घरमुंबईनाईट लाईफ २७ जानेवारीपासून

नाईट लाईफ २७ जानेवारीपासून

Subscribe

मंत्रीमंडळात बैठकीत झाली चर्चा

मुंबईत नाईट लाईफ (मुंबई २४ तास) सुरु करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेल्या चर्चेला बुधवारी अखेर पूर्णविराम मिळाले आहेत. बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत नाईट लाईफ ही संकल्पना सुरु करण्यास मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार आता २७ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होणार असून अनिवासी भागात मॉल्स, हॉटेल्स आणि दुकाने आता रात्रीच्यावेळेत देखील सुरु राहणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी केली.

मुंबईत बुधवारी मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी वरील माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते. तर या निर्णयामुळे पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही ताण पडणार नसून उलट रोजगारनिर्मिती होणार असल्याची घोषणा ही यावेळी करण्यात आली आहे. तर या निर्णयाला नाईट लाईफ असे न म्हणता मुंबई चोवीस तास असे म्हणावे अशी सूचना देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपूर्वी मुंबईत नाईट लाईफ सुरु करावी, अशी मूळ संकल्पना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. या संकल्पनेला भाजपाकडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतर पर्यटन मंत्र्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांपूर्वी हॉटेल व्यावसायिकांबरोबर झालेल्या बैठकीनंतर याबाबतचे सूतेवाच पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैर्‍या सुरु झाल्या होत्या. अखेर बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत यावर आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातील आपली भूमिका मांडून याबद्दलची माहिती सर्वांना दिल्यानंतर या निर्णयाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, लंडन शहराची नाईट लाईफ इकॉनॉमी ५ बिलियन पाउंड इतकी आहे. मुंबईतील सर्व्हिस सेंटरमध्ये ५ लाख कर्मचारी काम करतात. ३ शिफटमध्ये काम सुरू झाल्यास रोजगारही वाढणार आहे. त्याचसोबत बस,टॅक्सी सर्व्हिस आदी क्षेत्रातही रोजगार वाढणार आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. उलट रात्री दीड वाजता दुकाने बंद झालीत की नाहीत हे पाहण्याचा पोलिसांचा त्रास वाचणार असल्याचे माजी पोलीस आयुक्तांनीच सांगितले आहे. यात एक्साईज विभागाचा काहीही सहभाग नाही. पब आणि बार चोवीस तास उघडे राहणार नाहीत. ते त्यांच्या दीड वाजता पूर्वनियोजित वेळेलाच बंद होणार आहेत. त्या नियमात कोणताही बदल झालेला नाही. एखादयाला भूक लागली तर रात्री कितीही वाजता खादयपदार्थ उपलब्ध होणार आहेत. जर रात्रीच्या वेळी चित्रपट पाहायचा असेल तर तो देखील पाहता येणार आहे. अनिवासी क्षेत्रात यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मिल कंपाउंड, बीकेसी, नरीमन पॉईंट इथे ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. बीकेसी आणि नरीमन पॉईंट येथील गल्ल्यांत फूडट्रक उभे करता येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

तातडीने घडवून आणली चर्चा
बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीच्या विषयांमध्ये नाईट लाईफ संदर्भातील विषय नव्हता. मात्र आदित्य ठाकरे यांनी हा विषय तातडीने आणून या विषयाची माहिती मंत्रिमंडळात सर्वांसमोर मांडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -