पालिकेत आयुक्तांच्या दालनाबाहेरच तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न!

परिसरातील शौचालय धोकादायक ठरवून बंद केल्याचा निषेध म्हणून एका तरूणाने पालिकेतील आयुक्तांच्या दालनाबाहेरच स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी पालिकेत घडली.

Mumbai
sudam shinde
स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न करणारा हाच तो सुदाम शिंदे

घाटकोपर भटवाडी येथील सार्वजनिक शौचालय धोकादायक ठरवून बंद करण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेल्या तरुणाने सोमवारी महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोरच रॉकेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल. परंतु महापालिका सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगवधनामुळे हा प्रसंग टळला. त्यामुळे याप्रकरणी तरुणाला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या घाटकोपर पश्चिम विभागाचा अध्यक्ष आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून शौचालय धोकादायक

घाटकोपर भटवाडी येथील सुदाम शिंदे यांनी या परिसरातील सार्वजनिक शौचालय बंद करून नये, अशी तक्रार पालिकेकडे केली होती. परंतु शौचालय धोकादायक असल्याने ते बंद करावं लागेल, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांचे म्हणणे होते. पण स्थानिक लोकांचा विरोध अधिक असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेच्या एन विभागाने शौचालय धोकादायक असल्याचे फलक लावले. त्यामुळे सुदाम शिंदे यांनी ‘आपण सोमवारी आयुक्तांना भेटणार असून जर शौचालय सुरु न केल्यास आपण आयुक्तांच्या दालनाबाहेर आत्मदहन करू’, असा इशारा दिला होता.

दुसऱ्याच्या नावाने बनवला पालिकेचा पास

याबाबतची कल्पना असल्याने महापालिका मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली होती. परंतु सुदाम शिंदे यांना ओळखत नसल्याने त्यांनी प्रवेशद्वार क्रमांक ७ मधून दुसर्‍याच्या नावावर पास बनवून त्याच्या मदतीने मुख्यालयात प्रवेश केला. त्यानंतर दुपारी दीड वाजता आयुक्तांच्या दालनासमोर जाऊन हातातील रॉकेलची बाटली स्वत:वर ओतून घेण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा जवानांनी त्याला ताब्यात घेतले. बिसलेरी बाटलीतून पांढरे रॉकेल आणल्याने सुरक्षा रक्षकांच्या लक्षात ही बाब आली नाही. परंतु त्याला ताब्यात घेऊन सुरक्षा रक्षक विभागाने त्याला आझाद मैदान पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.