विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी नीलम गोऱ्हेंचा अर्ज दाखल

शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड होण्याचा मार्ग मोकळा

Mumbai

विधानपरिषद उपसभापती पदासाठी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज दुपारपर्यंत इतर कोणाचाही अर्ज न आल्यास नीलम गोऱ्हे यांची उप सभापती पदाकरिता त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या नीलम गोऱ्हे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्य़ाचे देखील बोलले जात आहे.

या रिक्त पदाकरिता काँग्रेसने केला होता दावा

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे १७ जुलै २०१८ पर्यंत विधान परिषदेचे उपसभापती होते त्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून या पदावर कोणाची नियुक्ती केलेली नसल्याने हे पद तेव्हापासून रिक्तच आहे. या रिक्त पदाकरिता काँग्रेसने या पदावर दावा केला होता. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने त्यांच्या जागी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित केल्याचे पत्रंही काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना लिहिले आहे. मात्र, उपसभापतीपदाचा दावा केल्यास विरोधी पक्षनेतेपद देणार नाही, असा निर्णय युतीने घेतला असल्याने काँग्रेसने नाइलाजाने उपसभापती पदावरचा दावा सोडल्याने शिवसेनेच्या नीलम गोऱ्हेंना उपसभापतीपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.