गणेश नाईक ४८ नगरसेवकांसह भाजपात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतले दिग्गज नेते गणेश नाईक यांनी मुलगा संजीव नाईक याच्यासोबत बुधवारी जाहीर कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला.

Navi Mumbai
Ganesh Naik Joins BJP
गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी कामगार मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाबद्दल तर्क-वितर्क केले जात होते. स्वत: सुप्रिया सुळे यांनी देखील नवी मुंबई दौऱ्यादरम्यान गणेश नाईक अजूनही राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहेत, असं ठामपणे सांगितलं होतं. मात्र, अखेर बुधवारी गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीच्या ४८ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतले दिग्गज नेते असलेल्या गणेश नाईक यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला हा मोठा झटका मानला जात आहे.

सुप्रिया सुळेंचा विश्वास फोल

गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नवी मुंबईत मोठा झटका बसला आहे. गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने नेते होते. ते शरद पवारांची साथ सोडणार नाहीत, असा विश्वास काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला होता. मात्र, बुधवारी त्यांनी मुलगा संजीव नाईक यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५ वर्षांच्या कारकिर्दीसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीचं देखील कौतुक केलं.


हेही वाचा – हर्षवर्धन पाटील हे काँग्रेससाठी बुलेटप्रूफ जॅकेट होते-मुख्यमंत्री

‘गणेश नाईक भाजपमध्ये आल्यामुळे नवी मुंबईबाबत आम्ही निश्चिंत झालो आहोत. इथल्या प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारी पातळीवर लवकरच पावलं उचलली जातील. नाईकांच्या रुपाने नवी मुंबईतल्या मोठ्या मतदारवर्गाचा देखील पाठिंबा आता भाजपला मिळेल’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.