घरमुंबईएसटीचा बिनमापाचा गणवेश कर्मचार्‍यांच्या बोकांडी

एसटीचा बिनमापाचा गणवेश कर्मचार्‍यांच्या बोकांडी

Subscribe

कोट्यवधीचा खर्च पाण्यात

एसटी महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून एसटीचे चालक-वाहकांसह अन्य कर्मचार्‍यांना महामंडळाकडून नवीन आधुनिक गणवेश दिला आहे. मात्र अद्यापही अनेक एसटी कर्मचार्‍यांना गणवेश मिळलेला नाही. ज्यांना मिळाला तो आखूड किंवा लांब असल्यामुळे कर्मचार्‍यांना स्वत:च्या पैशातून नवा गणवेश घ्यावा लागत आहे. एसटीचे काही कर्मचारी जुन्यात गणवेशात दिसून येत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने दिलेला नवा आधुनिक गणवेश कर्मचार्‍यांच्या बोकांडी बसला आहे.

यापूर्वी एसटी महामंडळाकडून एसटीचे चालक, वाहक, शिपाई, यांत्रिकी, तांत्रिक, हेल्परसह सर्व कर्मचार्‍यांना गणवेशासाठी कापड आणि शिलाई भत्ता दिला जात होता. मात्र कपड्याचा दर्जा योग्य नसल्याच्या तक्रारी कर्मचार्‍यांकडून केल्या जात होत्या. त्याची दखल घेत अखेर एसटी कर्मचार्‍यांना रेडिमेड आणि आधुनिक गणवेशच देण्याचा निर्णय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला. एसटीच्या ६९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे निर्णय घेतला होता. यासाठी अहमदाबाद येथील प्रख्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एफआयएफटी) यांना एसटी कर्मचार्‍यांचा हा गणवेश डिझाइन करण्याचे काम दिले होते. यासाठी कर्मचार्‍यांची नेमकी गरज काय हे लक्षात घेण्यात आले. एसटीच्या सर्व स्तरांवरील कर्मचार्‍यांचे मत जाणून घेण्यात आले होते.

- Advertisement -

संस्थेच्या डिझायनरने एसटी आगारांमध्ये जाऊन कर्मचार्‍यांच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर आधुनिक नव्या गणवेशाचे डिझाईन तयार करण्यात आले. यात महत्त्वाची बाब म्हणजे चालक-वाहकांच्या नव्या गणवेशांवर रेडियमच्या दोन पट्ट्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मार्गावर असतानाच एखादी बस रस्त्यात बिघडल्यास किंवा अपघात झाल्यास रात्री-अपरात्री अन्य वाहन चालकांना अंधारातही एसटीचे चालक दिसू शकतील, अशी व्यवस्था केली आहे. मात्र याचा काही उपयोग होताना आज दिसून येत नाही. कारण या आधुनिक गणवेशाबद्दल कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही कर्मचार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एसटीने जो गणवेश दिला आहे तो मापात बसत नाही. सोबतच गणवेशाच्या कपड्याचा दर्जासुद्धा निकृष्ट असल्याचं त्यांनी सांगितले. तर काही एसटीच्या कर्मचार्‍यांनी सांगितले की, मिळालेले नवे गणवेश अल्टर करून घ्यावे लागत आहेत.

गणवेशासाठी ३२ कोटी खर्च
एफआयएफटीने नव्या गणवेशाची डिझाईन तयार करून दिल्यानंतर कपडे तयार करणार्‍या खासगी कंपनीशी करार करण्यात आला. दोन वर्षांच्या करारासाठी ६३ कोटी रुपये एसटी महामंडळाने मोजले आहेत. गुनींना कमर्शल प्राव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. एसटीने यावर्षीच्या कपड्याची जवळ जवळ ३२ कोटी रुपये देऊन गणवेश तयार केले. मात्र एसटीच्या ८० हजार कर्मचार्‍यांना वर्षाला २ गणवेश देण्यात येतात. मात्र या आधुनिक गणवेशाकडे स्वतः एसटी कर्मचार्‍यांनी पाठ फिरवली आहे. या संबंधित आम्ही एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही नव्या गणवेशासाठी कर्मचार्‍यांकडून शर्ट आणि पॅण्टच्या साईज नंबरची मागणी केली होती. मात्र तरीसुद्धा काही कर्मचार्‍यांना गणवेश होत नाहीत. त्यांना आम्ही गणवेश लवकरच बदलून देणार आहोत.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -