घरमुंबईमोदींची एक्सपायरी डेट जवळ आली!

मोदींची एक्सपायरी डेट जवळ आली!

Subscribe

ममतांच्या विरोधक महासभेत २२ विरोधी नेत्यांची हजेरी,भाजपचे तीन बंडखोर नेते विरोधकांच्या व्यासपीठावर

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी येथील ऐतिहासिक ब्रिगेड मैदानात संयुक्त भारतीय विरोधक महासभेचे आयोजन केले होते. या सभेत तब्बल २२ पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. सभेद्वारे विरोधी पक्ष नेत्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले असून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. विरोधकांच्या एकीमुळे मोदी सरकारची एक्सपायरी डेट जवळ आली असून आता सरकारवर घरी बसण्याची येणार आहे, अशी खरमरीत टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या या महासभेला अंदाजे १० लाख लोक उपस्थित असल्याचे सांगितले गेले. सभेला उपस्थित विरोधी पक्ष नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान, तीन मुख्यमंत्री, तीन मुख्यमंत्री, यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांसारखे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप आमदार शत्रुघ्न सिन्हाही उपस्थित होते. या विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या आरोपांना उपस्थितींमधून टाळ्या, शिट्ट्यांनी प्रतिसाद मिळत होता.

- Advertisement -

या सभेत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. औषधांच्या एक्सपायरी डेटसारखी मोदी सरकारची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. मोदी सरकारला घरी पाठवण्याची ही वेळ आहे. मोदी सरकारच्या काळात जनतेला अच्छे दिन आलेले नाहीत. त्यामुळे एक एक करून भाजपला सर्व राज्यातून हद्दपार करायचे आहे. भाजपला घरी बसवण्याचा निर्धार देशातील जनतेने केला आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पक्षासाठी एकत्र नाही -शरद पवार
देशाच्या संविधानिक संस्थांवर हल्ला होत आहे. देशातील उद्योग बंद होत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. अशा सरकारला बाहेरचा रस्ता दाखवणे आपले कर्तव्य आहे. हे काम आपण सगळे मिळून हे काम करू. आम्ही इथे देशाच्या हिताच्या रक्षणासाठी आलो आहोत. कुठल्या पदाच्या आशेने नाही. आम्हाला जनतेने खूप काही दिले. मला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले, खासदारपद, मंत्रीपद मिळाले. आता मला काही नको. आम्हाला शेतकरी, महिला, अल्पसंख्य, दलित यांच्या हिताची रक्षा करायची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधानांची लाज वाटते -केजरीवाल
महिलांविरोधात लिहिणार्‍यांना पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर फॉलो करतात. अशा पंतप्रधानाची मला लाज वाटते, अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली. तर नरेंद्र मोदी हे तर खोटं बोलायची फॅक्टरी आहेत, असे राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव म्हणाले. आगामी लोकसभा निवडणूक ही देशासाठी दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे, अशी टीका द्रमुक पक्षाच्या स्टॅलिन यांनी केली. तर सर्व यंत्रणांचा वापर करुन सरकार विरोधी पक्षांना दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, असे जनता दल (सेक्युलर) पक्षाचे नेते एच.डी. देवेगौडा म्हणाले. येणार्‍या निवडणुका या लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठीच्या निवडणुका आहेत, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.

भाजपला देशाचे तुकडे करायचेत -नायडू
भाजप देशाचे तुकडे करु इच्छिते आम्ही देशाला जोडू इच्छितो. सर्व विरोधकांचा एकच नारा आहे भारत वाचवा, लोकशाही वाचवा, अशी टीका तेलगू देसम पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. भारतीय जनता पक्षाने सीबीआय, ईडीशी युती केली. पण, आम्ही तर जनतेशी युती केली. येणार्‍या निवडणुकीत नवा पंतप्रधान पाहायला मिळेल, असे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणाले. तर भारत फक्त आर्मी, एअरफोर्सने मजबूत होणार नाही. तर, सशक्त मनांच्या जोरावरच भारत मजबूत होईल, अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केली. देशात अशी एकही संस्था नाही जिला या सरकारने बरबाद केले नाही, असा आरोप शरद यादव यांनी केला. तर काळे ढग हटत आहेत. राजकीय पक्षांचे इंद्रधनुष्य आकार घेत आहे. व्यापक आघाडीची वेळ आली आहे, असे काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.

आम्ही चोरांविरुद्ध लढतोय -हार्दीक पटेल
मोदी सरकार संविधान बदलू इच्छित आहे. महागठबंधनचे सरकार केंद्रात सत्तेत येईल, असे जिग्नेश मेवाणी यांनी सांगितले. तर सुभाषचंद्र बोस इंग्रजांविरोधात लढले आणि आम्ही चोरांविरोधात लढत आहोत, अशी टीका हार्दीक पटेल यांनी केली. सर्व विरोधी पक्षांचे नेते हे दबलेल्या भारतवासियांचा आवाज बुलंद करण्यासाठी एकत्र आले असल्याचे झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन म्हणाले. देशात लोकशाही धोक्यात असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचेही पालन केले जात नाही, असा आरोप अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गेगाँग अपांग यांनी केला. ममता बॅनर्जींनी विरोधकांना एकत्र केले असून त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला आहे, असे राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी म्हणाले. तर देशाचे संविधान वाचवण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर करायला हवे, असे बसपचे नेते सतिश मिश्रा यांनी सांगितले.

भाजपला शत्रुघ्न सिन्हांचा घरचा आहेर
ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या विरोधक महासभेत देशातील बहुतेक सर्वच विरोधी पक्ष नेते उपस्थित होते. मात्र या सभेत उपस्थित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा हे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. विशेष म्हणजे या नेत्यांनी या विरोधक महासभेच्या व्यासपीठावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करत भाजपला घरचा आहेर दिला.

सभेला उपस्थित असलेले अरुण शौरी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार खोटारडे आहे. भाजप सरकारशिवाय इतर कुठल्याही सरकारने इतके खोटे बोललेले नाही. या सरकारला पाडण्यासाठी विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकास एक असे उमेदवार द्यावेत, अशी टीका अरुण शौरी यांनी केली. तर मोदी सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला पण ‘सबका साथ’ घेऊन त्यांनी ‘सबका विनाश’ केला, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला. राफेलच्या मुद्द्यावर पंतप्रधानांना प्रश्नही विचारले. त्याचप्रमाणे जर सत्य बोलणे बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. तसेच त्यांनी राफेलवरून केंद्र सरकारवर टीका करताना राफेल हा मोठा घोटाळा असल्याचा आरोपही केला.

शत्रुघ्न सिन्हांवर कारवाई होणार?
शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोधकांच्या व्यासपीठावरून भाजप सरकारवर केलेल्या टीकेची भाजपने गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई होण्याची शक्यता भाजप नेते राजीवप्रताप रुडी यांनी व्यक्त केली आहे. काही लोकांची राजकीय महत्त्वाकांक्षा खूप वाढली आहे. शत्रुघ्न सिन्हांच्या वक्तव्याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारची वक्तव्ये करून ते जनतेचा रोष ओढवून घेत आहेत, असे रुडी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -