फेसबुक, ट्वीटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? हे जाहीर करावे – राष्ट्रवादीची मागणी

फेसबुक आणि ट्वीटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? ही फेक अकाऊंट कुठल्या आयपी अॅड्रेसवरून तयार करण्यात आली याची माहिती द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून करण्यात आला असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे. सुशांतसिंग रजपूतच्या आत्महत्या प्रकरणात फेसबुक आणि ट्वीटरवर ८० हजार फेक अकाऊंट खोलण्यात आली. यातून सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी आणि मंत्र्यांची बदनामी करुन बिहारच्या निवडणुकीत राजकीय फायदा होईल यासाठी ही अकाऊंट खोलण्यात आल्याचा पर्दाफाश मिशीगन युनिव्हर्सिटीच्या नामांकित तज्ज्ञांनी तयार केलेल्या अहवालात केला आहे.

मीडिया ट्रायल होऊ नयेत…

सुशांतसिंग रजपूत आत्महत्या प्रकरणात (Sushant Singh Rajput Suicide Case) भाजपाने व त्यांच्या आयटी सेलने महाविकास आघाडी व मुंबई पोलिसांना बदनाम केल्याचे आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचे मिशीगन युनिव्हर्सिटीच्या अहवालात नमूद आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले. दरम्यान, केंद्राने एखाद्या खटल्याचा किंवा प्रकरणाचा न्यायालयीन तपास सुरू असताना कोणताही मिडिया ट्रायल होऊ नयेत असा कायदा भविष्यात करावा, अशीही मागणी महेश तपासे यांनी यावेळी केली.

पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी सोशल मीडिया साईट्सवर तब्बल ८० हजार Fake Accounts बनवण्यात आल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. यासंदर्भात Information Technology Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुबई सायबर सेल पुढील तपास करत असल्याचं देखील आयुक्तांनी सांगितलं आहे.