तसेच राज्याच्या बाहेर पसरवले. एनसीबीच्या दोन गुन्ह्यात तो फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -