Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर महामुंबई नेरूळ सेक्टर आठमध्ये ‘माणुसकीची भिंत’

नेरूळ सेक्टर आठमध्ये ‘माणुसकीची भिंत’

Mumbai

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या जीवनातील मूलभूत गरजा असून यामधील वस्त्र या गरजेपासून परिस्थितीमुळे वंचित राहणार्‍या घटकांना मदतीचा हात देता यावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ सेक्टर 8 येथे राजीव गांधी उड्डाणपुलाखाली माणुसकीची भिंत ही अभिनव संकल्पना साकारण्यात आली आहे.

नागरिकांनी त्यांना नको असलेले वा वापरात नसलेले सुस्थितीतील कपडे याठिकाणी ठेवावेत व गरजूंनी ते त्या ठिकाणाहून घ्यावेत, अशी ही संकल्पना असून नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मान्यतेने, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, नेरूळचे स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी ही माणुसकीची भिंत साकारण्यात पुढाकार घेतला आहे. नेरूळचे विभाग अधिकारी संजय तायडे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक अरूण पाटील व जयश्री आढळ यांचा ही संकल्पना प्रत्यक्ष राबविण्यात महत्वाचा सहभाग राहिला आहे. यामुळे हे कपडे कचर्‍यात जाणार नसून स्वच्छतेच्या दृष्टीनेही ही बाब महत्वाची आहे.

याठिकाणी पुरूषांचे कपडे व स्त्रियांचे कपडे ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पे ठेवले असून लहान मुलांच्या कपड्यांसाठीही वेगळा कप्पा आहे. या उपक्रमात सहभाग घ्यावा अशा प्रकारचे आवाहन या परिसरातील सोसायटी, वसाहतींमधील नागरिकांना करण्यात आले होते. त्यास अनुसरून या उपक्रमाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला असून पहिल्या दोन दिवसात हे तिन्ही कप्पे पूर्ण भरले. हे सुस्थितीतील कपडे नेरूळ येथील एका सेवाभावी संस्थेकडे पोहचविण्यात आले असून त्यांच्यामार्फत कपड्यांची डागडुजी करून ते आदिवासी भागात दिले जाणार आहेत.

माणुसकीच्या ओलाव्याने वंचितांना आधार देत, आपल्याकडील इतरांच्या उपयोगी पडतील असे कपडे, दातृत्वाचा कोणताही बडेजाव न मिरवता सहजपणे देऊन टाकण्याच्या या संकल्पनेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.