घरमुंबईदेवा म्हाराजा, राणे एकदाचे भाजपात ईले!

देवा म्हाराजा, राणे एकदाचे भाजपात ईले!

Subscribe

नितेश राणे यांचा प्रमोद जठारांच्या हस्ते प्रवेश,आज भरणार अर्ज

राण्यांचा पुढे काय व्हणार? हा प्रश्न गेले काही दिवस तळकोकणात प्रत्येक घराघरात चर्चिला जात होता. आज, उद्या, परवा… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायण राणे आणि त्यांची दोन मुले वाजतगाजत भाजपात प्रवेश करणार, अशा बातम्या सिंधुदुर्गात येत होत्या. मात्र शेवटपर्यंत मुख्यमंत्र्यांनी ताकास तूर लागू दिली नाही आणि अखेर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या हस्ते नितेश राणे यांच्या हातात भाजपचे कमळ देण्यात आले. हेच कमळ घेऊन मग नितेश यांनी भाजपचे उमेदवार म्हणून कणकवली- वैभववाडी येथून गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला.

शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून रखडला होता. फडणवीस यांनीही याबद्दल स्पष्ट काही बोलणे टाळले होते. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री याबद्दल घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तिथेही मुख्यमंत्र्यांनी घोषणा करणे टाळले. हे कमी म्हणून की काय राणे परिवाराचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत मोठा गाजावाजा करून प्रवेश होणार असे सांगितले जात होते. त्यासाठी तारखांवर तारखा दिल्या जात होत्या. पण, विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला एका दिवस बाकी असताना राणे यांचे धाकटे चिरंजीव नितेश राणे यांना भाजपकडून उमेदवारी घोषित झाली.

- Advertisement -

शिवसेनेचे गृहराज्यमंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर अखेरपर्यंत राणेंच्या भाजप प्रवेशाला विरोध करत होते. हिंसक प्रवृत्तीला थारा देऊ नका, असे आवाहनच त्यांनी भाजपला केले होते. राणे परिवाराला आपल्या हस्ते प्रवेश देऊन मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाराजी ओढवून घ्यायची नव्हती. यामुळे फडणवीस यांनी मध्यम मार्ग काढला. त्यांनी परस्पर सिंधुदुर्गमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या हस्ते नितेश राणे यांना प्रवेश देऊन हा विषय संपवून टाकला.

सेना, भाजपकडून बंडखोरीचा इशारा
नितेश राणे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये बंडखोरी उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. संदेश पारकर भाजपकडून उमेदवारीसाठी उत्सुक होते. पारकर यांच्यासह नुकतेच राणे यांची साथ सोडणारे सतीश सावंत हे नितेश यांच्या वाटेत अडथळे आणतील, असे चित्र आहे. हे कमी म्हणून की काय युती असली तरी शिवसेना कुठल्याही परिस्थितीत नितेश यांना मदत करणार नाही. केसरकर यांनी थेट इशारा दिला असल्याने निवडणुकीपर्यंत सिंधुदुर्गात धुमशान पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -