घरमुंबईआवाज.... नो डेसिबल फटाक्यांचा ,विक्रेत्यांचा निघाला धूर

आवाज…. नो डेसिबल फटाक्यांचा ,विक्रेत्यांचा निघाला धूर

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून फटाके वाजवून ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत आम्ही विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. - मंजुनाथ सिंगे, प्रवक्ता, मुंबई पोलीस

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या फटाक्यांच्या न्यायालयीन लढाईमुळे फटाके विक्रेत्यांचा धूर निघाला आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिल्याने मुंबईसह देशभरातून फटाके विक्री मंदावली आहे, अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांची विक्री २० ते २५ टक्क्यांनी कमी झाली असून त्यामुळे फटाके विक्रेते चक्रावले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून फटाके विक्रीने थोडा जोर पकडला आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत ग्राहक येतील, असा अंदाज विक्रेत्यांकडून वर्तविण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, कारवाईच्या भीतीपोटी ग्राहकांकडून नो डेसिबल फटाक्यांना अधिक मागणी आहे. पारंपरिक फटाक्यांपेक्षा याच फटक्यांना अधिक पसंती दर्शविली जात असल्याची कबुली फटाके विक्रेत्यांकडून ‘आपलं महानगर’ला देण्यात आली आहे.

दिवाळीसाठी सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. हा सण मोठा आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी मुंबईकरांची तयारी पूर्ण झाली असून बाजारपेठाही गेल्या दोन दिवसांपासून गर्दीने फुलून गेल्या आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण दिवाळी म्हटले की, आनंदात असणारे फटाके विक्रेते यंदा मात्र चिंतेत असल्याचे चित्र दिसत आहेत. दिवाळी सुरू झाली तरी मुंबईतील काही मोठे फटाके विक्रेते वगळता इतर जवळपास सर्वच विक्रेत्यांच्या दुकांनावर म्हणावी तशी गर्दी झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासंदर्भात मर्यादित केलेली वेळ आणि वाढत्या प्रदूषणासंदर्भातील वाढलेली जनजागृती यामुळे मुंबईतील फटाके विक्रेत्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अगोदरच विक्रेत्यांनी कमी प्रमाणात माल भरला होता. त्यातही ग्राहकांनी पाठ फिरविल्याने गतवर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्के फटाके विक्री घसरल्याची माहिती लालबाग, दादर आणि महम्मद अली रोडवरील फटाके विक्रेत्यांकडून मिळाली. त्यातच मुंबई पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कठोर कारवाई करणार असल्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेही फटाके विक्रीवर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

दरम्यान, यासंदर्भात लालबागमधील फटाके विक्रेते स्वप्निल कसाबे सांगतात की, यंदा पालिकेने परवानगी उशिराने दिली. त्यामुळे दुकाने उशिराने सुरू करण्याची वेळ आमच्यावर आली होती. त्यानंतर कोर्टाने दिलेल्या वेळेच्या बंधनामुळे ग्राहक फटाके खरेदीसाठी कमी प्रमाणात येत आहेत. याचा फटका आमच्या धंद्याला बसला आहे. काल आणि आज फटाक्यांची थोड्या प्रमाणात विक्री झालेली आहे. ही विक्री आणखीन दोन दिवस कायम राहिली तर तोटा कमी होईल. पारंपरिक फटाक्यांमध्ये फुलबाजे, पाऊस आणि चक्र यांना लोकांची पसंती आहे. पण आता लोकांकडून आवाज करणारे फटाके कोणते आहेत, याची विचारणा होत आहे.

नो डेसिबल फटाक्यांची चलती
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री ८ ते १० वाजेपर्यंत फटाके वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यात काही दिवसांपासून फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण लक्षात घेता लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली आहे. त्याचाच विचार करीत बाजारात नो डेसिबल फटाके दाखल झाले आहेत. ज्यात फटाक्यांचा आवाज येत नसून रंग आणि प्रकाशाने इतरांचे लक्ष वेधले जाते. या फटाक्यांमध्ये जपिंग फ्रॉग, डिस्को फ्लॅश, आणि किटकॅट या फटाक्यांचा समावेश आहे. या फटाक्यांना डेसिबल हा प्रकार नसतो. हे फटाके बाजारात ८० ते १५० रुपयांच्या किमतीत उपलब्ध असल्याने ग्राहकांची मोठी पसंती मिळवित आहेत.

- Advertisement -

फटाके वाजविणारच
न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी कायद्याची चौकट दिली असली तरी मुंबईत त्याला काय प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पोलिसांनी देखील कारवाई करण्याचे संकेत दिले असले तरी मुंबईत बुधवारी फटाके दणक्यात फोडले जाणार असल्याचे शक्यता आहे. मंगळवारी अभ्यंगस्नान आहे. परंपरेनुसार या दिवशी पहाटे लवकर उठून फटाके वाजविले जातात. त्यामुळे आम्ही ती परंपरा जपणार असून आम्ही फटाके सकाळीदेखील फोडणार आहोत, असे घोडपदेव येथील रहिवाशी आशिष चव्हाण यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाचा नियम हवं तर संध्याकाळी पाळू, असेही ते म्हणाले.

या फटाक्यांना मागणी

फुलबाजे
पाऊस
किटकॅट
डिस्कोफ्लॅश
जंपिंग फ्रॉग
कारगिल बुलेट
फायटर
कलर्स शॉर्टस

गेल्यावर्षीच्या तुलनेत फटाके विक्री कमी झालेली आहे हे खरं आहे. पण ती नक्की किती झाली हे आताच सांगणे जरा कठीण आहे. गेल्या दोन दिवसांपासून फटाके विक्री वाढली आहे. ज्यात प्रामुख्याने कलर्स म्हणजे आकाशातील फटाक्यांना मागणी आहे. लाल म्हणजे आवाज करणार्‍या फटाक्यांना यंदा कमी मागणी असल्याचे दिसून येत आहे. तर अनेक ग्राहक न्यायालयीन वेळेतच फटाके फोडणार असल्याचे सांगत आहेत.
– मिनीष मेहता, सरचिटणीस, मुंबई अ‍ॅण्ड ठाणे डिस्ट्रिक्ट फायर वर्कस डिलर्स वेल्फअर असोसिएशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -