घरदेश-विदेशराष्ट्रवादी ,शिवसेना सह काँग्रेस मधील २४ नगरसेवक संपर्कात - भाजप

राष्ट्रवादी ,शिवसेना सह काँग्रेस मधील २४ नगरसेवक संपर्कात – भाजप

Subscribe

शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी गेल्या आठवड्यात भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौगुलेंचा त्यांच्या मर्जीतल्या नगरसेवकांसह पक्ष प्रवेश होईल असे तर्क वितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. त्याचवेळी नवी मुंबई शहरातील २४ नगरसेवक थेट माझ्या संपर्कात असून ते पक्ष प्रवेशासाठी उत्सुक असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केला आहे. त्यामुळे कोणते नगरसेवक फुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होणार असल्याने त्याची चाचपणी प्रत्येक राजकीय पक्षांकडून केली जात आहे.भाजप हा भारतातला प्रमुख पक्ष असल्याने त्याला पराभूत करण्यासाठी अनेक पक्ष सरसावले आहेत. त्याच वेळी अनेकजण त्या पक्षात जाण्यास इच्छुक आहेत. मात्र नेमके कोण, कोणत्या पक्षात जाणार आणि कोणत्या पक्षाला खिंडार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. मात्र त्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिल्याने आता सर्वांचे लक्ष शिवसेनेकडे लागले आहे.

- Advertisement -

शिवसेना नेते आणि माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्यानंतर ते पद अनेक वर्षे रिक्तच ठेवण्यात आले होते. त्यांच्या नाराजीचा फटका सेनेला पडू शकतो, या विचाराने पद रिक्त ठेवण्यात आले आहे. मात्र ते आता दोघांना देण्यात आले.यावरही पक्षात नाराजी पसरली आहे. या निर्णयाविरोधात अनेकजणांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांची वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणी करण्यात आल्यानंतर माघार घेण्यात आली आहे. त्यामुळे बदल्याची आग आजही शिवसेनेत धुसमत असल्याने याचा येत्या निवडणुकीत स्फोट होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी भाजप सज्ज असतानाच इतर पक्षात कोण नाराज आहे आणि कोण आपल्याकडे येऊ शकतो, यावर भाजप लक्ष ठेऊन आहे.याचीच चाचपणी करण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस,राष्ट्रीय काँग्रेससह शिवसेना पक्षातील तब्बल २४ नगरसेवक थेट माझ्या संपर्कात असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षप्रवेश करण्यात येईल अशी माहिती भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी दिली.

- Advertisement -

भाजपमध्ये येण्यास आजही अनेक नगरसेवक उत्सुक असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना पक्षातील नगरसेवकांचा सहभाग आहे. तब्बल २४ नगरसेवक संपर्कात आहेत. यात एकाच घरातील तीन नगरसेवकांचाही समावेश आहे. काहींनी थेट आमची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून द्या असा आग्रह धरला असल्याने सर्वांना योग्य वेळ येताच प्रवेश दिला जाणार आहे. काहीजण लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निर्णयावर लक्ष ठेऊन असून त्यानंतर त्यांचा निर्णय होणार आहे. २४ नगरसेवक तर आजही संपर्कात आहेत. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता असल्याने आम्ही कोणालाही प्रवेश नाकारत नाही, भाजपमध्ये इनकमिंग सुरू असून आउटगोईंग नाही.
-रामचंद्र घरत, नवी मुंबई, जिल्हाध्यक्ष,भाजप.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची मी माझ्या समाजाच्या काही कामासाठी भेट घेतली आहे. तो प्रश्न त्यांच्याशी निगडीत असल्याने त्यांची भेट घेणे गरजेचे होते. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात काय होते याला काही अर्थ नाही. मला जर कोणत्या पक्षात जायचे असेल तर मी बेधडक जाईन. लपूनछपून जायचे हे माझ्या रक्तातच नाही.आजही आम्ही शिवसैनिक आहोत आणि मी त्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता आहे. त्यामुळे पक्ष बदलण्याचा प्रश्नच येत नाही.
-विजय चौगुले, माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, शिवसेना.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -