अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद ठरलं नव्हतं – नितीन गडकरी

नितीन गडकरी आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी भाजप-शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या मतभेदावर प्रतिक्रिया दिली.

Mumbai
nitin gadkari
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी

‘मी वृत्तपत्रात वाचले की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. परंतु, माझ्या माहितीनुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत काही ठरलं नव्हतं’, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. नितीन गडकरी आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी भाजप-शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या मतभेदावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर ‘देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होईल आणि फडणवीसच मुख्यमंत्री होणार’, असेही गडकरी म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले गडकरी?

‘मी वृत्तपत्रात वाचलं की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. परंतु, माझ्या माहितीनुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत काही ठरलं नव्हतं. यासंदर्भात माझी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी देखील चर्चा झाली आणि त्यांनी तेच सांगितलं. मुख्यमंत्रीपदाबात उद्धव यांनी चर्चेत विषय काढला होता, तेव्हा अमित शाह यांनी ‘नंतर बघू’ असे म्हटले होते’, असं नितीन गडकरी म्हणाले.

दोन्ही पक्ष मिळून सरकार बनवणार – गडकरी

‘देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात सरकार बनावं. भाजपला १०५ जागांवर यश मिळाले आहे. याशिवाय शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी युतीत निवडणूक लढवली आहे. आम्ही दोन्ही मिळून सरकार बनवणार आहोत. मला विश्वास आहे यावर नक्की मार्ग निघेल’, असे गडकरी म्हणाले. ‘मुख्यमंत्रीपदाबाबत जेव्हा असा विषय आला तेव्हा ज्या पक्षाच्या जागा जास्त त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असे ठरलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना देखील हाच नियम होता’, असे देखील गडकरी यांनी सांगितले.

एक प्रतिक्रिया

  1. आम्ही प्रामाणिक पणाने मतदान करुन आमचे कर्तव्य केले. आता हे बघायचे कर्तव्य पण प्रामाणिक पणे करीत आहोत.

Comments are closed.