घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टईशान्य मुंबई : कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नसलेला मतदारसंघ

ईशान्य मुंबई : कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नसलेला मतदारसंघ

Subscribe

ईशान्य मुंबई मतदारसंघाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मध्यमवर्गीय नोकरदारवर्गाचे प्राबल्य. त्यासोबतच हलाखीची परिस्थिती असणार्‍या मानखुर्द-गोवंडी-शिवाजी नगरसारख्या भागाचाही येथे समावेश आहे. सर्वसामान्यांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातील मतदारांनी कधीही एका पक्षाला किंवा उमेदवाराला सलग निवडून दिलेले नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षाची मक्तेदारी या मतदारसंघात कधीच दिसून आली नाही, परंतु काँग्रसच्या गुरुदास कामत यांचा मात्र मतदारसंघात वरचष्मा पहायला मिळाला आहे. गुरुदास कामत या मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली. यावेळी संजय दिना पाटील अवघ्या तीन हजार मतांनी जिंकून आले. संजय पाटील यांना दोन लाख 13 हजार 505 मते पडली. 2009 च्या निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेची हवा असल्याने त्याचा फटका शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या किरीट सोमय्यांना बसला होता. सोमय्या यांना दोन लाख 10 हजार 572 मते पडली, तर मनसेच्या शिशिर शिंदे यांना एक लाख 95 हजार 148 मते मिळाली होती. त्यामुळे मनसेची हवा ही संजय पाटील यांच्या पथ्यावरच पडली होती. मात्र, 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे किरीट सोमय्या यांना फारसा त्रास न घेता विजय मिळाला होता. त्यांना ५ लाख २५ हजार २८५ मते पडली. मात्र, यावेळी मोदी लाट ओसरल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

शिवसेना व भाजप यांच्यातील वाद टोकाला पोहोचल्यामुळे दोन्ही पक्ष या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुढाकार घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून युती होणार असल्याचे जाहीर केले, पण युती झाली असली तरी किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार केलेल्या टीकेमुळे सोमय्या यांना शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या विक्रोळी, भांडुप भागातून सोमय्या यांना मतदान होण्याची शक्यता कमी आहे, तसेच सोमय्या हे निवडून आल्यापासून मुलुंड व काही परिसर सोडला तर भांडुप, विक्रोळी व मानखुर्द या परिसरात कधीच फिरकले नाहीत.त्यामुळे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दल नागरिकांच्या मनात नाराजी आहे, तसेच सोमय्या यांनी मुलुंडमध्ये सुरू केलेली कामेही अद्याप पूर्ण न झाल्याने तेथील नागरिकांमध्येही थोडीशी नाराजी आहे, तसेच मोदी यांची लाट ओसरली असल्याने यंदाच्या निवडणुकीतील सोमय्या यांच्यासाठी विजयाचा मार्ग खडतर दिसत आहे.

विरोधी बाकांवर असताना सोमय्या यांनी डम्पिंग ग्राऊंड, लोकल सेवेमधील सुधारणा, फ्लाय ओव्हरचा प्रश्न अशा मुद्यांवर रान उठवले होते, परंतु प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर त्यांना हे मुद्दे सोडवता आले नाहीत. शिवाय, माध्यमांसमोर स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध असणार्‍या किरीट सोमय्यांवर पुन्हा मतदार विश्वास दाखवतील का? असा प्रश्न मतदारच विचारत आहेत. २०१४ मध्ये काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारविरोधात घोटाळ्यांची मालिका उघड करणार्‍या किरीट सोमय्यांपुढे आता त्यांनी न सोडवलेल्या प्रश्नांची मालिका आहे.

- Advertisement -

१९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून जिंकणार्‍या सोमय्यांनी मुंबई भाजप अध्यक्ष, महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस, भाजयुमो अध्यक्ष अशा अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. त्यांचा मुलगा नील सोमय्या मुलुंडमधून नगरसेवक आहे. तरीही त्यांनी मतदारसंघाकडे केलेले दुर्लक्ष त्यांना त्रासदायक ठरणार आहे. याउलट ईशान्य मुंबई मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीचे तिकीट संजय पाटील यांना देण्यात येत आहे. संजय पाटील यांचे भांडुप, विक्रोळी व मानखुर्द परिसरात चांगले काम असून, त्यांचा जनसंपर्कही तगडा आहे, तसेच 2009 ते 2014 मध्ये पाटील खासदार असताना त्यांनी मतदारसंघात अनेक कामे केली आहेत. संजय पाटील यांचे नाव जाहीर होताच त्यांचे कार्यकर्ते कामालाही लागले आहेत. त्यामुळे पाटील यांच्याकडून सोमय्या यांना चांगली टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघात मराठी मतदारांबरोबरच उत्तर भारतीय, मुस्लीम, गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात आहेत, तसेच झोपडपट्टीपासून उच्चवर्गीय मतदारही येथे आहेत. त्यातही मानखुर्द, रमाबाई नगर, भांडुप येथून मोठ्या प्रमाणात मतदान होत असल्याने या भागामध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांना लक्ष केंद्रित करावे लागते. विशेष म्हणजे याच भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय पाटील यांचा तगडा जनसंपर्क आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मुलुंड व कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडचा विषय हा अनेक वर्षांपासून गाजत आहे. कित्येक वर्षांपासून असलेली डम्पिंग ग्राऊंडची समस्या इथे कोणत्याही खासदाराला सोडवता आलेली नाही.

मतदारसंघाचा क्रमांक – २८
मतदारसंघाचे नाव – ईशान्य मुंबई
मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग
एकूण मतदार (२०१४) – ८ लाख ६१ हजार ६३८
महिला मतदार – ३ लाख ७५ हजार ९०३
पुरुष मतदार – ४ लाख ८५ हजार ६७७

2014 मधील मतांची आकडेवारी
किरीट सोमय्या – भाजप – ५ लाख २५ हजार २८५
संजय दीना पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस – २ लाख ८ हजार १६३
मेधा पाटकर – आप – ७६ हजार ४५१
मछिंद्र चाटे – बसप – १७ हजार ४२७
नोटा – ७ हजार ११४
मतदानाची टक्केवारी – ५१.७० टक्के

विधानसभा मतदारसंघातील आमदार
मुलुंड – सरदार तारासिंग – भाजप
घाटकोपर पश्चिम – राम कदम – भाजप
घाटकोपर पूर्व – प्रकाश मेहता – भाजप
विक्रोळी – सुनील राऊत – शिवसेना
भांडुप पश्चिम – अशोक पाटील – शिवसेना
मानखुर्द-शिवाजी नगर – अबु आझमी – समाजवादी पक्ष

मतदारसंघातील समस्या
– डम्पिंग ग्राऊंडमुळे स्थानिकांची नाराजी
– म्हाडाच्या वसाहतींचा रखडलेला पुनर्विकास
– रस्त्यांच्या समस्या, वाहतूक कोंडी

सोमय्या यांच्या समोरील आव्हान
सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे शिवसेना कार्यकर्ते दुखावले आहेत. शिवसेना -भाजप युती झाली असली तरी शिवसेनेची मते सोमय्यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता कमी. मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने संजय पाटील यांचे पारडे जड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलुंड, घाटकोपर या भागातील मते फिरवण्यासाठी सोमय्यांना प्रयत्न करावे लागतील. मुलुंड वगळता सोमय्यांनी अन्य विभागात फारसे लक्ष न दिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण

संजय पाटील यांच्यासाठी जमेची बाजू
मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला पाठिंबा आणि सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर पाटील यांचे शिवसेनेच्या नेत्याशी असलेले चांगले संबंध यामुळे त्यांच्या मतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या विक्रोळी, भांडुप व मानखुर्द परिसरात पाटील यांचा असलेला उत्तम जनसंपर्क व केलेली कामे यामुळे त्यांची बाजू तगडी ठरण्याची शक्यता आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -