घरमुंबईरेल्वे लगत सांडपाण्यावर शेती करणाऱ्यांवर कारवाई नाहीच; सरकारची हतबलता

रेल्वे लगत सांडपाण्यावर शेती करणाऱ्यांवर कारवाई नाहीच; सरकारची हतबलता

Subscribe

रेल्वेरूळांलगत सांडपण्यावर होणारी शेती, अनधिकृत फेरीवाले, दूषित लिंबू सरबत, उसाचा सरबत यावर काय कारवाई करण्यात आली, याबाबत आज विधानसभेत प्रश्न विचारण्यात आले.

डोंबिवली एमआयडीसीतून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्याचा वापर करुन पालेभाज्या पिकवल्या जातात. मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वे रुळालगत सांडपाण्यावर शेती केली जाते. यातून पिकवलेला भाजीपाला मुंबईतच विकला जातो. मात्र या दूषित पालेभाजीवर सरकारला कारवाई करता येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६’ मध्ये शेतकरी समाविष्ट नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नसल्याची हतबलता अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानसभेत व्यक्त केली आहे.

आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित केला प्रश्न

काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी उघड्यावर विक्री केल्या जाणाऱ्या लिंबू सरबत, दूषित पाणी, बर्फ आणि रेल्वे लगतच्या दूषित भाज्यांच्या प्रश्नावर लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. याला उत्तर देत असताना मदन येरावार यांनी सांडपाण्यावर रेल्वे रुळागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करता येत नसल्याचे सांगितले.

- Advertisement -

मुंबईत फेरीवाल्यांवर कारवाई

लक्षवेधीला उत्तर देताना येरावार यांनी स्पष्ट केले की, १ एप्रिल ते १५ मे २०१९ या कालावधीत मुंबईत ८०१२ फेरीवाल्यांवर कारवाई करून २१ हजार ४६३ किलो उघड्यावरील खाद्यपदार्थ, ३६ हजार ५४ लिटर सरबत आणि १ लाख १६ हजार ८२३ किलो बर्फ जप्त केला करून नष्ट करण्यात आला आहे.

दूषित लिंबू, उसाच्या सरबत प्रकरणी दंडात्मक कारवाई

मुंबई महापालिकेने लिंबू सरबतसाठी वापरण्यात आलेल्या बर्फाचे २८० नमुने घेतले होते. त्यापैकी २१८ नमुने दूषित आढळून आले आहेत. तर उसाच्या रसासाठी वापरण्यात आलेल्या बर्फाचे ३०३ नमुन्यांपैकी २६८ नमुने दूषित आढळून आले आहेत. तसेच औषध आणि प्रशासन विभाग आणि मुंबई महानगर पालिकेच्या केलेल्या संयुक्त कारवाईत दीड लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली असल्याचे सांगितले.

- Advertisement -

…तर उत्पादकांचे परवाने रद्द होणार

रेल्वे रुळालगत पिकवण्यात येणाऱ्या १२ भाज्यांचे नमुने विश्लेषणासाठी घेतले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहेत. रेल्वेच्या आवारात पिकविण्यात येणाऱ्या भाजीपाल्यांबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. रेल्वेच्या जागेत भाजीपाला पिकवणाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असल्याचे येरावार यांनी सांगितले. तसे केल्यास उत्पादकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्याचे निर्देश ही न्यायालयाने दिले आहेत.

दूषित खाद्यपदार्थाच्या विरोधात विरोधी पक्ष सरकारसोबत

सरबतमध्ये दूषित बर्फ वापरल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालला आहे. मागे दुधात भेसळ केल्यास जन्मठेपेची शिक्षा मिळावी, असा आपण प्रयत्न केला होता. या प्रकरणात विरोधी पक्ष तुम्हाला समर्थन करणार यासाठीही कठोर कायदा करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी या लक्षवेधी दरम्यान बोलताना केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -