यंदा उकाड्यात नो लोडशेडींग

राजकीय उकाडाही टाळण्यासाठी महावितरणचे नियोजन

Mumbai
Electricity

राज्यात आगामी दिवसात वाढणारा हवामानातला आणि राजकीय उकाडा अशा दोन्ही गोष्टींचे नियोजन महावितरणने केले आहे. त्यामुळे यंदाच्या उकाड्यात भारनियमनाचे चटके राज्यातील वीज ग्राहकांना बसणार नाहीत याची काळजी कंपनीमार्फत घेण्यात आली आहे. कोयनेच्या पाण्याच्या व्यवस्थापनाच्या पर्यायासोबतच, औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पांसाठी पुरेसा उपलब्ध असलेला कोळसा आणि पॉवर एक्सचेंजमधून अल्प मुदतीचे विजेचे करार करण्यात आले आहेत. या सगळ्या विजेच्या व्यवस्थापनामुळे येत्या उकाड्यात वाढत्या विजेच्या मागणीचे व्यवस्थापन करणे महावितरणला शक्य होईल, असा कंपनीचा दावा आहे. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत वीज ग्राहकांची गैरसोय करून राजकीय आगपाखड होऊ नये म्हणूनही पुरेशी खबरदारी ऊर्जा विभागाकडून घेण्यात आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही ऐन उकाड्यात कोयना जलविद्युत प्रकल्पाने महाराष्ट्राला लोडशेडींगमधून तारले होते.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विजेच्या व्यवस्थापनातील त्रुटींमुळे ऑक्टोबर हिटच्या आधीच महावितरणचे संपूर्ण नियोजन बिघडले होते. ऑक्टोबर हिटसाठी राखीव सगळे पर्याय आधीच वापरल्याने ऐन ऑक्टोबर हिटमध्ये महावितरण तोंडघशी पडले होते. त्यामुळेच मे महिन्यासाठी महावितरणने ऑक्टोबर हिटमधून धडा घेतला आहे. विजेची मागणी वाढताना पीक अवर्सच्या कालावधीत हमखास हातचा पर्याय असणार्‍या कोयनेच्या पाण्याचे व्यवस्थापन यंदाच्या उकाड्यासाठी करण्यात आले आहे. संपूर्ण वर्षासाठी महानिर्मितीला वीज निर्मितीसाठी ६७.५ टीएमसी इतके पाणी उपलब्ध होते. पण यंदाच्या कोयनेच्या पाण्याच्या चांगल्या व्यवस्थापनामुळे संपूर्ण उकाड्यासाठी ३८ टीएमसी इतके पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली तरीही कोयनेचा पर्याय हा महावितरणला पॉवरप्ले सारखा वापरता येईल.

गेल्या लोकसभा निवडणुकांच्या कालावधीत कोयनेच्या मंजूर पाण्याच्या कोट्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा निवडणुकीच्या कालावधीत करण्यात आला होता. त्यामुळेही कोयनेच्या पाण्याच्या माध्यमातून अतिरिक्त वीज निर्मितीवरून राजकारण चांगलेच तापले होते. राज्यातील विजेची सरासरी मागणी ही १९ हजार ते २० हजार मेगावॅटच्या घरात असते, पण ऐन उकाड्यात ही विजेची मागणी २४ हजार मेगावॅटचा आकडा पार करण्याचा अंदाज आहे. कोळशाच्या टंचाईने विजेचे संकट उभे राहू नये म्हणून यंदा कोळसा व्यवस्थापनही उत्तमरीत्या करण्यात आले आहे. गेल्या वर्षी उकाड्यात ८ लाख टन कोळसा उपलब्ध होता. पण यंदाच्या उकाड्यासाठी १३ लाख टन इतका कोळसा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.

अल्प मुदतीचे करार

खुल्या बाजारातून पॉवर एक्सचेंजमधून वीज खरेदीसाठीही महावितरणने तयारी केली आहे. अल्प मुदतीसाठी ४०० मेगावॅट वीज येत्या १५ मार्चपासून महावितरणला उपलब्ध होणार आहे, तर एप्रिल ते जून या कालावधीसाठी महावितरणने ३०० मेगावॅट विजेच्या अल्प मुदतीच्या विजेच्या खरेदीसाठी करार केला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात २३ हजार ७५५ मेगावॅट इतकी विजेची मागणी होती. महावितरणकडून ही संपूर्ण विजेची मागणी पूर्ण करण्यात आली होती. विजेच्या वाढत्या मागणीचा ताळमेळ घालण्यासाठी ही विजेची खरेदी करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here