गोवंडीत NCP नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोहसिन शेख यांच्यावर अज्ञातांनी कुऱ्हाड आणि तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात मोहसिन शेख गंभीर जखमी झाले आहेत.

Mumbai
NCP corporator's husband assaulted
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतल्या गोवंडी भागामध्ये ही घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोहसिन शेख यांच्यावर अज्ञातांनी कुऱ्हाड आणि तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात मोहसिन शेख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जैन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. असे सांगितले जात आहे की, मोहिसन शेख गोवंडी येथील त्यांच्या कार्यालयातून फोनवर बोलत बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

अशी घडली घटना

या हल्ल्याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये मोहसिन शेख यांनी असे सांगितले आहे की, गोवंडी भागामध्ये असणाऱ्या कार्यालयातून मी बाहेर पडलो त्यावेळी चार अज्ञातांनी त्यांच्यावर कुऱ्हाड आणि तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला, डोळ्याला, पोटाला आणि हाताला गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले असून तीन हल्लेखोरांची ओळख पटली आहे. हे हल्लेखोर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

राजकिय वादातून हल्ला केल्याचा आरोप

मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दीना पाटील यांनी या हल्ल्यावर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी हा हल्ला राजकीय कटातून झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, मोहसिन शेख यांच्यावर हल्ला करण्यामागे राजकीय कारण आहे. निवडणुकीला प्रभावित करण्यासाठी त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

आरोपींचा शोध सुरु

नादिया शेख या गोवंडी वार्ड क्रमांक १४० च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. त्यांचे पती मोहसिन शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. असे सांगितले जात आहे की, निवडणुकीवरुन त्यांचे दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला होता. पोलिसांना संशय आहे की, कदाचित या वादातूनच मोहसिन शेख यांच्यावर हल्ला झाला. सध्या पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here