मुजोर टॅक्सी चालकांचा त्रास खासदारांनाही; सुप्रिया सुळेंनी केली तक्रार

Mumbai
ncp mp supriya sule angry on taxi driver at dadar railway station
खासदार सुप्रिया सुळे दादर स्थानकात टॅक्सी चालकावर संतापल्या

दैनंदिन जीवनात सामान्य माणूस टॅक्सी आणि रिक्षा चालकांची मुजोरी अनुभवत असतोच. मात्र हे टॅक्सी चालक सामान्य माणूसच काय तर खासदारांनाही घाबरत नसल्याचा एक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दादर रेल्वे स्थानकात टॅक्सी चालकाच्या अरेरावीला सामोरे जावे लागले. सुळे या आज सकाळी दादर स्थानकात उतरल्या असताना एका टॅक्सी चालकाने ट्रेनमध्ये शिरुन टॅक्सी हवी आहे का? अशी विचारणा केली. टॅक्सीला नकार देऊनही मुजोर टॅक्सीचालकाने सुळे यांची वाट अडवून ठेवली. यानंतर सुळे यांनी संबंधित टॅक्सी चालकाची आरपीएफ आणि रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार केली.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे आपली तक्रार केली आहे. यामध्ये त्या म्हणतात की, “आज दादर स्थानकात एक विचित्र अनुभव आला. कुलजीत सिंह मल्होत्रा नावाचा माणूस माझ्या ट्रेनमध्ये शिरला आणि टॅक्सीसाठी विचारणा करु लागला. त्याला दोनदा नकार देऊनही त्याने माझी वाट धरून ठेवली. मला त्रास देऊनही वरून तो माझ्याकडे निर्लज्जपणे फोटो मागत होता.”

आणखी एका ट्विटमध्ये सुळे यांनी दादर स्थानकातील आरपीएफ पोलिसांचे आभार मानले आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी संबंधित टॅक्सी चालकाला अटक करुन त्याला दंड ठोठाविला असून तसा मेसेज सुळे यांना केला आहे. सुळे यांनी यावेळी रेल्वे मंत्रायलयाला आपल्या ट्विटमध्ये टॅग केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, रेल्वे प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी रेल्वे मंत्रालयाने लक्ष घातले पाहीजे. टॅक्सीची विचारणा करण्याचा कायदा असेल तर किमान रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर टॅक्सी चालकांना टॅक्सीची विचारणा करण्यापासून रोखले पाहीजे. त्यांनी अधिकृत टॅक्सी स्टँडवरूनच आपल्या सेवेची विचारणा करायला हवी, असेही सुळे म्हणाल्या आहेत.