घरमुंबईराष्ट्रवादी चार जागा सोडणार

राष्ट्रवादी चार जागा सोडणार

Subscribe

कल्याण-डोंबिवलीची जागा मनसेकडे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामील करुन घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मनसेसाठी कल्याण-डोंबिवलीची जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. याबरोबर इतर मित्र पक्षांसाठी चार जागा सोडण्याबाबतही गुरुवारी चर्चा करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या चार जागांमध्ये एक मनसे, राजू शेट्टींसाठी दोन, सीपीएमला एक जागा देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ठरविण्यासाठी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संसदीय समितीची विशेष बैठक बोलविण्यात आली होती. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत वरील निर्णय झाल्याचे कळते.या बैठकीत मनसेला १, राजू शेट्टी यांना २ तर सीपीएमला १ जागा सोडण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ४४ जागांवर एकमत झाले असल्याचे सांगितले होते. उरलेल्या चार जागा मित्र पक्षांना सोडणार असल्याचेही ते म्हणाले. याचा अर्थ महाराष्ट्रातील ४८ जागांची चर्चा पूर्ण झाली असून या चर्चेत कुठेही प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख आलेला नाही. त्यामुळे महाआघाडीत प्रकाश आंबेडकर ‘वंचित’ राहणार की काय, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

- Advertisement -

महाआघाडीत मनसेला घेण्यासंबंधी राष्ट्रवादीचे नेते इच्छुक आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. त्यातच गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी मनसेला सोबत घेण्याचे पुन्हा एकदा बोलून दाखवले. तसेच मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसशी चर्चा करणार असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले. मात्र मनसेला सोबत घेतले तर त्यांना मतदारसंघ कोणता सोडायचा? हा देखील एक प्रश्न समोर आला असून त्याला कल्याण डोंबिवली या मतदारसंघाचे उत्तर शोधण्यात आल्याचे बोलले जात आहे.

कल्याण-डोंबिवली मतदारसंघात २००९ साली आनंद परांजपे शिवसेनेकडून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे २०१४ साली हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आला. मात्र मोदीलाटेत कल्याण-डोंबिवलीच्या जागेवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे निवडून आले. या मतदारसंघात मनसेचीही बर्‍यापैकी ताकद आहे. कल्याण-डोंबिवली हे शहर राज ठाकरेंच्या आवडीचे शहर मानले जाते. २०१४ च्या निवडणुकीनंतर आनंद परांजपे लोकसभा लढवतील की नाही, याबाबत संभ्रमावस्था होती.

- Advertisement -

आनंद परांजपे यांच्याकडे सध्या ठाणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. ठाणे शहरात त्यांनी संघटनात्मक पातळीवर चांगले काम सुरू केले आहे. पुन्हा कल्याण-डोंबिवलीमध्ये जाण्याचा त्यांचा विचार नसल्याचे सुत्रांकडून कळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी जर मनसेला घेण्यास इच्छुक आहे, तर स्वतःच्या कोट्यातील जागा त्यांना सोडावी लागेल आणि ती जागा कल्याण-डोबिंवलीची आहे, असे तरी सध्या दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -