घरमुंबईमुंबई महापालिकेत काँग्रेसचा आणखी एक नगरसेवक वाढला

मुंबई महापालिकेत काँग्रेसचा आणखी एक नगरसेवक वाढला

Subscribe

मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका केशरबेन पटेल यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे महापालिका सदस्य रद्द करण्यात आल्यानंतर प्रभाग क्रमांक ७६ मधून दुसर्‍या क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी नगरसेवक नितीन सलाग्रे यांच्या नावाची घोषणा शुक्रवारी महापालिका सभागृहात करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांची संख्या आता २९ वर पोहोचली आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७६मधून भाजपच्या नगरसेविका केशरबेन मुरजी पटेल या निवडून आल्या होत्या. प्रभाग क्रमांक ७६ हा इतर मागासवर्गीय म्हणून राखीव होता. परंतु केशरबेन यांचे जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने फेटाळले होते. त्यामुळे जात पडताळणी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात तसेच त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात केशरबेन पटेल यांनी आव्हान दिले. परंतु न्यायालयात दिलेले आव्हान संपुष्टात आल्यानंतर मुंबई महापालिकेने ५ एप्रिल २०१९ रोजी त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द केले होते. तेव्हापासून हे नगरसेवकपद रिक्त होते.

विश्वनाथ महाडेश्वरांनी केली घोषणा

प्रभाग क्रमांक ७६चे नगरसेवक पद रिक्त झाल्यानंतर दुसर्‍या क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार नितीन सलाग्रे यांनी लघुवाद न्यायालयात याचिका केली. यावर लघुवाद न्यायालयाने नितीन सलाग्रे यांना नगरसेवक म्हणून घोषित करण्याचे निर्देश दिले होते. या निकालाची प्रत महापालिका आयुक्तांना प्राप्त झाल्यानंतर हा प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला होता. त्यानुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका सभागृहात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

- Advertisement -

भगवा फेटा बांधून सभागृहात आले सलाग्रे

महापालिका सभागृहामध्ये निवडणुकीच्या वेळेस तसेच महत्वाच्या बैठकीत शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक हे भगवे फेटा परिधान करून येत असतात. परंतु शुक्रवारी काँग्रेसच्या नगरसेवकपदी निवड झाल्याची घोषणा महापौरांनी केल्यानंतर नितीन सलाग्रे हे भगवा फेटा आणि काँग्रेसचा उपरणे घालून सभागृहात अवतरले. आजवर अशा प्रकारे भगवा फेटा न बांधलेल्या नितीन सलाग्रे यांची हटके एंट्री ही सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी होती.

मुंबईतील सध्याचे नगरसेवकांचे संख्याबळ

शिवसेना : ९४
भाजप : ८३
काँग्रेस : २९
राष्ट्वादी काँग्रेस : ०८
मनसे : ०१
समाजवादी पक्ष : ०६
अभासे : ०१
एमआयएम : ०२
एकूण : २२४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -