घरमुंबईआता सीएमओत रवींद्र वायकर?

आता सीएमओत रवींद्र वायकर?

Subscribe

मुंबई आणि ग्रामीण भागातील आमदारांमध्ये समन्वय राखणार, शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी, सीएमओच्या अधिकार्‍यांमध्येही गोंधळ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंंत्री कार्यालयात सीएमओ म्हणून कोण काम करणार, याबाबत अनेक नावे चर्चिली जात होती. त्यात सुरुवातीला शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, आदित्यचा मावसभाऊ वरुण सरदेसाई, आमदार अ‍ॅड. अनिल परब यांची नावे चर्चेत होती. मात्र या तिघांपैकी कुणाचीही वर्णी सीएमओत लागली नाही. त्यामुळे इतर इच्छुकांच्या आशा पल्लवित होवून आपणच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळ असल्याचे मंत्रालयात अनेक जण भासवत होते.

त्यातच मागील चार दिवसांपासून शिवसेनेचे एक बडे नेते, माजी राज्यमंत्री आणि मातोश्रीच्या जवळचे असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचा ताबा घेतला असून त्यांच्या सीएमओतील वावरामुळे शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ आमदार, मंत्री नाराज झाल्याची कुजबुज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुरू आहे. केवळ शिवसेनेचे नेतेच नव्हे तर मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव आणि इतर अधिकारीही गोंधळलेले आहेत. आता सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक आमदार वायकर यांच्या सीएमओतील संभाव्य राज्यमंत्रीपदाच्या दर्जामुळे मुख्यमंत्र्यांकडे जाणार्‍या सर्व फाईल्स सुरूवातीला वायकरांकडे जातील म्हणून अधिकार्‍यांमध्येही नाराजी आहेे.

- Advertisement -

सलग चार वर्षे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पद, फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्रिपद आणि मातोश्री व शिवसेना भवन येथील कोअर टीममध्ये वावरणार्‍या वायकर यांचा यावेळी मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यामुळे पश्चिम उपनगरातील अनेकांना धक्का बसला होता. वायकर यांना वगळण्यामागे त्यांचा बडेबोलपणा कारणीभूत असून, मातोश्री व शिवसेना भवनात असणार्‍या वावरामुळे पक्षातील इतर नेतेही त्यांना दचकून होते. मुंबई काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष संजय निरुपम यांनी त्यावेळी वायकर आणि मातोश्री यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप केले. पहिल्यांदाच मातोश्रीवर कुणी आरोप केले होते. मात्र त्यानंतर निरुपम यांना आपले आरोप सिद्ध करता आले नाहीत.

वायकर यांचा नव्या ठाकरे मंत्रिमंडळात समावेश नक्की होता. त्यांना राज्यमंत्रिपदावरुन कॅबिनेटपदी बढतीही मिळणार होती, असे वायकर समर्थक सांगत होते. मात्र नक्की माशी कुठे शिंकली याचा थांगपत्ता वायकर यांना न लागल्याने आयत्या वेळी वायकर यांचे नाव यादीतून कट झाल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले. त्याचवेळी बाजूच्या दिंडोशीतून निवडून येणार्‍या सुनिल प्रभू यांनाही संभाव्य मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिला गेला. शिवसेनेचे मुख्य प्रतोद हे पद कॅबिनेट दर्जाचे असल्याने प्रभू यांचा समावेश झाला नसल्याचेही या नेत्याने आपलं महानगरला सांगितले.

- Advertisement -

मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईच्या प्रश्नासंबंधी समन्वय ठेवण्यासाठी आणि ग्रामिण भागातील आमदारांचे विषय मार्गी लावण्यासाठी माजी राज्यमंत्री राहिलेल्या आणि मातोश्रीच्या विश्वासू अशा वायकर यांची नियुक्तीची घोषणा कोणत्याही क्षणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यातील आणि मुंबईतील इतर आमदार नाराज आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाऊ सुनिल राऊत यांचीही मंत्रिमंडळात नियुक्ती न झाल्याने काही दिवस राऊत बंधू नाराज होते. मात्र आता वायकर यांच्या नव्याने होणार्‍या सीएमओतील नेमणुकीने शिवसेनेतील बहुतांश आमदार नाराज असल्याची खात्रीलायक माहिती ‘आपलं महानगर’कडे आहे.

शिवसेनेतील नेते मंडळींची नाराजी असताना सीएमओत काम करणारे प्रधान सचिव भूषण गगराणी, सचिव, उपसचिव आणि मुख्य सचिव अजोय मेहताही नव्याने होणार्‍या नेमणुकीबद्दल गोंधळलेले आहेत. मागील दोन महिने मुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार व्यवस्थित सुरू असून आता नव्या नेत्याच्या नेमणुकीने उगाचच व्याप वाढेल अशी चर्चा सनदी अधिकार्‍यांमध्ये आहे. त्यामुळे वायकर यांच्या छाटलेल्या पंखात बळ भरण्याचे उद्योग कोण करीत आहे, असा सवाल शिवसेना नेते आणि मंत्रालयातील अधिकार्‍यांना पडला आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयात कुणाची नेमणूक करावी हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. त्यामुळे कोणत्याही अधिकार्‍यांना घाबरण्याचे कारण नाही. यापूर्वीही अशा नेमणुका झालेल्या आहेत, अशी सावध प्रतिक्रिया एका अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकार्‍याने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -