‘सपा’मुळे निरुपमांची डोकेदुखी वाढली

Mumbai

उत्तर-पश्चिम मतदारसंघ…खरे तर कधीकाळी काँग्रेससाठी सर्वात सोपा मतदारसंघ म्हणून ओळख असलेला हा मतदारसंघ. मात्र आता हाच मतदारसंघ काँग्रेस उमेदवाराची डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. उत्तर पश्चिम मतदारसंघात काँग्रेसकडून संजय निरुपम आणि शिवसेनेकडून गजानन कीर्तिकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. संजय निरुपम यांची मदार ही मुस्लीम आणि उत्तर भारतीय मतांवर आहे. मात्र या मतदारसंघातून समाजवादी पक्षाने सुभाष पासी यांना उमेदवारी दिल्याने उत्तर भारतीय मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर सपाकडे थोड्याफार प्रमाणात मते विभागली तर संजय निरुपम यांची डोकेदुखी वाढू शकते, असे इथले जाणकार सांगत आहेत.

काँग्रेसमध्ये एकी नाही

एकीकडे शिवसेना-भाजपचे सर्व आमदार, नगरसेवक एकत्र युतीच्या उमेदवारासाठी कामाला लागले असताना मात्र काँग्रेसमध्ये या मतदारसंघात एकी दिसत नाही. माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुरेश शेट्टी वगळता इतर काँगेसच्या पदाधिकार्‍यांनी मात्र निरुपम यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच दिवंगत काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांच्या गटाने देखील निरुपम यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे मतदानाला अवघे काही दिवसच उरलेले असताना निरुपम यांच्यासमोर काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन काम करण्याचे आव्हान आहे.

मनसेचीही निरुपम यांना साथ नाही –

एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपविरोधात भूमिका घेतली असताना या मतदारसंघात मात्र याचा फायदा संजय निरुपम यांना होताना दिसत नाही. तसेच नुकतेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे संजय निरुपम यांना मदत करणार नसल्याची भूमिका घेतल्याने मनसैनिक संजय निरुपम यांना मदत करणार नाही. संजय निरुपम यांनी फेरीवाला मुद्द्यावर अनेकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे मराठी द्वेष असलेल्या निरुपम यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही, असे काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

युवकांच्या मतांसाठी निरूपमांचे प्रयत्न

मुस्लीम, उत्तर भारतीय मतांसोबत सध्या संजय निरुपम हे या मतदारसंघातील युवकांची जास्तीत जास्त मते खेचता येतील का, यासाठी प्रयत्न करत आहे. याचसाठी त्यांनी अंधेरी येथे युवा संमेलन आयोजित केले होते. या युवा संमेलनाला पाटीदार समाजाचा नेता आणि नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला हार्दिक पटेल उपस्थित होता. मात्र याचा संजय निरुपम यांना कितपत फायदा होईल हे पहावे लागेल.

कीर्तिकर यांच्या बाबत नाराजी पण ..

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर थोड्याफार प्रमाणात लोकांची नाराजी आहे. मात्र या मतदारसंघातील शिवसेना-भाजप आमदारांच्या प्रभावाने फरक पडू शकतो.

काय आहेत इथल्या समस्या –

– सध्या या भागात पाण्याची समस्या ही सर्वात मोठी समस्या आहे.

– एसआरएमुळे लोकांची नाराजी, अनेक प्रकल्प रखडले आहेत.

– मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी

अशी आहे यंदा लढत –

गजानन कीर्तिकर (शिवसेना)

संजय निरुपम ( काँग्रेस)

सुभाष पासी ( सपा)

2014 ला अशी होती लढत –

गजानन कीर्तिकर (शिवसेना) – ४,६४,८२०
गुरुदास कामत (काँग्रेस) – २,८१,७९२
महेश मांजरेकर (मनसे) – ६६,०८८
मयंक गांधी (आप) – ५१,८६०

मतदारसंघाची थोडक्यात माहिती –

2014 ला एकूण मतदार – ८ लाख ९७ हजार २४५

महिला मतदार – ३ लाख ९३ हजार ०४३
पुरुष मतदार – ५ लाख ४ हजार २०२

विधानसभा मतदारसंघातील एकूण आमदार

१५८ – जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर – शिवसेना
१५९ – दिंडोशी – सुनील प्रभू – शिवसेना
१६३ – गोरेगाव – विद्या ठाकूर – भाजप
१६४ – वर्सोवा – भारती लव्हेकर – भाजप
१६५ – अंधेरी पश्चिम – अमित साटम – भाजप
१६६ – अंधेरी पूर्व – रमेश लटके – शिवसेना

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here