घरमुंबईमोठ्याने हाक मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून भिवंडीत एकाचा खून

मोठ्याने हाक मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून भिवंडीत एकाचा खून

Subscribe

मोठ्याने हाक मारु नको. मला माझ्या बायकोशी फोनवर बोलायचे आहे, असे सांगत दोन मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला. या किरकोळ वादावादीचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले आणि त्यामध्ये एकाचा नाहक बळी गेला. या मारहाणीत आशिषकुमार या तरुणाने संजयवर लाकडी बॅटने हल्ला केला. त्यात संजयचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीत घडली. याप्रकरणी आशिषकुमार जयस्वार (२५) या तरुणाला अटक करण्यात आली असून, नारपोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारपोली येथील कैलासनगर झोपडपट्टीत संजय राठोड राहात होता. १० मे रोजी तो आणि एक महिला असे दोघेजण एका घरात मद्यप्राशन करण्यास बसले होते. त्याचदरम्यान संजयचा मित्र आशिषकुमार जयस्वार त्याठिकाणी आला आणि त्या दोघांसोबत गप्पा मारत बसला. मद्यप्राशनानंतर अखेर संजय दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरासमोरील दगडावर जाऊन बसला. त्याचवेळी त्याच्यासमोर असलेल्या घरातील लहान मुलाला तो हाका मारुन बोलवत होता. आशिषकुमार याने संजयला जोरजोरात हाक मारु नको. त्याला तुझ्या घरी घेऊन जा. मला माझ्या बायकोशी फोनवर बोलायचे आहे, असे सांगितले. यावरुन संजय आणि आशिषकुमार या दोघांमध्ये वाद झाला. रागातून संजयने आशिषकुमारला शिवीगाळ केली. त्याचवेळी घरातून बाहेर आलेल्या महिलेने आशिषकुमारला शिवीगाळ करत शेजारी असलेली बॅट उचलून त्याच्या डोक्यावर, पायावर मारण्यास सुरुवात केली. मात्र, आशिषकुमारने तिच्या हातातील बॅट हिसकावून घेऊन संजयवर बॅटने हल्ला केला. डोक्यात बॅट मारल्याने संजय खाली कोसळून दगडावर पडून बेशुद्ध झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. आशिषने त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्याचे पाहून त्याला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. अखेर संजयचा उपचारांवेळी मृत्यू झाला.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -