घरमुंबईमृत्यूनंतरही तुमचे हात संगणकावर टायपिंग करू शकतात...

मृत्यूनंतरही तुमचे हात संगणकावर टायपिंग करू शकतात…

Subscribe

मृत्यूनंतरही तुमचे हात काम करू शकतात? विश्वास वाटत नाही ना? पण हे खरे आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला एक चांगला निर्णय घ्यावा लागणार आहे. तो म्हणजे अवयवदान करताना आपल्या हाताचेही दान करण्याचा. आज अनेक लोक असे आहेत की त्यांना प्रत्यारोपणासाठी हातांची गरज आहे. ब्रेनडेड रुग्णाचे हात दान केल्यास मृत्यूनंतरही ते कार्यरत राहू शकतात.

अवयवदानासाठी केल्या जाणाऱ्या वारंवार जनजागृतीमुळे आता लोकं पुढे येत आहेत. पण, आजही हाताच्या दानासाठी मोठ्या प्रमाणात उदासिनता दिसून येत आहे. एखाद्या ब्रेन डेड रुग्णाचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नातेवाईक हृदय, यकृत, त्वचा, डोळे आणि फुप्फुस असे अनेक अवयव दान करतात. पण, अवयव समन्वयकांच्या समुपदेशनानंतरही नातेवाईक हात दान करण्याचा निर्णय घेत नाहीत. शरीराच्या बाहेर असलेले हात मृतदेहापासून वेगळे केले तर मृतदेह कसा दिसेल या भीतीने नातेवाईक अनेकदा हात दान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. पण, आता जेवढी गरज शरीरातील इतर अवयवांची भासते तेवढीच हातांची ही भासत आहे.

रुग्णाचे नातेवाईक हात दान करण्यास देतात नकार

रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला कृत्रिम हात बसवण्यात आले आहेत. लवकरच दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करून तिला नवीन हात लावण्यात येणार आहेत. पण, ब्रेन डेड रुग्णाचे नातेवाईक हात दान करण्यास परवानगी देत नसल्याने मोनिकाला अजूनही कृत्रिम हातांवर विसंबून रहावे लागत आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये हात प्रत्यारोपणाचा खर्च परवडत नाही म्हणून सर्वसामान्यांसाठी पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. पण, हात दानाबाबत नसलेल्या जनजागृतीमुळे एकही प्रत्यारोपण झालेले नसल्याचे समोर आले आहे.

जन्मजात दिव्यांग असलेल्या लोकांसोबत, कोणत्या तरी घटनेत हात गमावलेल्या अशा सर्वांचेच आयुष्य हे सामान्य नसते. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठीही दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे, अशा लोकांवर जर हात प्रत्यारोपण केले तर त्यांचे आयुष्य सुरळीत होण्यास मदत होऊ शकते, अशी आशा प्लास्टिक सर्जन्स व्यक्त करतात.
मुंबईतील केईएम आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये जवळपास ३ जण हातांच्या प्रत्यारोपणासाठी प्रतिक्षायादीत आहेत. केईएममध्ये एका २८ वर्षीय व्यक्तीने हात प्रत्यारोपणासाठी नाव नोंदणी केली आहे. रक्तवहिन्यांचा दुर्मिळ आजार असल्याने त्याच्या हाताच्या नसा खराब झाल्यात त्यामुळे त्याला हात प्रत्यारोपणाची गरज आहे. पण, हात दान करण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याने त्याच्यावर हात प्रत्यारोपणाच्या शस्रक्रियेला उशीर होत आहे.  – डॉ. विनीता पुरी, केईएम हॉस्पिटलच्या प्लॅस्टिक सर्जन

- Advertisement -

हात दानासाठी कुटुंबियांची उदासिनता

हात प्रत्यारोपणामुळे ज्यांना खरंच गरज आहे, अशा लोकांच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो. ज्यांना हात नसतात त्यांच्या जीवनाचा अनुभव खूप कठीण असतो. पण, एखाद्या ब्रेनडेड रुग्णाचे नातेवाईक जेव्हा अवयवदानासाठी तयार होतात तेंव्हा त्यांनी हात दान करण्याची ही तयारी दाखवली पाहिजे. अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना वाटते की, हात दान केले तर मृत रुग्णाचे शरीर कसे दिसेल. पण, मृतदेहाला त्याजागी कृत्रिम हात बसवले जातात हे लोकांना ठाऊक नाही. त्यामुळे ही भीती नातेवाईकांनी काढून टाकली पाहिजे. पण, नातेवाईक हात दान करण्यासाठी तयारच होत नाहीत. यामुळे हात प्रत्यारोपणाच्या यादीत असणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया होत नाही, अशी माहिती डॉ. विनीता पुरी यांनी दिली आहे.

हाताचे प्रत्यारोपण गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

तसेच ‘हाताचे प्रत्यारोपण ही खूपच अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. हात बसवल्यानंतर काही दिवसांनी रुग्ण हातांच्या हालचाली सहजपणे करू शकतो. याशिवाय या रुग्णांना आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. औषधे बंद केल्यास हात निकामी होण्याची दाट शक्यता असते. खासगी हॉस्पिटलमध्ये हात प्रत्यारोपणाचा खर्च लाखोंच्या घरात असल्याने सर्वसामान्यांना परवडण्याजोगा नसतो. त्यामुळे अनेक रुग्ण प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपासून दूर राहतात. पण, केईएममध्ये अल्पदरात रुग्णांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे’, असंही डॉ. पुरी म्हणाल्या.

- Advertisement -

वाचा – बीडमधील १७ वर्षीय मुलाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान

वाचा – अवयवदानातून सहा जणांना जीवदान


 

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -