घरमुंबईग्रामीण भागातील रुग्णांना टेलिमेडिसीनचा दिलासा

ग्रामीण भागातील रुग्णांना टेलिमेडिसीनचा दिलासा

Subscribe

ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, त्यांना उपचारासाठी शहरात मारावे लागणारे हेलपाटे कमी व्हावेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत (एनएचएम) केईएम रुग्णालयात सुरू केलेल्या टेलिमेडीसिनला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. २०१५ ते २०१८ या तीन वर्षांत तब्बल आठ हजारपेक्षा जास्त रुग्ण या योजनेचे लाभार्थी ठरले आहेत. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये या योजनेंतर्गत जोडण्यात आली आहेत. यामुळे केईएममधील डॉक्टर मुंबईतूनच राज्यातील अनेक रुग्णांचे तपासणी अहवाल पाहून त्यांच्यावर उपचार करत आहेत.

ग्रामीण रुग्णालयांमध्ये अनेक आजारांवर उपचार शक्य नसल्याने डॉक्टर रुग्णांना शहरातील रुग्णालयांमध्ये जाण्याचा सल्ला देतात. शहरात उपचारासाठी आल्यावर रुग्णालयातील ओपीडी कधी असते हे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माहित नसते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात हेलपाटे मारावे लागतात. तसेच शहरामध्ये त्यांची राहण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना पदपथ, रेल्वे स्थानक, एस.टी. डेपोवर राहावे लागते. अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे जेवणाचेही हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २००८ मध्ये केईएम रुग्णालयात टेलिमेडीसिन सेवा सुरू केली. त्यानंतर ही सेवा जे.जे. रुग्णालय, पुण्यातील बीजेएमसी, नागपूर औरंगाबाद सरकारी रुग्णालय आणि मुंबईतील नानावटी रुग्णालयात सुरू केली. मुंबईत केईएम रुग्णालयात सुरू झालेल्या टेलिमेडिसिन सेवेला १० वर्षांत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

२००८ मध्ये ३४६ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असला तरी २०१५ ते २०१८ या तीन वर्षांत आठ हजारपेक्षा जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. तर काही रुग्ण अद्यापही लाभ घेत आहेत. या सेवेमुळे रुग्णांवर स्थानिक रुग्णालयातच उपचार होतात. तसेच एखाद्या रुग्णावर तेथे उपचार होणे शक्य नसल्यास त्या रुग्णाला केईएममधील ओपीडीचा वार, डॉक्टरांची वेळ कळवून त्यादिवशी बोलावण्यात येते. त्यामुळे रुग्णांचे हाल होत नाहीत. तसेच डॉक्टरांना रुग्णाच्या आजाराची माहिती असल्याने त्याच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होते, असे टेलिमेडीसिन विभागाच्या प्रमुख डॉक्टर कामाक्षी भाटे यांनी सांगितले.

उपचाराबरोबर प्रशिक्षणही

टेलिमेडीसिन सेवेमुळे रुग्णांवर स्थानिक रुग्णालयात उपचार तर होतातच पण स्थानिक डॉक्टरांना मार्गदर्शन ही करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील डॉक्टर तेथील रुग्णांवर उत्तम उपचार करत आहेत. जेणेकरून रुग्णांना जिल्हा व उप जिल्हा रुग्णालयात दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होते.

- Advertisement -

रेडिओलॉजीच्या रुग्णांवर सर्वाधिक उपचार

टेलिमेडीसिन सेवेद्वारे आतापर्यंत रेडिओलॉजी विभागातील रुग्णांबाबत अधिक विचारणा करण्यात आली आहे. क्ष-किरण, सिटी स्कॅन, सोनोग्राफीचे अहवाल दाखवून रुग्णांचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यात येते. त्याचबरोबे कार्डिओलॉजी सर्जरी, पेडिअॅट्रिक सर्जरी, त्वचा रोग याबाबत विचारणा करण्यात येत आहे.

टेलिमेडिसीनचा लाभ घेतलेले रुग्ण

वर्ष        रुग्ण
२००८-०९ ३४६
२००९-१० २०३८
२०१०-११ १३६६
२०११-१२ ३९६१
२०१२-१३ ५६७२
२०१३-१४ ६६९८
२०१४-१५ ६१९९
२०१५-१६ ८७९४
२०१६-१७ ८४७१
२०१७-१८ ८५७६

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -