घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टप्रचाराची ‘उर्मी’ मतांत परिवर्तित होणार ?

प्रचाराची ‘उर्मी’ मतांत परिवर्तित होणार ?

Subscribe

शेट्टींसाठी लढत अटीतटीची

टी-२०च्या सामन्यात जर प्रतिस्पर्धी संघ ९० धावांमध्ये गारद झाला तर विजय हा एकहाती सुकर मानला जातो. परंतु, षटके निर्धाव टाकत तसेच बळी जावू लागल्यास अटीतटीची वेळ येते आणि मग सोपा असलेला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत, चेंडूपर्यंत विजय लांबवला जातो. असेच काहीसे चित्र सध्या मुंबईतील उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे आहे. उत्तर मुंबईचे विद्यमान भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासाठी हा सोपाच विजय मानला जात होता. खुद्द शेट्टी तसे जाहीर विधान करत आपण पुन्हा एकदा मागील निवडणुकीप्रमाणेच प्रचंड मताधिक्याने निवडून येवू,असे सांगत होते. त्याच शेट्टी यांना विजय काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांनी कठिण बनवून ठेवला आहे. उर्मिलाला प्रतिसाद मिळत असला तरी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू न शकलेला त्यांचा पक्ष आणि कार्यकर्त्यांची तसेच पदाधिकार्‍यांची मजबूत फळी पाठिशी नसल्याने शिवाय आर्थिक पाठबळ कमी पडत असल्याने या रणरागिणीचा रुद्रावतार उर्मिला किती तारेल हाच प्रश्न आहे.

परिस्थिती प्रतिकूल असली तरी काँग्रेस पक्षातील गटबाजीचा उर्मिलाला फटका बसू शकेल. उर्मिलाचा हजरजबाबीपणा तसेच राजकीय पक्वता यामुळे यापूर्वीचे सेलिब्रेटी असलेल्या गोविंदांच्या तुलनेत उर्मिलाने जनतेला आपलेसे करून घेण्यात यश मिळवले आहे. गोविंदा यापूर्वी भ्रमनिराशा केलेली आहे. त्यामुळे सेलिब्रेटी काही कामे करू शकत नाहीत,असा लोकांचा अंदाज असला तरी उर्मिलामध्ये जी चमक दिसते, त्यावरून ती समाजकारणाची मोठी जाण असल्याने जनता आज तिच्या पाठिशी उभी राहत आहे. परंतु, ज्या प्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी मतांमध्ये परावर्तित होत नाही, त्याप्रमाणेच उर्मिलाचा वाढता प्रतिसाद मतांमध्ये परावर्तित होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. तरीही काँग्रेसच्या या रणरागिनीने शेट्टींच्या विरोधात मैदानात उतरत जे होईल ते बेहत्तर हार मानणार नाही,असे म्हणत जो लढा पुकारला त्याचेही सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.

- Advertisement -

उत्तर मुंबईत एकूण १६ लाख मतदार आहेत. त्यात मराठी मते ही निर्णायक आहेत. तब्बल ५ लाख ३५ हजार मतदार हे मराठी आहेत. तर त्याखालोखाल गुजराती व राजस्थानी ३ लाख ८४ हजार, उत्तर भारतीय ३ लाख २१ हजार, मुस्लिम १ लाख ६३ हजार, दक्षिण भारतीय ९६ हजार, ख्रिश्चन ५६ हजार, पंजाबी १२ हजार आणि इतर ३२ हजार एवढे मतदार आहेत. त्यामुळे याठिकाणी मराठी विरुध्द अमराठी उमेदवार अशीच लढत होत आहे. भाजप जर स्वतंत्र लढला तर दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल,असा दावा शेट्टींनी केला होता. आता महायुती असल्याने मागील निवडणुकीप्रमाणे पावणे पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येवू असा दावाही केला जात आहे. परंतु उर्मिलाने प्रचारात जे रान उठवले आहे, ते पाहता शेट्टींनीही त्याकडे दुर्लक्ष केले नाही.

प्रत्येक चौक आणि रस्ता, तसेच मंदिर आणि चर्चसह सोसायटी, वस्त्या शेट्टींनी पिंजून काढत उर्मिलाचे आव्हान परतवून लावण्याचा प्रयत्न केला आहे. शेट्टी यांची पक्षीय पातळीबरोबरच सोसायटीस्तरावरील अध्यक्ष, सचिवांची जी फळी आहे, तीही एवढी भक्कम आहे, त्यांना प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. चिडखोर आणि समोरच्याची तमा न बाळगण्याचा त्यांचा स्वभावच त्यांचा स्वत:चा मारेकरी ठरणार आहे. त्यामुळे हा स्वभाव सोडला तरी समाजकार्यात त्यांची एक चांगली पकड आहे. परंतु बोरीवली रेल्वे स्थानकासमोर काँग्रेसच्या प्रचारसभेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणा आणि गोपाळ शेट्टी यांनी त्यांच्याविरोधात वैयक्तिक पातळीवर केलेली टीका यामुळे उर्मिलाला मिळालेली सहानुभूती मतांत किती परावर्तित होईल हे सांगणे कठीण आहे.

- Advertisement -

प्रचारासाठी अजून सहा दिवस शिल्लक असल्याने दोघांचीही कसोटी आहे. गोपाळ शेट्टी यांच्यापुढे काँग्रेसला होणारे मतदान कमी करण्याचे आव्हान आहे, तर भाजपसह इतर मतदान आपल्याकडे वळवून ते मतपेटीत बंदिस्त करण्याचे आव्हान उर्मिलापुढे आहे. त्यामुळे सहा दिवस शिल्लक असताना शेट्टींच्या बाजूने विजयाचा निशाणा फडकण्याचे संकेत मिळत असले तरी पुढील काही दिवसांमध्ये शेट्टींच्या विरोधात वातावरण निर्माण करत लोकांची सहानुभूती मतांमध्ये परावर्तित करण्यात उर्मिला यशस्वी ठरतेय हे पाहणे औत्सुक्याचे आहे. परंतु जर तरच्या या लढाईत सध्या तरी उर्मिला आणि शेट्टी यांच्यात चुरशीची लढत होणार हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -