खुशखबर! नेरुळ-बेलापूर ते खारकोपर लोकल सेवा सुरु!

नवी मुंबईकरांसाठी एक आंनदाची बातमी आहेत. येत्या शुक्रवारपासून नेरुळ-बेलापूर ते खारकोपर दरम्यानची लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सुरुवातीला या मार्गावर प्रत्येक दिवशी ८ लोकल फेर्‍या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवास कधी करता येणार याचा निर्णय अद्याप झाला नसला तरी रेल्वे प्रशासनाने मात्र लोकल सेवा पूर्ववत करण्यावर भर दिला आहे. १५ जून पासून अत्यावश्यक सेवेकऱ्यांसाठी मर्यादित प्रमणात लोकलची वाहतूक सुरु झाली. त्यानंतर सरसकट महिलांना वेळेचे बंधन घालून प्रवासाची मुभा देण्यात आली. सध्या मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर दररोज १ हजार ५७२ उपनगरी सेवा चालविण्यात येत आहे. आता चौथ्या मार्गिकेवर म्हणजेच नेरुळ /बेलापूर – खारकोपर मार्गावर ८ उपनगरी सेवा जोडल्याने आता मध्य रेल्वेवर एकूण लोकल सेवा १ हजार ५८० होणार आहेत.

वाढलेल्या प्रवासी संख्येनुसार मध्य रेल्वेने यापूर्वी सुध्दा सीएसएमटी ते गोरेगाव लोकलची वाहतुक पुन्हा सुरु केली होती. आता त्याच पाठोपाठ नेरुळ-बेलापूर-खारकोपर दरम्यानची लोकल देखील धावणार आहे. शुक्रवार पासून नेरुळ ते खारकोपर आणि बेलापूर ते खारकोपर दरम्यान प्रत्येकी ४-४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या फेऱ्यांमुळे उलवे परिसरातून मुंबईच्या दिशेने कामावर येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गावर टाळेबंदीआधी दिवसाला लोकलच्या ४० फेऱ्या धावत होत्या. या मार्गावरील प्रवासी संख्या सुमारे ५० ते ६० हजारांच्या घरात आहे.

असे आहे वेळापत्रक

स्टेशन आणि वेळ

नेरुळ – स. ८.४६ वा
खारकोपर – स. ९. १५ वा
नेरुळ – स. ५.४५ वा
खारकोपर – स.६. १५वा
बेलापूर – स.९.३२वा
खारकोपर – स. १० वा.
बेलापूर – स.६.३२वा
खारकोपर – स.७ वा