घरमुंबईलोकलच्या तिकिटावरून सापडली अल्पवयीन मुलगी, फर्स्टक्लासचा प्रवास भोवला!

लोकलच्या तिकिटावरून सापडली अल्पवयीन मुलगी, फर्स्टक्लासचा प्रवास भोवला!

Subscribe

जनरलचं तिकीट काढून फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणं दोघा भामट्यांना चांगलंच भोवलं असून या प्रकारामुळे त्यांचा एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा डाव उधळला गेला आहे.

मुंबईत रेल्वे स्थानकावर अनेकदा तिकीट चेकर अर्थात टीसींच्या अडवण्याचा मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, याच टीसींच्या कामगिरीमुळे एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा शोध पोलिसांना लागला आहे. एवढंच नाही, तर या मुलीला सोबत घेऊन येणाऱ्या दोघा भामट्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. या दोघा आरोपींवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या मुलील हे दोघे कशासाठी सोबत घेऊन आले होते? तिला कसलं आमिष दाखवलं होतं? याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. सध्या हे दोघे भामटे पोलीस कोठडीत आहेत.

नक्की झालं काय?

बुधवारी नेरूळ रेल्वे स्थानकावर टीसी आसाराम मीना हे नेहमीप्रमाणे प्रवाशांची तिकीटं तपासत होते. एका लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यासमोर मीना तिकीट तपासत असताना दोन पुरूष आणि एक १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी त्यांना या डब्यातून उतरताना दिसली. या तिघांकडे तिकीट तर होते. पण ते फर्स्टक्लासचे नसून जनरलच्या डब्याचे होते. मीना यांनी मग नियमाप्रमाणे त्यांना दंड भरण्यासाठी ठणकावलं. मात्र, दंड भरायला त्यांनी नकार दिल्यानंतर मीना यांनी या तिघांना टीसी कार्यालयात नेलं. तिथे वरीष्ठ टीसी आनंद सिंह यांनी चौकशी केल्यानंतर हे तिघेही घाबरल्याचं दिसून आलं. सोबतच त्यांच्यासोबत एक ९वीत शिकणारी १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी होती. त्यामुळे आनंदसिंह यांना संशय आला.

- Advertisement -

शंका काढण्यासाठी आनंद सिंह यांनी या तिघांची कसून चौकशी सुरू केली. पण त्यांच्याकडून सिंह यांना समाधानकारक उत्तरं मिळेनात. त्यामुळे शेवटी त्यांनी सदर मुलीच्या वडिलांना फोन करायला लावला. तेव्हा खरा प्रकार समोर आला.


हेही वाचा – बिग बॉस स्पर्धक अभिनेत्रीच्या नवऱ्याला अटक; सावत्र मुलीशी अश्लील वर्तन

मुलगी घरून पळाली होती!

वडिलांशी बोलल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना कळलं की ही मुलगी २ दिवसांपूर्वीच गुजरातच्या आनंद शहर परिसरातून पळाली होती. त्याची रीतसर तक्रार देखील तिच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली होती. हा प्रकार समोर येताच आनंद सिंह यांनी या प्रकाराची माहिती वाशी लोहमार्ग पोलिसांना दिली. तेव्हा वाशी पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतलं आणि दोघा आरोपींना अटक केली. फक्त सेकण्ड क्लासचं तिकीट काढून फर्स्ट क्लासच्या डब्यात केलेला प्रवास या तिघांना भोवला आणि या सगळ्या गोलमालचा भांडाफोड झाला! हा सगळा प्रकार घडल्यानंतर फक्त टीसीच्या हुशारीमुळे एका मुलीच्या अपहरणाचा कट फसल्याचं स्पष्ट झाल्यामुळे टीसी आनंद सिंह आणि टीसी मीना यांचं कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -