नव्या वर्षात मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस

जगातील ९५ टक्के क्रूझ येणार मुंबईच्या बंदरावर

Mumbai
Costa Cruz

मुंबईत ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसच्या निर्मितीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. नव्या वर्षांत ऑक्टोबर अखेरीस या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचे काम पूर्ण होणार आहे. या आंतरराष्ट्रीय क्रूझच्या माध्यमातून मुंबईतील बंदरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवळपास सर्वच मोठ्या क्रूझसाठी भारतात रेड कारपेट टाकण्यात येणार आहे. या क्रूझ टर्मिनसच्या माध्यमातून क्रूझ पर्यटकांची संख्या ही २०२० पर्यंत २१ हजारांच्या घरात पोहचणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहेत

आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि जर्मनी बनावटीची कोस्टा क्रूझ शुक्रवारी मुंबईत दाखल झाली आहे. त्यानिमित्ताने पत्रकारांशी बोलताना मुंबई पोर्ट ट्रस्टचे संचालक संजय भाटीया यांनी ही माहिती दिली. यावेळी भारतीय पर्यटकांमध्ये वाढत असलेल्या क्रूझच्या मागणीवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, मुंबईसह देशातील पर्यटक आंतरराष्ट्रीय क्रूझसाठी परदेशी जात असतात. पण येत्या काळात हे चित्र बदलणार आहे.

मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचे काम पूर्ण होणार आहे. या टर्मिनसवर देशासह विदेशात प्रसिद्ध असलेल्या अनेक मोठ्या क्रूझ येथील अशी अपेक्षा आहेत. मोठे क्रूझ या टर्मिनसवर येणार नसले तरी जगभरातील साधारणत: ९५ टक्क्यांहून अधिक आंतरराष्ट्रीय क्रूझ याठिकाणी येऊ शकतील. यामुळे भारतीय पर्यटकांनादेखील चालना मिळेल, असा विश्वास भाटीया यांनी यावेळी बोलून दाखाविला.तर कोस्टा क्रूझच्या माध्यमातून भारतीयांना एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून नव्या वर्षांत आणखीन दोन आंतरराष्ट्रीय क्रूझ मुंबईत दाखल होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंबईत विशेष कार्यक्रमात ही क्रूझ मुंबईत दाखल झाली. यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्टचे संजय भाटीया, इटलीच्या कॉन्सिलेट जनरल स्टेफिना कोस्टानझा आणि लोटस डेस्टिनेशनच्या नलिनी गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

काय आहे कोस्टा व्हिक्टोरिया क्रूझ?
शुक्रवारी मुंबईत दाखल झालेली कोस्टा व्हिक्टोरिया क्रूझ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रूझ आहे. १३०० स्के.फूट मीटर इतकी मोठी ही क्रूझ असून तिची क्षमता १७०० प्रवासी वाहून नेण्याची आहे. यात ६५४ केबिन्स असून ६७० क्रू सदस्यांचा समावेश आहे. या क्रूझमध्ये केसिनो, सिनेमागृह, डिस्को, बॉलरुम, ग्रँड बार, ग्रंथालय, शॉपिंग सेंटर अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. यात दोन मोठी स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक आणि ४ जकुझी असतील. सध्या या क्रूझच्या माध्यमातून सात दिवसांच्या मुंबई ते मालदिव अशा सहलींचे आयोजन केले आहे.

भारतीय पर्यटकांना क्रूझची भुरळ

मुंबईसह देशभरातील पर्यटकांवर सध्या क्रूझची भुरळ पडत असल्याचे यावेळी आकडेवारीतून समोर आले आहे. साधारणपणे २०१५ ते २०१८ या कालावधीत क्रूझवरील भारतीय पर्यटकांची संख्या लक्षात घेतल्यास पर्यटकांचा आकडा वाढला असल्याचे दिसून आले आहे. २०१५ साली आंतरराष्ट्रीय क्रूझला पसंती दर्शविलेल्या भारतीय पर्यटकांची संख्या २,१०० इतकी होती. २०१६ साली पर्यटकांचा हा आकडा ३ हजार ६०० वर पोहचला असून यंदा म्हणजेच २०१८ साली हा आकडा ११ हजारांवर पोहचला असल्याची माहिती कोस्टा क्रूझच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे. भारतीय पर्यटकांचा ओढा असाच कायम राहिला तर हा आकडा २१ हजारांवर जाणार असल्याचा अंदाजही यावेळी वर्तविण्यात आला आहे. क्रूझ पर्यटकांकडून सर्वाधिक पसंती सिंगापूरला मिळत असल्याचे सांगण्यात आले.

क्रूझवर मिळणार स्ट्रीट फूडची लज्जत

गेल्या काही वर्षांपासून भारतीय पर्यटकांची क्रूझला मिळणारी पसंती लक्षात घेता कोस्टा क्रूझ आता भारतीय खाद्यपदार्थांची मेजवानी घेऊन येणार आहेत. यात प्रामुख्याने मुंबईतील स्ट्रीट फूडची लज्जत पर्यटकांना चाखायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे जैन फूड देखील पर्यंटकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, इटालियन फूड हे या क्रूझचे वैशिष्ठ्य असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here