राष्ट्रवादीची मुंबईत आज चिंतन बैठक; पराभवाची कारणे शोधणार

राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुन्या पदाधिकाऱ्यांना बाजूला करून नवीन चेहऱ्यांना पक्षात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पक्षात महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत.

Mumbai
ncp party meeting
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेनेकडून स्विकाराव्या लागेलेल्या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची १ जून रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनिती देखील ठरवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुन्या पदाधिकाऱ्यांना बाजूला करून नवीन चेहऱ्यांना पक्षात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचा दारूण पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पाच जागा जिंकण्यात यश मिळाले होते. राष्ट्रवादीला ११ जागा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र युती समोर राज्यात राष्ट्रवादीचा देखील टिकाव लागला नाही. त्यामुळे याची दखल घेत विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर काही बदल करण्याचे ठरवले आहे.

बैठकीत पराभवावर विचार होणार

दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची चार दिवसांपूर्वी संयुक्त बैठक देखील झाली होती. या बैठकीत नेमका पराभव का झाला? यावर चर्चा देखील करण्यात आली होती. तसेच आगामी लोकसभा निवडणूक आघाडीने एकत्र लढावी हा निर्णय देखील घेण्यात आला. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर १ जून रोजी नरिमन पाँइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी १० वाजता कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर शरद पवार स्वत: आपल्या पक्षाच्या पराभवाचे कारणीमांसा करण्याबरोबरच पराभवामागील कारणांचा शोध घेणार आहेत. त्यानंतर दुपारी  पक्षाची सर्वसाधारण बैठक होणार असून, त्यामध्ये आमदार, खासदार आणि निवडणूक लढलेले नेते आणि कार्यकारिणीतील लोक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पवार स्वत: लोकसभा निवडूकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणूकीबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचेही राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार

आगामी विधानसभा निवडणुकीला सामारे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवीन चेह-यांना संधी देण्यात येणार आहे. ताज्या दमाच्या नवीन चेह-यांना पक्षात पुढे आणण्याची योजना पक्ष नेतृत्वाने आखली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी नव्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे.