घरमुंबईकाँग्रेसच्या कणखर भूमिकेमुळे राष्ट्रवादीनेही फिरवली मनसेकडे पाठ

काँग्रेसच्या कणखर भूमिकेमुळे राष्ट्रवादीनेही फिरवली मनसेकडे पाठ

Subscribe

विशेष प्रतिनिधी:-येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेतल्यास केवळ राज्यातच त्याचे परिणाम होणार नाहीत तर देशांतर्गत राजकारणावर त्याचे पडसाद उमटतील, या काँग्रेसच्या इशार्‍यानंतर मनसेला आघाडीत न घेण्याच्या निर्णयाप्रत राष्ट्रवादी आली असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रातील अमराठींबरोबरच उत्तर प्रदेश आणि बिहार या मोठ्या राज्यात मनसेला बरोबर घेण्याच्या निर्णयाचे भाजपकडून पध्दतशीर राजकारण केले जाण्याची शक्यता काँग्रेसने वर्तवली. यामुळे राज्यात हा प्रयोग घातक ठरेल, अशी सूचना काँग्रेस अध्यक्षांनी दिल्यावर मनसेला सोबत घेण्याचा आपला मूळचा विचार राष्ट्रवादीला बदलावा लागल्याचे सांगण्यात आले आहे.

आगामी निवडणुकांमध्ये मनसेला सोबत घेण्याचा इरादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्तवला होता. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी याबाबत ठाम भूमिका घेत मनसेला सोबत घेण्यास ठाम नकार दिला होता. या नकारानंतरही राष्ट्रवादी आपल्या भूमिकेशी ठाम होती. याच दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शरद पवार यांच्याशी दोनवेळा चर्चाही झाली. या चर्चेमुळे महाआघाडीत मनसेचा समावेश होईल, असे बोलले जात होते.

- Advertisement -

भाजपविरोधात महाआघाडी बनवण्याबाबत राज ठाकरे यांनी घेतलेल्या पुढाकाराची दखल घेत राष्ट्रवादीने राज यांच्या हातावर घड्याळ लावण्याचा चंग बांधला होता.पण राज यांच्या सहभागाने राज्यात आणि देशातही होणार्‍या राजकीय परिणामांची चर्चा काँग्रेस स्तरावर होऊ लागली होती. हे प्रकरण संजय निरुपम यांनी पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्या कानी घातले. मनसेच्या सहभागामुळे राज्यातील अमराठी मतदार आघाडी विरोधात जाईल, शिवाय याचे परिणाम बिहार आणि उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये होतील, असे निरुपम यांनी राहूल गांधी यांच्या कानी टाकले.

काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीसह बहुजन समाज पार्टी आणि बिहारमध्ये शरद यादव यांच्या जनता दल(एस)बरोबर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेसोबतच्या सहभागाने या पक्षांबरोबरील संबंध विस्कटतील, हे राहुल यांनीही गंभीरपणे पवारांच्या कानी टाकले. विशेषत: राज यांनी आजवर भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर परखड टीका केली. यामुळे भाजप नेते राज यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. अशावेळी राज यांच्या आघाडीतील सहभागाचे भाजपकडून पध्दतशीर राजकारण केले जाईल आणि त्याचे परिणाम सर्वदूर होतील, या भीतीने राहूल गांधी यांनी थेट पवारांना सूचित केले आणि राज यांना तुर्तास दूर राखण्याचा निर्णय राष्ट्रवादीला घ्यावा लागल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

कार्यशैलीचाही परिणाम

महाआघाडीत मनसेला घेण्यासाठी आमचा पाठिंबा होता. मात्र काँग्रेसने मनसेला विरोध केला होता. राज ठाकरे यांची कार्यशैली आणि पक्षाची विचारधारा पाहता त्याचे पडसाद आघाडीच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता आहे. यामुळेच मनसेशिवाय निवडणुका लढण्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतला आहे.
नवाब मलिक  प्रवक्ते, राष्ट्रवादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -