भाजप सरकारला जमिनीवर आणण्यासाठी सज्ज व्हा -छगन भुजबळ

भाजपा सरकारला जमिनीवर आणण्यासाठी परिवर्तन घडवावे लागेल असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळयांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे भिवंडीमध्ये भाजप सरकारवर कसून टीका केली.

Mumbai
Chagan bhubal
कार्यक्रमादरम्यान छगन भुजबळ भाषण करताना

“हवेत असलेल्या या सरकारला जमिनीवर आणण्याचे काम तुम्हा-आम्हाला करायचे आहे त्यासाठी सज्ज व्हा.” असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भिवंडी येथील जाहीर सभेत केले. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून भाजप सरकार मंदिर मस्जिदीचा मुद्दा घेवून सरकार धंदा करत आहे. राम रहीम हे एक होते परंतू या लोकांनी त्यांना बाजुला केले असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला. ज्येष्ठनेते आमदार छगन भुजबळ यांची मुलुखमैदान तोफ आजही भिवंडीमध्ये धडाडली.

राफेलचा ठेक्यावरून केली टीका

ज्याने कधी खेळण्यातली विमानं कधी बनवली नाहीत त्या अंबानीला राफेलची विमानं बनवण्याचा ठेका देण्यात आला असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मालमत्ता कर एक ते दीड लाखावर गेला आहे कसे उद्योगधंदे राहणार. आज आरोग्य धोक्यात आले आहे. १९९६ मध्ये २ लाख लोकसंख्या होती त्यावेळी ११५ डॉक्टर होते परंतू आज १८ लाखाच्यावर लोकसंख्या गेली आणि डॉक्टर फक्त ३६ आहेत लोकांनी जगायचे कसे असा सवालही आमदार छगन भुजबळ यांनी केला.

देशात हुकुमशाही येतेय त्यामुळे येणाऱ्या निवडणूका महत्वाच्या 

भाजपाने देश हुकुमशाही कडे न्यायला सुरुवात केली असून मागच्या दाराने आणीबाणी आणली आहे. अगदी असहिष्णूतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूका फार महत्त्वाच्या आहेत असे स्पष्ट मत विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भिवंडी येथील जाहीर सभेत केले. वाढत्या महागाईमुळे जगणं मुश्किल झाले आहे. ग्राहक आणि शेतकरी समाधानी नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांला आम्ही अडचणी येवू दिले नाही. त्यांना कर्जमाफी दिली, अडचणीला धावून गेलो परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे असा आरोपही पवार यांनी केला.

बेस्टचा संप का मिटवत नाही, मुंबईकरांचे हाल का करताय? नेतृत्वात ताकद असली पाहिजे, निर्णय घेण्याची धमक असली पाहिजे. अहो एक दिवस समजू शकतो सात दिवस झाले संपाला, परंतु अजुन निर्णय नाही हे काय चालले आहे असा सवाल अजितदादा पवार यांनी केला.

‘आम्ही नाही त्यातले’ अशी शिवसेनेची भूमिका

भाजपसोबत ५० टक्के पापात सहभागी असलेली शिवसेना ‘आम्ही नाही त्यातले’ अशी भूमिका घेवून विरोधी पक्षाचे विचार मांडत आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी भिवंडी येथील जाहीर सभेत केले. देश आणि राज्यातील भाजप सरकार बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा राज्यभर काढण्यात येत असून नरेंद्र आणि देवेंद्र यांनी कशी फसवणूक केली आहे याची माहिती जनतेपर्यंत पोचवणार असल्याची माहितीही जयंतराव पाटील यांनी दिली.

कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,भिवंडी जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे आदींसह भिवंडी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here