घरमुंबईनयनतारा यांना आमचा विरोध नाही - राज ठाकरे

नयनतारा यांना आमचा विरोध नाही – राज ठाकरे

Subscribe

ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाला बोलावण्यावरू निर्माण झालेल्या वादावर राज ठाकरेंनी अखेर पडदा टाकला आहे. तसेच, त्यांनी मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दमही दिला आहे.

ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या नावावरून सध्या महाराष्ट्राच्या साहित्य विश्वामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नयनतारा सहगल यांच्या साहित्य संमेलनाला येण्यावर आक्षेप घेत मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना संमेलनाचं निमंत्रण पाठवण्याला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आयोजकांनी हे निमंत्रण रद्द देखील केलं. मात्र, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच एक प्रसिद्धी पत्रक जारी करत ‘नयनतारा सहगल यांना आमचा कोणताही विरोध नाही’, अशी भूमिका जाहीर केली आहे. तसेच, संवेदनशील विषयांवर व्यक्त होताना भान ठेवण्यासंदर्भात पक्ष कार्यकर्त्यांचे देखील त्यांनी कान टोचले आहेत.

वादामुळे निमंत्रण केलं रद्द

यंदा ९२वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होत आहे. या संमेलनाला साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांना प्रमुख उद्घाटक म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, यवतमाळमधल्याच एका स्थानिक मनसे पदाधिकाऱ्याने सहगल इंग्रजी साहित्यिक असल्याचं कारण देत त्यांच्या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून येण्याला आक्षेप घेतला. यावरून मोठा वाद निर्माण झाला. अखेर संमेलनाच्या आयोजकांनी नयनतारा सहगल यांना पाठवलेलं निमंत्रण रद्द केलं. मात्र, त्यावर आता मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करत त्यांच्या येण्यावर मनसेला काहीही आक्षेप नसल्याचं जाहीर केलं आहे.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – राज ठाकरे मातोश्रीवर

पत्रात काय म्हणाले राज ठाकरे?

‘महाराष्ट्रातल्या मराठी साहित्य संमेलनाचं मराठीपण जपलं जावं, अशी माझ्या सहकाऱ्याची भूमिका होती. जी योग्यच आहे. पण नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर साहित्य संमेलनाला येणार असतील तर त्यांच्यावर माझ्या पक्षाला आक्षेप असण्याचं कारणच नाही. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी ही भूमिका मांडत आहे.’

- Advertisement -

कार्यकर्त्यांनी भान ठेवावं!

दरम्यान, या सर्व प्रकणावर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने घेतलेल्या भूमिकेवर राज ठाकरेंनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. ‘संमेलनाच्या आयोजकांना माझ्या कार्यकर्त्यांमुळे जो मनस्ताप झाला, त्याबद्दल मी एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मनापासून दिलगिरी व्यक्त करतो’, असं राज ठाकरेंनी या पत्रामध्ये म्हटलं आहे. मात्र, त्याच वेळी त्यांनी मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बोलाताना भान ठेवण्यासंदर्भात देखील दम भरला आहे. ‘अशा संवेदनशील विषयावर बोलण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केल्याशिवाय भूमिका मांडू नये’, असं राज ठाकरेंनी बजावलं आहे.

नयनतारा सहगल प्रकरणी मुख्यमंत्र्यांनीच खुलासा करावा –  विखे पाटील

या घटनेचे पडसाद साहित्याबरोबरच राजकीय विश्वातही पडत आहेत. ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले यवतमाळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला, याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय लोकशाही विरोधी आणि घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा आहे. सुरक्षेच्या मुद्यावर हे निमंत्रण रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. पण तसे असेल तर हे राज्य सरकारचे मोठे अपयश आहे. संमेलनाला पुरेशी सुरक्षा देणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. सरकारकडून या कर्तव्याची पूर्तता होण्याऐवजी सहगल यांचे निमंत्रणच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला तडा गेला असून, गृह विभागाचे मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनीच यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे.

‘नयनतारांचे भाषण वर्तमान परिस्थितीवर परखड भाष्य करणारे’

त्यातच नयनतारा सहगल यांनी आपले भाषण परखड असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना ते  नको असावे, अशी शक्यता वर्तवल्याने हे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. बडोदा येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘राजा तू जागा हो’ असे वक्तव्य केल्यानंतर प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता. नयनतारा सहगल यांचे यवतमाळचे नियोजित भाषण देखील देशातील वर्तमान परिस्थितीवर परखड भाष्य करणारे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेही त्यांचे निमंत्रण नाकारले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. देशातील आणि राज्यातील विद्यमान सरकार किती लोकशाही विरोधी पद्धतीने वागते, याची अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आली आहेत. हे सरकार लोकशाही मानणारे सरकार नाही. त्यामुळे साहित्यिक नयनतारा सहगल यांना निमंत्रण नाकारण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने मुख्यमंत्र्यांना विचारून घेतला का? साहित्य संमेलनासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. त्यामुळेच सरकारने नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करून या संमेलनातील भाषणावरच सेन्सॉरशिप लावली का? असे अनेक प्रश्न उपस्थित करून विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.


हेही वाचा – राज ठाकरेच आमचा खरा राजा – महेश मांजरेकर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -