उत्तर मध्य मुंबई : काँग्रेसला गड पुन्हा मिळवण्याची संधी

Mumbai
29-Mumbai-North-Central-1 (1)

एकीकडे टोलेजंग आणि उच्चभ्रू इमारती तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या, असे उत्तर – मध्य लोकसभा मतदारसंघाचे स्वरूप आहे. या दोघांमधील समतोल आजही कुठल्याच पक्षाला साधता आलेला नाही. मागील बरीच वर्षे या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले, दिवंगत नेते सुनील दत्त यांनी हा मतदार संघ उत्तमरीत्या बांधून ठेवला होता. तगडा जनसंपर्क ठेवला होता. त्यांच्यानंतर त्यांची मुलगी प्रिया दत्त यांनी त्यांचा राजकीय वारसा सांभाळला, मात्र २०१४च्या मोदी लाटेत विद्यमान खासदार पुनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला. २०१९मध्ये मात्र मोदी लाट ओसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे साहजिकच काँग्रेसने पुन्हा या ठिकाणी जनसंपर्क वाढवला असल्याने यावेळी पुनम महाजन यांच्यासाठी ही निवडणूक सोपी जाणार नाही.

या मतदार संघातील प्रश्न हे भौगोलिकदृष्ठ्या पाहिल्यास वेगवेगळे आहेत. या मतदार संघात वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी या भागात ५० टक्के भूभाग हा उच्च वर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांनी व्यापलेला आहे. या ठिकाणी स्वच्छता, रस्ते आदी प्रश्न महत्त्वाचे आहेत, तर दुसरीकडे अर्धा भूभाग झोपडपट्ट्यांनी व्यापलेला आहे. या ठिकाणी मात्र मूलभूत सुविधांची वाणवा आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते सुनील दत्त यांनी बराच काळ या ठिकाणी प्रतिनिधीत्व केले, त्यानंतरही प्रिया दत्त १० वर्षे खासदार राहिल्या, मात्र त्यांना या मतदारसंघातील स्थानिक प्रश्न सोडवण्यात अपयश आले. मात्र मागील ५ वर्षे पुनम महाजन यांना संधी मिळाली, परंतु त्यांनीही येथील जनतेच्या पदरी निराशा केली.

२०१४ साली आलेली मोदी लाट आणि दिवंगत लोकनेते प्रमोद महाजन यांची मुलगी या दोन्ही गोष्टींचा फायदा पूनम महाजन यांना झाला आणि या मतदार संघातून ४ लाख ७८ हजार ५३५ इतकी मते घेत निवडून आल्या. काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा जवळपास २ लाख मतांनी पराभव झाला. पण, खासदार पूनम महाजन यांच्या कारकिर्दीवर मतदारच नव्हे, तर कार्यकर्तेदेखील समाधानी नाहीत. कारण, पूनम महाजन निवडून आल्यानंतर त्यांनी कधीच मतदार संघातील मतदारांच्या भेटी घेतल्या नाहीत, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. पुनम महाजन सतत भारतभर दौर्‍यांमध्ये व्यस्त राहिल्याने स्थानिक प्रश्न ‘जैसे थे’ राहिले.

विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम असा हा मतदारसंघ आहे. वांद्रे पूर्व या भागातील भारतनगर, बेहरामपाडा, या परिसरात मुस्लिम संख्या जास्त असल्याकारणाने आधीपासूनच त्यांची मते काँग्रेस पक्षाला मिळत होती. अशीच परिस्थिती काहीशी कुर्ला भागातही पाहायला मिळते. त्यामुळे, कोणत्याही पक्षाशी किंवा नेत्याशी बांधील न राहणारा मतदार असलेला हा मतदारसंघ आहे. १९६२ सालापासून इथे झालेल्या निवडणुकांमध्ये भाकप, जनसंघ, काँग्रेस, शिवसेना, भाजप, रिपाइं अशा सर्वच पक्षांच्या उमेदवारांना इथल्या मतदारांनी संधी दिली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या वेळी जसे आणि ज्या पक्षाच्या बाजूने वातावरण असेल, त्या पक्षाच्या पारड्यात मते टाकण्याची इथल्या मतदारांची सवय आहे.

उच्च वर्गीय-मध्यम वर्गीय-निम्न वर्गीय अशा समाजातील तिन्ही वर्गातले मतदार आणि या तीन वर्गांच्या सर्व प्रकारच्या समस्या. त्यामुळे हा मतदारसंघ एका अर्थाने चॅलेंजिंग आहे. मधू दंडवते, शरद दिघे, रामदास आठवले, मनोहर जोशी, प्रिया दत्त अशा सर्वपक्षीय दिग्गज उमेदवारांना या मतदारसंघाने निवडून दिले आहे. मात्र, तरीदेखील अजूनही या मतदारसंघातल्या मूलभूत समस्या सुटल्या नाहीत हे देखील तितकेच खरे आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी या मतदार संघातून जरी भाजप, काँग्रेसकडून अजून उमेेदवारी घोषित करण्या आली नाही. यंदा काँ्रग्रेसमधून प्रिया दत्त यांना पुन्हा संधी मिळेलच याची शास्वती नाही, मात्र चर्चा त्यांच्याच नावाची सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपमधून पुन्हा एकदा पुनम महाजन यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

मतदारसंघात न सुटलेले प्रश्न
अनेक स्थानिक प्रश्न अजून प्रलंबित आहेत. जसे की झोपडपट्टी पुनर्वसन , दोन मोठे रेल्वे टर्मिनस (वांद्रे, एलटीटी), मुंबईची दोन्ही विमानतळे (आंतरराष्ट्रीय, डोमेस्टिक), पाणी प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे रस्त्याचा प्रश्न.

२०१४ ची आकडेवारी
एकूण मतदार (२०१४) – ८ लाख ४४ हजार ८६७
भाजप – पूनम महाजन – मते – ४ लाख ७८ हजार ५३५ , ५६.६० टक्के
कॉग्रेस – प्रिया दत्त – मते – ३ लाख ९१ हजार ७६४ , ३४.५१ टक्के
आप – फिरोज पालखीवाला – मते – ३४ हजार ८२४ , ४.१२ टक्के
बसपा (बहुजन समाज पार्टी) – आनंदराव शिंदे – मते – १० हजार १२८ , १.२० टक्केे
समाजवादी पार्टी – फरहान अबू आझमी – मते – ९ हजार, ८७३, १.१७ टक्केे
नोटा – ६ हजार ९३७ , ०.८२ टक्केे

आमदारांची यादी
१) विलेपार्ले – अ‍ॅड. पराग अळवणी (भाजप)
२) चांदिवली – आरीफ नसीम खान (काँग्रेस)
३) कुर्ला – मंगेश कुडाळकर (शिवसेना)
४) कालीना – संजय पोतनीस (शिवसेना)
५) वांद्रे (पू.) – तृप्ती सावंत (शिवसेना)
६) वांद्रे (प.) – आशिष शेलार (भाजप)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here